राणे, शिवसेना आणि भाजपा

rane
कॉंग्रेसचे नेते बंडखोर नेते नारायण राणे यांचे शेवटी भवितव्य काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कॉंग्रेसने त्यांना लटकत ठेवल्यामुळे त्यांना काहीच करता येईनासे झाले आहे. त्यामुळे ते भाजपात येणार की नाही याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनीसुध्दा गेल्या काही दिवसांत निरनिराळे विधाने केली. परंतु भाजपाच्या विरुध्द एक चकारशब्दही उच्चारला नाही. यामागचे कारण काय असावे? कॉंग्रेसच्या नेत्यांनी तर त्यांना आपल्या ठंडा करके खाओ या पुरातन नीतीनुसार दुर्लक्षित करून शांत करण्याचा प्रयत्न चालवला आहे आणि त्यामुळे राणे यांना काहीच करता येईनासे झाले आहे. दरम्यान, भाजपाच्या नेत्यांनीसुध्दा राणे यांच्या विरोधात काही विधाने केली नाही. उलट उध्दव ठाकरे मात्र येता जाता राणे यांनाच लक्ष्य करत आहेत. या सगळ्या राजकारणातून महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील काही नव्या गोष्टींचे सूतोवाच होत आहे. नारायण राणे यांच्या बरोबरच छगन भुजबळ यांच्याही राजकीय वाटचालीबाबत खूप काही बोलले जात आहे. खरे म्हणजे या दोघांनाही आगामी वाटचालीच्या बाबतीत फार मोठे पर्याय उपलब्ध नाहीत. मोठे मर्यादित पर्याय आहेत. परंतु त्या पर्यायांच्या मार्गाने जाण्याच्या आड काही अडथळे येत आहेत.

राणे आणि भुजबळ दोघांचीही राजकीय ताकद आणि पार्श्‍वभूमी यांचा विचार केला तर नारायण राणे यांनी भाजपात येणे आणि छगन भुजबळ यांनी शिवसेनेत येणे हे दोन फायदेशीर पर्याय आहेत. हे पर्याय त्यांनाही उपयुक्त आहेत आणि त्या पक्षांनाही उपयुक्त आहेत. परंतु काही अडचणी येत असल्यामुळे या पर्यायावर उडी मारण्याचे धाडस हे दोघेही करत नाहीत आणि भाजपा शिवसेनेतही त्या दृष्टीने काही हालचाली होत नाहीत. या गोष्टी घडत नसल्यामुळे छगन भुजबळ काय करणार याविषयी नुसते तर्क केले जातात आणि नारायण राणे मनसेशी युती करणार की स्वतंत्र पक्ष काढणार यावर चर्चा होत राहते. मात्र राजकारणातून मिळणार्‍या काही संकेतानुसार भुजबळ काहीतरी करण्याच्या विचारात आहेत त्यांना शिवसेनेत यायचे आहे आणि नारायण राणे यांनासुध्दा भाजपात यायचे आहे. मात्र उध्दव ठाकरे यांनी नारायण राणे यांची भाजपातली एंट्री रोखून धरली आहे. भाजपाने राणे यांना प्रवेश दिला तर भाजपा आणि शिवसेना यांचे संबंध बिघडतील असा इशारा उध्दव ठाकरे यानी भाजपाला दिला आहे. या इशार्‍यामागचे तर्कशास्त्र मोठे विचित्र आहे. कारण नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना खूप त्रास दिलेला आहे. ज्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला त्यांना शिवसेना आपलीशी करणार नाही आणि भाजपानेही त्यांना आपलेसे करू नये असा उध्दव ठाकरे यांचा हट्ट आहे.

नारायण राणे यांनी भाजपात येणे भाजपासाठी फायदेशीर असले तरी केवळ उध्दव ठाकरे नाराज होऊ नये म्हणून भाजपाला नारायण राणे यांच्याबाबत सबुरीचे धोरण स्वीकारावे लागत आहे. निदान तूर्तास तरी अशी स्थिती आहे. दुसर्‍या बाजूला शिवसेनेने मात्र आपले जुने शिवसैनिक आणि नवेही नेते भराभर शिवसेनेत आणायला सुरूवात केली आहे. सध्या मोदी लाट असल्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार सहज निवडून येण्याची शक्यता आहे आणि ती संधी साधण्यासाठी अनेकजण युतीमध्ये येऊ इच्छित आहेत. मोदी लाट ही भाजपाची लाट आहे आणि तिचा फायदा शिवसेनेला मिळत आहे. तिचा विचार करून शिवसेना आपला पाया भक्कम करत आहे आणि विस्तृतही करत आहे. परंतु लाट भाजपाची असताना भाजपात मात्र कोणी येत नाही. एक दोन अपवाद वगळता भाजपात फार कमी नेते आलेले आहेत आणि शिवसेनेत मात्र मोठी आवक सुरू आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचे नेते फार दिवस शांत बसतील आणि उध्दव ठाकरे यांच्या नाराजीचा विचार करून नारायण राणे यांना दूर ठेवतील असे वाटत नाही.

बाळासाहेबांना त्रास दिला तर त्याची चिंता शिवसेनेने करावी. भाजपाने ती करण्याची गरज नाही आणि राजकारणामध्ये असा एकमेव निकष वापरून चालत नाही. बाळासाहेबांना तर राज ठाकरेंनी देखील खूप त्रास दिलेला आहे. पण शिवसेनेचे नेते दोन तीन महापालिकांमध्ये राज ठाकरेंशी चुंबाचुंबदी करतातच की नाही. मग भाजपालाच ही अडचण का असावी? कदाचित भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर याची चर्चाही होत असेल आणि उध्दव ठाकरे यांची तमा न बाळगता नारायण राणेंना भाजपात घेतले जाईलही. अशा वेळी शिवसेनेने आपला नारायण राणे यांच्यावरचा राग गिळला पाहिजे. विरोधी पक्षात असताना कोण कुणाविरुध्द काय बोलतो याची राजकारणात फार चिंता करता कामा नये. कारण हे शेवटी राजकारण आहे. दोन नेते एकमेकांच्या विरोधात असले म्हणजे परस्परांच्या विरुध्द काहीतरी बोलणारच. परंतु काही राजकीय सोयीसाठी वेगळा विचार करावा लागतो तेव्हा जुने सारे विसरून जावे लागते. आज नारायण राणे यांना भाजपात घेणे भाजपासाठी सोयीचे आहे. कारण त्यामुळे नारायण राणेंचा लाभ भाजपाला होणार आहेच पण कॉंग्रेसलाही लहानमोठा का होईना धक्का बसणार आहे. तेव्हा शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी या गोष्टीचा परिपक्वपणे विचार केला पाहिजे. आज हवा भाजपा-सेना युतीच्या बाजूने वाहत आहे. परंतु त्या हवेची फळे पदरात पाडून घेण्यासाठी योग्य त्या राजकीय हालचालीही कराव्या लागतील.