दबावतंत्राला चोख उत्तर

congress
गेल्या महिन्याभरापासून अजित पवार फार गुरगुरायला लागले होते. विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसबरोबर वाटाघाटी करताना वाटा आपल्याला मिळाला पाहिजे आणि घाटा कॉंग्रेसचा झाला पाहिजे, असा त्यांचा सूर होता. ते सातत्याने जागा वाटपाचे सूत्र बदलण्याची मागणी करत होते. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने १११ आणि कॉंग्रेसने १७७ जागा लढवलेल्या होत्या. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बळ वाढत असल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला १४४ म्हणजे कॉंग्रेसच्या बरोबरीने जागा मिळाव्यात असा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आग्रह आहे आणि तो नको इतक्या तीव्रतेने व्यक्त होत होता. कॉंग्रेसकडून त्याला कोणी उत्तर देत नव्हते पण काल खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपले मौन सोडले आणि अजित पवार यांच्याएवढाच तीव्र आवाज काढून, सन्मानाची वागणूक मिळणार नसेल तर आम्हीसुध्दा २८८ जागा लढवू अशी गर्जना केली. खरे म्हणजे हे दोन्ही पक्ष आज पराभवाच्या एवढ्या गर्द छायेमध्ये आहेत की त्यानी कसलेही जागा वाटप केले तरी दोन्ही पक्षांचा दारूण पराभव होणार आहे. त्यामुळे या पक्षाची ही कुस्ती तोट्यातला वाटा कोणाला जास्त मिळावा यासाठीची आहे.

निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन मित्रपक्षातील जागावाटपाचा संघर्ष अधिक निकरावर यायला लागला होता. अजित पवार जास्त जागा मागत होते आणि कॉंग्रेसचे नेते त्यांच्या डरकाळ्या गुपचूप ऐकत होते पण काल मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडले, त्यांना तोंड उघडावे लागले. कारण कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनात राष्ट्रवादी कॉंग्रेसविषयी फार चीड आहे. पुण्यात काल पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता. या मेळाव्यात भाषणे करणार्‍या कॉंग्रेसच्या एकेका नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसविषयी एवढा तीव्र असंतोष व्यक्त केला की त्याची दखल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना घ्यावी लागली. कॉंग्रेसचा तळागाळातला कार्यकर्ता केवळ आजच नव्हे तर गेल्या १५ वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बाबतीत नाराजीची भावना बाळगून आहे. आपला स्वाभीमान गुंडाळून ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसशी युती केली जाऊ नये अशी मागणी हा कार्यकर्ता तेव्हापासून करत आहे. परंतु कॉंग्रेसचे नेते सबुरीचे धोरण स्वीकारतात. युती टिकवली पाहिजे अशी भूमिका घेत असतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सतत वरचढपणाची भाषा करतात. त्यामुळे कॉंग्रेसचे तळागाळातले कार्यकर्ते दुखावलेेले असतात. युतीतल्या दोन घटक पक्षांमध्ये आपला राजकीय प्रभाव वाढवण्याची स्पर्धा असतेच आणि तिच्यापोटी काही डावपेच लढवले जात असतात पण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अशा डावपेचांचा नेहमीच अतिरेक होत असतो.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर कॉंग्रेस बरोबर युती असल्याचे सांगत असतो परंतु स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजकारण जमेल तसे चाललेले असते. एका बाजूला कॉंग्रेसशी आघाडी करून आघाडी धर्माच्या गप्पा मारायच्या आणि जिल्हा परिषदेच्या पातळीवर सत्ता मिळवण्याची संधी मिळाली की सरळ भाजपाशी हातमिळवणी करायची असे राष्ट्रवादीचे दुटप्पी धोरण असते. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनात राष्ट्रवादीच्या या दुटप्पी धोरणामुळे नेहमीच विलक्षण चीड असते. पुण्यात काल झालेल्या कॉंग्रेसच्या मेळाव्यात या मनःस्थितीतच कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची मागणी केली. कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढला तर काहीही नुकसान होणार नाही अशी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची खात्री आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते विशेषतः अजित पवार १४४ जागांवर अडून बसले आहेत. जाहीरपणे ते तशी मागणी करत आहेत. त्यामुळे आघाडीत मतभेद निर्माण होत असतात. हे दिसत असूनही अजित पवार रेटून १४४ जागा मागत आहेत. त्यांनी असा जोर लावला की शरद पवार सबुरीची भाषा बोलतात म्हणजे या दोघांचे नाटक ‘मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर’ असे असते.

शरद पवार सबुरीची भाषा बोलत असले तरी त्यांचाही डोळा १४४ जागांवर आहेच. कॉंग्रेस पक्ष आता अडचणीत आहे तेव्हा त्याला कोपर्‍यात गाठून आघाडीत जास्त जागा पदरी पाडून घ्याव्यात असे शरद पवारांनाही वाटते. पण तसे पाहिल्यास कॉंग्रेस पक्ष अडचणीत आहे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसही काही फॉर्मात नाही पण काही ना काही अन्य कारणांमुळे राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले आहेत आणि ही संख्या कॉंग्रेसच्या दोन खासदारांपेक्षा मोठी आहे. एवढ्याच जोरावर पवार काका-पुतणे शिरजोरी करत आहेत. त्याला काल पुण्यात खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सडेतोड उत्तर दिले. दोन पक्षांची आघाडी ही राजकीय अपरिहार्यता आहे हे लक्षात घेऊनही मुख्यमंत्र्यांनी सन्मानपूर्वक वाटप झाले तरच आघाडी राहील, असे बजावले. कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीवरचा राग एवढा तीव्र होता की सौम्य प्रकृतीच्या मुख्यमंत्र्यानासुध्दा रुद्रावतार धारण करून राष्ट्रवादी कॉंग्रेसवर डोळे वटारावे लागले. वास्तविक पाहता राज्यातले वातावरण दोन्ही पक्षांना प्रतिकूल आहे. लोकसभेच्या निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे. मनमोहनसिंग यांच्या कुशासनानेमुळे दोन्ही पक्षांचा बोर्‍या वाजला आहे. आता हे नेते, मोदी लाट ओसरली आहे अशी आपल्या मनाची समजूत घालून घेत आहेत. पण वास्तवात मोदी लाट म्हणावी तशी ओसरलेली तर नाहीच पण महाराष्ट्रात राज्य सरकारच्या दुःशासनामुळे सरकारच्या विरोधातली मोदी लाटेपेक्षाही जबरदस्त लाट निर्माण झालेली आहे. या दोन पक्षांनी १०-१५ जागांसाठी संघर्ष केला आणि कोणीतरी कोणावर मात करून तेवढ्या जास्त जागा मिळवल्या तरी शेवटी निवडणुकीत दोन्ही पक्षांचा पराभव अटळ आहे.

Leave a Comment