मलेशिया एअरलाईन्सचे बारसे नव्याने होणार

malaysia
गेल्या सहा महिन्यात दोन प्रवासी विमानांच्या अपघातग्रस्त होण्यामुळे संकटात आलेल्या मलेशियन एअरलाईन्सने नवीन नांव घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. पाठोपाठच्या दोन गंभीर अपघातांमुळे प्रवासी या एअरलाईन्सबाबत साशंक झाले आहेत आणि त्याचा विपरित परिणाम विमानकंपनीच्या व्यवसायावर झाला आहे. हा व्यवसाय पुन्हा पूर्वपदावर यावा यासाठी अनेक विकल्पांवर विचार सुरू असून कंपनीचे नांव बदलणे हा त्यातील एक आहे असे सांगितले जात आहे.

मलेशिया एअरलाईन्सला जागतिक संस्था बनविण्यासंबंधीही गंभीरपणे विचार केला जात आहे. ही संस्था संकटांची चाहूल घेऊन अगोदरच प्रवासी विमानांच्या उड्डाणांचे मार्ग निश्चित करेल. यात नव्याने विमान मार्ग निश्चित करण्याविषयीही प्रयत्न केले जाणार आहेत. व्यवसाय वाढीसाठी आऊटसोअर्सिंगचा विस्तार करण्याबाबतही विचारविनियम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार वास्तविक पहिल्या विमानाच्या म्हणजे एमएच ३७० च्या गुढरित्या बेपत्ता होण्यानंतरच हा विचार सुरू झाला होता. पाठोपाठ दुसरा अपघात म्हणजे बंडखोरांनी विमान मिसाईल डागून पाडण्याचा प्रकार घडल्यानंतर या विचाराला चालना मिळाली आहे.

मलेशियन एअरलाईन्समध्ये सरकारचा हिस्सा मोठा आहे त्यामुळे सरकारही या निर्णयात सहभागी होणार आहे.

Leave a Comment