सावधान … फेसबुक जपून ,व्हायरसचा ‘कब्जा’

facebook
नवी दिल्ली – सोशल नेटवर्किंगमधील सर्वांत मोठी वेबसाइट असलेल्या फेसबुकला नव्या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत फेसबुकवरील सुमारे आठ लाख अकाउंट्समध्ये हा व्हायरस शिरल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या व्हायरसमुळे फेसबुक वॉलवर आपल्याला मित्राने पाठवलेल्या बनावट व्हिडिओची लिंक दिसते. या व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर एक वेगळीच वेबसाइट ओपन होते व तेथे हा व्हिडिओ पाहण्यासाठी ‘प्लग इन’ डाउनलोड करण्याची सूचना येते. प्लग इन डाउनलोड करण्याचा पर्याय स्वीकारताच या व्हायरसचे काम सुरू होते. या प्लग इनच्या आधारे व्हायरस युजरच्या फेसबुक, ट्विटर आणि ई-मेल अकाउंटमध्ये प्रवेश मिळवतो. त्यानंतर, त्या युजरची सर्व खासगी माहिती काढून घेतली जाते आणि त्याच्या फ्रेंडलिस्टमधल्या अन्य एका युजरच्या वॉलवर त्याच्या नावे अशाच बनावट व्हिडिओची लिंक दिसू लागते. असा या व्हायरसचा फैलाव सुरू आहे. या व्हायरसचा फैलाव वेगाने सुरू असून दर तासाला सुमारे ४०,००० अकाउंट्समध्ये या व्हायरसचा शिरकाव होत असल्याची माहिती सोशल नेटवर्किंग तज्ज्ञ कार्लो डि मिचेली यांनी दिली. गुगलने या व्हायरसचा फैलाव थांबवण्यासाठी गुगल क्रोम ब्राउजरची ‘एक्स्टेंशन्स’ बंद केली आहेत. तथापि, सायबर हल्लेखोरांनी व्हायरस पसरवण्यासाठी गुगल क्रोमपासून सुरुवात केली असली, तरी आता व्हायरसला रोखणाऱ्या पर्यायांमधून मार्ग काढण्यासाठी हल्लेखोरांचे प्रयत्न सुरू आहेत. हल्लेखोरांनी मोझिला फायरफॉक्स ब्राउझरसाठी यापूर्वीच असे मार्ग शोधले असल्याचे मिचेली यांनी सांगितले.

Leave a Comment