मोदी यांचा मूलगामी उपाय

modi
आपला देश गरीब का आहे याची अनेक कारणे सांगितली जातात. परंतु नेमके कारण सापडत नाही आणि कारण न सापडल्यामुळे मूलगामी उपाय होत नाही. प्रत्यक्षात अनेक उपाय योजले जातात आणि ते फसतात. आपल्या देशात पैसा आहे परंतु तो पैसा नीट वापरला जात नाही. त्याचा प्रभावी विनियोग केला जात नाही. उत्पादक वापर होत नाही. आपल्या देशातल्या लोकांनी सारे आर्थिक व्यवहार बँकेच्या मार्फतच करायचे असा निर्धार केला तर देशाचे चित्र बदलण्यास बरीच मदत होणार आहे. पण देशाचे करोडो लोक बँक या व्यवस्थेपासून दूर आहेत. त्यामुळे त्यांच्या हातातला पैसा त्यांच्याकडे खाजगीरित्या साठवला जातो आणि तो अनुत्पादकपणे तसाच त्यांच्याकडे राहतो. त्याऐवजी तो बँकेत ठेवला तर बँकेतून तो कोणाला तरी कर्जाच्या रुपाने मिळतो आणि ज्याला मिळतो तो त्यांचा उत्पादक वापर करून एक रुपयाचे दोन रुपये करतो. शिवाय तो ज्याचा पैसा आहे त्याला व्याजही मिळते. तेव्हा बँकेच्या मार्फतच व्यवहार करणे एवढा एक उपाय योजला तर देशाचे चित्र बदलून जाऊ शकते.

मलेशियामध्ये असा उपाय करण्यात आला होता तेव्हा तिथल्या लोकांना फार चांगला अनुभव आला. तेव्हा देशाचे उत्पादन वीस टक्क्याने वाढले. भारतात असे करता येणार नाही का? तसा कोणी गांभिर्याने विचारच केलेला नाही. आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिशेने विचार सुरू केलेला आहे. मोदी यांनी दृष्टीने आपल्या कल्पनेतल्या काही ठोस उपायांना सुरूवात केली आहे. आपण काही तरी असे ठोस निर्णय घेतले पाहिजेत की त्या एक दोन मोठ्या निर्णयांनीच अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. असा विचार त्यांनी सुरू केला आहे. त्यांनी पंतप्रधान होण्याच्या आधीच काही कार्यक्रम आपल्या डोळयासमोर ठेवले होते असे दिसते. त्यांचे प्रशासकीय तपशील तपासून आणि सरकारी काम करण्याच्या पद्धतीत बसवून ते एकेक निर्णय मोदी जाहीर करीत आहेत. भारताच्या पंतप्रधानांना स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करावे लागते आणि तो मोठा मान समजला जातो. या भाषणात पंतप्रधान देशाच्या विकासाच्या मोठ्या योजना जाहीर करीत असतात. नरेन्द्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवहाराला गती देणारी एक अतीशय क्रांतिकारक योजना तयार केली असून ती आता येत्या १५ तारखेला जाहीर केली जाणार आहे. या योजनेत १५ कोटी लोकांची बँक खाती उघडण्यात येणार आहेत. किमान काही रक्कम भरून खाते उघडले की, त्याला १ लाख रुपयांचा विमा काढून दिला जाणार आहे. हा गट विमा असेल. त्याशिवाय जो खाते उघडेल त्याला किमान पाच हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे.

देशातल्या लोकांची बँकेत खाती असली पाहिजेत आणि त्यांनी आपले सारे आर्थिक व्यवहार बँकांच्या मार्फतच केले पाहिजेत असे नेहमी सांगितले जाते पण देशातल्या करोडो लोकांचा बँक नावाच्या यंत्रणेशी आयुष्यात कधीच कसलाच संबंध येत नाही. त्यासाठी लोकांना अशा मार्गाने खाती उघडायला भाग पाडले पाहिजे. या गोष्टीचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर फार सखोल परिणाम होणार आहेत. आपण स्विस बँकांतून काळा पैसा परत आणण्याच्या गोष्टी बोेलत असतो पण आपल्या देशातला कर चुकवून वापरात आणला जात असलेला सारा काळा पैसा परदेशातच गेला आहे असे नाही. देशातही काळ्या पैशांची समांतर यंत्रणा आहे. तो काळा पैसा काळा न होता तो कर भरून वापरात यावा यासाठी अनेक उपाय सुचविले जात असतात. तो पैसा नंबर दोनचा न होता वापरात आला तर त्याच्या वापराची सरकारी नोंद होते आणि त्या व्यवहारावर सरकार कर लावून तो वसूल करू शकते. हे कसे करावे याचे अनेक मार्ग आहेत पण त्यातल्या त्यात लोकांना आपले सारे आर्थिक व्यवहार बँकांच्या मार्फत करायला लावणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. तसे झाल्यास काळा निर्माण होण्यावर मोठेच नियंत्रण येईल.

१५ कोटी बँक खाती एकदम निर्माण करण्याने काळ्या पैेशावर इलाज केल्यासारखे होणार आहेच. पण आपला पैसा आपण जेव्हा वापरत नसतो तेव्हा तो बँकेत ठेवावा ही शिस्तही लोकांना लागते. अशी शिस्त आर्थिक प्रगतीला मोठीच उपयुक्त ठरत असते. कारण आपला पैसा वापरात नसताना आपण बँकेत ठेवला तर तो कोणाच्या ना कोणाच्या वापरात येत असतो. तसा तो येतो तेव्हा त्या एका पैशाचे दोन पैसे होतात. बँकेत ठेवलेला पैसा वाढतो आणि देशाचा विकास होतो पण वापरात नसलेला पैसा आपल्या घरात ठेवला तर तो कुजतो. आता मोदी यांनी लोकांना बँकेत पैसा ठेवायला उद्युक्त करायचे ठरवले आहे. ही आर्थिक विकासाकडे घेतलेली मोठी उडी ठरणार आहे. असे खाते उघडणार्‍या प्रत्येकाला किमान पाच हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. ज्यातून तो आपला छोटा मोठा धंदा सुरू करून आपला रोजगार निर्माण करू शकेल. बचत गटाची चळवळ यशस्वी करणार्‍या बांगला देशातले प्रा. महंमद युनूस यांनी याच मार्गाने तिथल्या लोकांचा गरिबीशी सुरू असलेला लढा यशस्वी करून दिला आहे. नरेन्द्र मोदी यांचे हे पाऊल त्याच मार्गाने जाणारे आहे. हे पाऊल निश्‍चित करताना त्यांना फार मोठे अर्थतज्ञ असण्याची गरज नाही. व्यावहारिक शहाणपणाच्या जोरावर त्यांनी ही आयडिया काढली आहे आणि ती देशाच्या विकासाला चालना देणारी ठरणार आहे.

Leave a Comment