भंडाफोड त्यागाच्या सोंगाचा

sonia1
सोनिया गांधी यांनी २००४ साली पंतप्रधानपदाची हाती चालून आलेली सधंी सोडून दिली आणि त्यांनी फार मोठा त्याग केला असल्याची शेखी कॉंग्रेसचे नेते मिरवायला लागले. पण खरे तर ज्यांना सोनिया गांधी या काय आहेत हे माहीत आहे तो माणूस त्यांचा हा त्यागाचा आव जाणून होता कारण, त्या लग्न होऊन आल्या तेव्हा भारतात रहायलाच तयार नव्हत्या. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांची सद्दी संपली तेव्हा तर त्यांनी राजीव गांधी यांच्या मागे देश सोडण्याचा मोठाच तगादा लावला होता. त्यांनी विवाहा नंतर या देशाचे नागरिकत्वही स्वीकारलेले नव्हते. त्यांच्या या विदेशी नागरिकत्वाच्या मुद्यावर किती तरी राजकारण झाले. ज्या सोनिया गांधी यांना लग्नानंतर २५ वर्षे या देशाचे नागरिक होण्याचीही इच्छा नव्हती त्या सोनिया गांधी यांनी आपण देशाच्या कल्याणासाठी पंतप्रधानपदाचा त्याग केला आहे असा कितीही दावा केला तरीही तो कोणाही सामान्य माणसाला खरा वाटणे शक्य नव्हते. त्यांच्या या कथित त्यागामागे काही तरी मजबुरी असणार असे वाटत होतेच. त्याचा उलगडा आता झाला आहे.

माजी परराष्ट्र मंत्री नटवरसिंग यांनी सोनिया गांधी यांनी सोनिया गांधी यांच्या या सत्तात्यागावरचा पडदा हटवला आहे. तसे तर सोनिया गांधी यांनी उभा केलेला त्यागाचा देखावा बनावट असल्याचे ताबडतोबच दिसून आले होते. पण आता हा देखावा का करण्यात आला याचे नेमके आणि आतल्या गोटातले कारण नटवरसिंग यांनी समोर आणले आहे. सोनिया गांधी यांनी पांघरलेला नैतिकतेचा बुरखा टराटरा फाडला आहे. सोनिया गांधी यांनी २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला १४३ जागा मिळवून दिल्या होत्या आणि कॉंग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याने त्याला सत्तेची संधी मिळाली होती. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाला नऊ वर्षांनंतर सत्ता मिळाली त्यामुळे सोनिया गांधी याच पंतप्रधान होणार असे सर्वजण मानून चालले होते पण सोनिया गांधी यांनी ऐनवेळी ते पद सोडून दिले आणि मनमोहन सिंग यांना पंतप्रधान केले. यामागचे कारण काय हे आजवर मोठेच गूढ होते पण आता नटवरसिंग यांनी हे गृढ उकलले असून सोनिया गांधी यांनी कसल्याही त्याग बुद्धीने हे पद सोडले नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या त्यागाने भाजपाची मोठी पंचाईत झाली असाही शोध लावला गेला होता. वास्तविक त्या काळात भाजपाच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांनी हा त्याग वगैरे काही केलेला नाही असाचा दावा केला होता. सोनिया गांधी यांच्यात पंतप्रधानपद स्वीकारण्याचा वकूब नव्हता आणि त्यांना आपल्या या मर्यादांची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी आपल्यातली ही कमतरता ओळखून या पदापासून माघार घेतली. भाजपाच्या नेत्यांनी तसा प्रचार केला.

तो बराचसा खरा असल्याचे अनुभवालाही येत होते. कारण या महान योगिनीने त्यागाचे असे सोंग आणले असले तरीही प्रत्यक्षात मनमोहनसिंग यांना नाममात्र पंतप्रधान करून सत्तेचे सारे लाभ स्वत:च उपभोगायला सुरूवात केली होती. नंतर तर दिल्लीत सत्तेची दोन केन्द्रे होती हे उघड झाले. मनमोहनसिंग आणि सोनिया गांधी यांच्या निकटच्या लोकांनीही ही गोष्ट दाखवून दिली. सोनिया गांधी याच खर्‍या पंतप्रधान होत्या आणि मनमोहनसिंग हे गुळाचा गणपती होऊन बसले होते. खास बात अशी की, त्या खर्‍या पंतप्रधान होत्या पण त्यांच्यावर या पदाची कसलीही जबाबदारी नव्हती. त्यांचा त्यागाचे ढोंग असे काही वठवण्याचा प्रयत्न होता की, बस्स. आपण पंतप्रधानपद स्वीकारणार नाही असे जाहीर करताना, आपल्याला पदापेक्षा सेक्युलॅरिझमची जास्त काळजी असल्याचे म्हटले होते. खरे तर त्या पंतप्रधान झाल्या काय की न झाल्या काय, सेक्युलॅरिझमचे काहीच बरे वाईट होणार नव्हते पण त्यांना आपले हे ढोंग वठवतानाही नेमके काय बोलावे हे माहीत नव्हते.

आता तर नटवरसिंह यांनी राहुल गांधी यांनी त्यांना हे पद न स्वीकारण्याचा सल्ला दिला होता आणि तसा हट्टच धरला होता म्हणून त्यांनी हा त्याग केला असे नटवरसिंह यांनी म्हटले आहे. आपली आई पंतप्रधान झाल्यावर तिची हत्या होईल अशी भीती राहुल गांधी यांना वाटत होती. आता सोनिया गांधी यांच्या बाबतीतले हे सत्य उघड झाल्याने त्यांना योगिनी वगैरे म्हणणार्‍या कॉंग्रेसच्या लाचार नेत्यांची मोठी पंचाईत झाली आहे. आता त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरूवात केली आहे. हे सारे खोटे आहे, एवढेच नाही तर अनैतिक आहे असे त्यांनी म्हटले आहे. खरे तर यात अनैतिक असे काही नाही. खरे बोलणे हे अनैतिक आहे असे त्यांना वाटत असेल तर त्यांच्या नजरेतली नीतीची व्याख्या बदलावी लागेल. नटवरसिंग यांनी हा आरोप फेटाळला आहे. हे खरे असल्याुळे सोनिया गांधींनी आपल्याकडे प्रियंकाला पाठवले होते आणि आपण हे लिहू नये अशी विनंती केली होती असे त्यांनी म्हटले आहे. या लिखाणाला अनैतिक म्हणणार्‍या कॉंग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांनी हे प्रयत्न केले नव्हते असे काही दाखवून दिलेले नाही कारण ते सत्य आहेे. उलट स्वत: सोनिया गांधी याबाबत काही बोलत नसताना कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्वत:हून अशा प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत आणि काही संबंध नसताना खुलासे करीत आहेत हेच अनैतिकपणाचे आहे.