माळीण वासियांसाठी तात्पुरते निवारे उपलब्ध केले जातील – सौरभ राव

raurabh-rao
पुणे : जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दुर्घटनाग्रस्त माळीण गावाचे कायमचे पुनर्वसन होण्याअगोदर गावकऱ्यांशी चर्चा करून योग्य त्या ठिकाणी तात्पुरते निवारे तातडीने उपलब्ध करून दिले जातील. यामध्ये आवश्यक असेल तर स्वयंसेवी संस्थांची / व्यक्तींची मदत घेतली जाईल, असे सांगितले.

माळीण दुर्घटना शोध व बचाव कार्य मोहिम थांबविण्यात आल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. राव म्हणाले, घटनास्थळी बीएसएनएल मार्फत तातडीने लँडलाईन टेलीफोन सुविधा, वोडाफोन व आयडिया मार्फत मोबाईल कनेक्टिव्हिटीची सुविधा उपलब्ध करून संपर्क व्यवस्था प्रस्थापित करण्यात आली आहे. आत्तापर्यत 151 मृतदेह मिळाले आहेत. यामध्ये 89 महिला, 57 पुरूष व 5 व्यक्ती (अवयव स्वरूपात) समावेश आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण केंद्र, शासनाचे विविध विभाग, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, शरद सहकारी बँक, गोवर्धन डेअरी, संत गाडगेबाबा संस्था पिंजर-अकोला, विद्यार्थी संघ पुणे, गायत्री संस्था व इतर स्वयंसेवी संस्थांनी शोध व बचाव कार्यात मोलाचे सहकार्य केले. सतत पडणारा पाऊस आणि अति दुर्गम भाग अशा संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीत वरील संस्थांनी केलेले कार्य प्रशंसनीय असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

आपत्तीग्रस्तांच्या नातेवाईकांना केंद्र शासनाकडून प्रत्येकी 2 लाख व राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख तसेच जखमींना केंद्र शासनाकडून प्रत्येकी 50 हजार व राज्य शासनाकडून औषध उपचाराचा/संपूर्ण वैद्यकीय खर्च अशाप्रकारे दिली जाणारी मदत तातडीने संबंधितांना देण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. राव यांनी सांगितले.

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे कमांडन्ट अलोक अवस्ती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमाकांत उमाप, अप्पर जिल्हाधिकारी गणेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव हे यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment