महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची अवस्था मोठीच केविलावाणी झाली आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला विजय मिळाला पाहिजे असे अपेक्षेचे ओझे घेऊन ते आता मैदानात जोरदार फटकेबाजी करणार्या फलंदाजाच्या आवेशात उतरले आहेत. येत्या महिनाभरात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे आणि एवढ्या कमी वेळेत त्यांना धावा जमवायच्या आहेत. गेल्या दोन वर्षात जे काम झाले नाही ते वेगाने निर्णय घेण्याचे काम त्यांना करायचे आहे. म्हणजे आधीचे फलंदाज धडाधड बाद झाले आहेत. आधीची सारी षटके धावा न काढताच संपली आहेत. शेवटच्या दोन तीन षटकात धावांचा डोंगर उभा करायचा आहे. हे शक्य नाही हे त्यांनाही कळते आणि श्रेष्ठींंनाही कळते पण तरीही ते निकराने फटकेबाजी करीत आहेत. अशा फटकेबाजीला उसने अवसान आणून केलेली फलंदाजी असे म्हणतात. मुख्यमंत्र्यांची ही फटकेबाजी संघातल्या तळातल्या फलंदाजांसारखी होत आहे. फटके बसत आहेत पण धावा निघत नाहीत. निर्णय घेतले जात आहेत पण अंमलबजावणी होत नाही. तिजोरीत पैसे नाहीत. पैसा आणि साधने ही एक अडचण आहेच पण पक्षाच्या आमदारांचा आत्मविश्वास पूर्ण संपला आहे. मुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत आणि ते जेव्हा निर्णय घेतात तेव्हा त्यांच्या अंमलबजावणीसाठी उपमुख्यमंत्री पैसे देत नाहीत. त्यामुळे कामे होणार नाहीत आणि मते मिळणार नाहीत अशी सत्ताधारी नेत्यांची खात्री झाली आहे. नारायण राणे यांनी तर या निवडणुकीत कॉंग्रेसला ४० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असे स्पष्टच म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांची फलंदाजी
सत्ताधारी आमदारांचा या बाबत कानोसा घेतला असता त्यापैकी अनेकांनी नारायण राणे यांना कोणत्याही गोष्टीची अतिशयोक्ती करण्याची सवय असल्याचे लक्षात आणून दिले. नारायण राणे कॉंग्रेसला ४० जागा मिळतील असा अंदाज वर्तवत आहेत ही अतिशयोक्ती आहे. प्रत्यक्षात पक्षाला तोही आकडा गाठणे शक्य नसल्याचे त्यांना वाटते. एकंदरीत अवस्था वाईट आहे. गंमतीचा भाग असा की मुख्यमंत्र्यांना पक्षश्रेष्ठींनी अभय दिले असले तरी कोणत्या क्षणी काय होईल हे सांगता येत नाही. त्यांना हटवावे अशी जोरदार मागणी पक्षातूनच केली जात आहे. ती श्रेष्ठींनी फेटाळली असली तरी त्याचे परिणाम वाईट होणार आहेत. आता या क्षणी त्यांना हटवणे योग्य नाही. पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदावर ठेवून त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणे म्हणजे पराभवाला निमंत्रण देणे आहे हे पक्षश्रेष्ठींना कळते पण म्हणून त्यांना या घाईत केवळ दोन तीन महिन्यांसाठी बदलले तर तेही घातकच ठरणार आहे. नेतृत्वबदल करण्याने पराभवच आहे आणि न करण्यानेही पराभवच आहे. तेव्हा यातल्या कोणत्या स्थितीत जास्त मोठा पराभव होणार आहे याचा अंदाज श्रेष्ठींना घ्यावा लागत आहे.
यात आणखी एक घटक आहे. नेतृत्वबदल केला नाही तर असंतुष्ट नेते पक्षाला घातपात करणार आहेत. म्हणजे ही निवडणूक मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे तर हरावी लागणारच आहे पण अंतर्गत गटबाजीचाही या पराभवाला हातभार लागणार आहे. नारायण राणे यांच्या अंदाजाप्रमाणे निकाल तर लागणारच आहे पण तसा तो लागून आपली बत्तीशी खरी ठरल्याचे सिद्ध व्हावे यासाठी राणे यांच्यासारखे नाराज नारायण जीवापाड प्रयत्न करणार आहेत. नारायण राणे यांच्या मुलाला कॉंग्रेसच्याच नेत्यांनी पाडले असल्याचा त्यांचा आरोप आहे. आता ते या पराभवाचा बदला घेण्यासाठी कॉंग्रेसचे दहा तरी उमेदवार पाडून दाखवणार आहेत. एकेका नाराज मंत्र्याने दहा उमेदवार पाडले तरी पुरे आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका जिंकता येत नाहीत हे दाखवून देणे त्यामुळे शक्य होणार आहे. एकुण काय तर पराभव अटळ आहे. नेमके काय करावे याबाबत पक्षश्रेष्ठी बुचकळ्यात पडले आहेत. इकडे आड तिकडे विहीर म्हणजे काय याचा अनुभव येत आहे. त्यातून तूर्तास तरी मुख्यमंत्र्यांना हटवू नये असा निर्णय झाला आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण याबाबत सुदैवी ठरले आहेत असे वाटत आहे पण ते केवळ टिकले नाहीत तर त्यांच्या डोक्यावर अशक्य अशा अपेक्षांचे ओझे आहे. बिचारे बाबा प्राणापाड मेहनत करीत आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांची सगळ्यात मोठी अडचण अशी की, त्यांचे विरोधक त्यांच्यावर जेवढी टीका करतात त्यापेक्षा जास्त टीका राष्ट्रवादीचे नेते करतात आणि राष्ट्रवादीच्या टीकेपेक्षा कॉंग्रेसचेेच नेते जास्त टीका करतात. भाजपा-सेना युतीच्या तोफा कितीही धडाडल्या तरी त्यांचा रोख अधिकतर अजित पवारांवर असतो आणि युतीचे नेते सर्वसाधारणपणे सरकारला लक्ष्य करतात. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर युतीचा म्हणावा तेवढा तिखट मारा होत नाही. परंतु त्यांच्या कार्यशैलीवरून त्यांच्याच घरून त्यांना सारखे आहेर मिळत राहतात. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांची मोठी गोची होते. ती मोठी स्थितप्रज्ञ वृत्तीचे असल्यामुळे अरे रा कारे करून ते वाद वाढवत नाहीत आणि त्यांच्या त्या वृत्तीमुळे उलट त्यांचे विरोधकच उलट हतबल होऊन जातात. नारायण राणे यांनी आजपर्यंत पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात कितीतरी टीका केलेली आहे. परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी कधीही राणे यांच्या पातळीला जाऊन त्यांना उत्तर दिलेले नाही.
ते गेल्या दोन वर्षांपासून राज्याचा गाडा हाकत आहेत. ते स्वतः कितीही स्वच्छ असले तरीही त्यांच्या सरकारने भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचे बरेच प्रयत्न केलेले आहेत. अजित पवार यांचा सिंचन घोटाळा असो की अशोक चव्हाण यांचे आदर्श प्रकरण असो. नाहीतर कृपाशंकरसिंह यांच्यावर खटला भरण्याचा मुद्दा असो. एखादा चारित्र्यवान मुख्यमंत्री जितक्या तडफेने त्यांच्यावर कारवाई करील तेवढ्या तडफेने त्यांनी कारवाई केलेली नाही. भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा त्यांचा हा प्रयत्न व्यक्तीशः त्यांच्या मनाने केलेला असेल किंवा पक्षश्रेष्ठींच्या दबावाखाली केला असेल परंतु केला आहे आणि या बोटचेपेणाचे का होईना पण काही डाग त्यांच्या सदर्यावर पडले आहेत. त्यामुळेच डॉ. मनमोहनसिंग यांच्याप्रमाणेच पृथ्वीराज चव्हाण यांचीही प्रतिमा भ्रष्टाचाराला पाठिशी घालणारा पण स्वतः भ्रष्ट नसलेला मुख्यमंत्री अशी झाली आहे. त्यामुळे स्वच्छ मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कितीही गवगवा केला तरी त्यांच्या त्या प्रतिमेवर येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला आणि आघाडीला फार काही यश मिळवता येईल असे वाटत नाही.