
ग्लासगो – भारतीय कुस्तीपटूंचा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दबदबा कायम असून, सातव्या दिवशी पुरुषांमध्ये बजरंग आणि महिलांमध्ये ललिता यांनी आपपल्या प्रतिस्पर्ध्यांना नमवत उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला आहे.
राष्ट्रकुल स्पर्धा; कुस्तीच्या उपांत्यपूर्व फेरीत बजरंग, ललिता
५३ किलो फ्रीस्टाईल वजनी गटात भारताची उदयोन्मुख महिला कुस्तीपटू ललिताने दक्षिण आफ्रिकेच्या माफो मादीला १०-० ने धुळ चारली. तर ६१ किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये बजरंगने इंग्लंडच्या साशा मॅडच्याकवर १२-० ने विजय मिळवला.
मंगळवारी कुस्तीमध्ये भारताने तीन सुवर्णपदकांसह एक रौप्यपदक मिळवले होते. ऑलिंपिकपदक विजेत्या सुशीलकुमारने प्रसारमाध्यमांबरोबर बोलताना भारताला कुस्तीमध्ये अजून किमान तीन ते चार पदके मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे. आज भारताने तीन ते चार सुवर्णपदके मिळाली तर, पदकतालिकेत भारताचे स्थान आणखी वरती जाईल. पदकतालिकेत भारत सध्या सहाव्या स्थानावर आहे.
