विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे आखाड्यात

supriya
मुंबई : येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात तरुणींची मते खेचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची युवती काँग्रेस येत्या १९ ऑगस्टपासून राज्यव्यापी जनजागृती मोहीम हाती घेणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रचारदौरा होणार असून यामध्ये युवतींनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सुळे यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर युवतींच्या कामाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.

राज्यभरातील युवतींच्या प्रश्नांची दखल घेण्यासाठी मुंबईच्या प्रदेश कार्यालयात नवी सिस्टिम राबवण्यात येणार असल्याचे आश्‍वासन सुप्रिया सुळे यांनी या वेळी दिले. केवळ राजकीय क्षेत्रात वावरू नका तर घडणार्‍या घटनांबाबत अभ्यासू मते मांडायला शिका. आपला राजकीय आणि सामाजिक अभ्यास वाढवा. सोशल मीडियाचा वापर वाढवा , असे त्यांनी सांगितले.

महिलांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड करू नका. एखाद्या महिलेसंदर्भात गैरवर्तन करणारी व्यक्ती पक्षात जरी असेल तरी त्याच्याविरुद्ध बंड करण्यासाठी घाबरू नका. अन्यायाला विरोध करणे केव्हाही न्याय्य असून विकृत प्रवृत्तीविरुद्ध आंदोलन करण्यासाठी पक्षाच्या आदेशाची वाट पाहू नका, असेही त्या म्हणाल्या.

Leave a Comment