निसर्गापुढे माणूस दुबळाच

malin1
माणूस हा निसर्गावर मात केल्याच्या कितीही बाता मारत असला तरीही निसर्गापुढे तो तोकडाच आहे. निसर्गाने व्यापलेले विश्‍व आणि त्यात मानवाचे स्थान यांचा विचार केला तर असे लक्षात येते की, निसर्गापेक्षा माणूस लहानच आहे. कदाचित त्याला काही प्रमाणात गर्व होत असला तरीही कधी तरी त्या गर्वाचे घर खाली होते. निसर्गाचा जबरदस्त फटका बसतो. तो निसर्गाच्या हातातले बाहुले असल्याचे प्रत्यंतर येते. एकदा निसर्ग कोपला की, त्याच्या पुढे मानवाचे काही चालत नाही. आपण अशा निसर्गाच्या अवकृपेच्या बातम्या नेहमीच वाचत असतो पण असा एखादा मोठा प्रकार आपल्या आसपास घडला की आपल्याला धक्का बसतो. पुण जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील माळीण या छोट्या गावावर कोसळलेली आपत्ती अशीच मोठी दुर्दैवी आहे. भीमाशंकर या तीर्थक्षेत्राच्या जवळ असलेल्या या गावावर सकाळीच प्रचंड मोठी दरड कोसळून बरेच लोक मरण पावले. ही प्राणहानी नेमकी किती आहे याचाही सुरूवातीला अंदाज नव्हता. गावाच्या वरच्या बाजूला मोठी टेकडी आणि खालच्या बाजूला ओढा होता. ही टेकडी आणि ओढा यांच्या दरम्यानचे हे गाव. गेले काही दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने या गावाच्या परिसरात भूस्सखलनाचे काही छोटे मोठे प्रकार घडत होते. मात्र गुरुवारी पहाटे प्रचंड दगड, माती कोसळून गाव जवळजवळ सगळे गारद झाले आणि या छोट्या गावातील ५०-६० घरे मातीच्या ढिगार्‍याखाली गाडली गेली. हे गाव मुख्य रस्त्यापासून २ किलोमीटर आत आणि संपर्क साधण्यास तसे आडवळणी स्वरूपाचे आहे. या अपघाताच्या वेळी कोणालाच पत्ता लागला नाही.

सकाळी ७.३० वाजता या गावात एक एस.टी. गाडी येते. त्या बसगाडीच्या ड्रायव्हर-कंडक्टरला ७.३० वाजता सारी सामसूम दिसली. म्हणून पाहिले तेव्हा सार्‍या गावाला मातीच्या ढिगाचे स्वरूप आल्याचे लक्षात आले आणि त्यामुळे ही बातमी ताबडतोब पसरली. सार्‍या देशामध्ये ती काही मिनिटात ती पोचली. महाराष्ट्रात ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये दरडी कोसळण्याचे लहान मोठे प्रकार नेहमीच घडतात. परंतु पुणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा एवढा मोठा अपघात यापूर्वी कधी घडलेला नव्हता. आता सकृतदर्शनी या अपघाताचे कारण काय यावर चर्चा सुरू आहे. आपल्या प्रसिध्दी माध्यमांमध्ये काही तपशील कळण्याच्या आधीच तज्ञांची चर्चा घडवली जाते आणि त्यातून काही अर्धवट स्वरूपात तर काही बर्‍यापैकी सत्य स्वरूपातून माहिती समोर येते. ही सगळी विश्‍लेषणे तंतोतंत शास्त्रीयदृष्ट्या अचूकच असतात असे नाही. मात्र त्यावरून काही गोष्टींवर नक्कीच प्रकाश पडू शकतो.

चर्चांमध्ये सहभागी झालेल्या काही विशेषज्ञांच्या म्हणण्यात तथ्य असावेसे वाटले. डोंगरावर जमीन तयार करून शेती केली गेली आहे आणि उताराच्या खालच्या बाजूला पण ओढा आणि टेकडी यांच्यामध्ये मानवी वस्ती केली गेली आहे. टेकडीवरची जमीन कसली जात आहे आणि त्यामुळे जमीन थोडी भुसभुशीत झालेली आहे. परिणामी मुसळधार पाऊस पडताच दगड माती मोठ्या प्रमाणात कोसळली आणि उताराने वाहत वस्तीवर येऊन पडली. या उतारावर किंवा पायथ्याशी मानवी वस्ती नसती किंवा तिथे घरे नसती तर दरडी कोसळून ही जीवितहानी झाली नसती. म्हणजे अशा प्रकारे डोंगरावर शेती करून पायथ्याशी वस्ती करण्याचा प्रयोग अंगलट आलेला आहे. काही तज्ञांच्या मते डोंगराच्या वरच्या बाजूला जी शेततळी तयार करण्यात आली होती. त्या शेततळ्यांमध्ये बरेच पाणी साठले होते आणि त्या साठलेल्या पाण्याचा दबाव येऊन हे भूस्सखलन झालेले आहे. एकंदरीत जमीन, पाणी, दगड, पाण्याचे साठे, त्यांचे होणारे परिणाम या सगळ्यांचा साकल्याने विचार करून जलसंधारण न केल्यास त्याचे परिणाम असे होऊ शकतात. नाशिक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे भूस्सखलन झालेले आहे अशी माहिती काही तज्ञांनी दिली. या सार्‍या प्रकारामध्ये जलसंधारणािवषयीची तळमळ चांगलीच असते. परंतु असे प्रयोग करताना तज्ञांचा घ्यावा तसा सल्ला घेतलेला नसतो आणि त्याचे असे परिणाम होतात.

एखादा पूर्ण गाव गाडला जाणे ही काही लहान घटना नाही. आता जे झाले ते झाले. आपाद्ग्रस्त कुटुंबाना सरकारने आधार दिला पाहिजे आणि त्यांचे योग्य ते पुनर्वसन केले पाहिजे. तसे ते केले जाईलही परंतु या एका अपघातापासून धडा घेऊन यापुढे असा धोका होण्याचा जिथे कुठे संभव असेल तिथे अशा धोकादाय स्थितीत राहणार्‍या लोकांना तिथून हलवले पाहिजे. काही वेळा नदीच्या पात्रात घरे बांधून लोक राहतात आणि नदीला पूर आला की घरे वाहून जातात. २००५ सालच्या अतिवृष्टीमध्ये तर मीठी नदीच्या पात्रात अनेक घरे बांधण्यात आल्याचे दिसून आले होते. सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये असा एक प्रकार उघड झाला आहे. अन्यत्र काही ठिकाणी नदीच्या पूररेषेच्या आत काही लोक राहतात. याही लोकांना अशा प्रकारच्या अपघातांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता असते. अशा प्रकरणांमध्ये पूर्व काळजी घेणे गरजेचे आहे. पाणी हे पंचमहाभुतातले एक भूत आहे. इंग्रजीत, वॉटर हॅज इटस् ओन लेव्हल अशी म्हण आहे. तेव्हा आपण पाण्याचा अधीक्षेप करायचा नसतो. याचे भान ठेवण्याची गरज आहे.

Leave a Comment