अर्थव्यवस्थेला गती कशी येणार?

arth
आपला देश गरीब का आहे ? यावर आपण नेहमीच विचार करतो पण आपल्याला हे माहीत नाही की आपला देश गरीब आहे म्हणून गरीब आहे. आता देशाच्या गरिबीचे असे विचित्र कारण सांगायला काही डोके लागत नाही पण या कारणाचे मर्म जाणून घ्यायला मात्र डोके लागते. कारण आपल्या देशात जे गरीब आहेत त्यांना कायम गरीब ठेवण्याचाच प्रयत्न केला गेला आहे. त्यांनी गरीब रहावे आणि मदतीसाठी आपल्याकडे पहात रहावे, मग आपण त्यांना मदत करावी आणि त्यांनी त्या उपकारापोटी आपल्याला मते द्यावीत असाच प्रकार गेल्या अनेक वर्षात सुरू आहे. या गरीब लोकांना आहे तसे गरीब ठेवण्याऐवजी त्यांची स्थिती बदलावी असा प्रयत्न केला गेला असता तर त्यांच्या हातात चार पैसे आले असते आणि त्यांच्या राहणीमानात सुधारणा झाली असती. ती सुधारणा झाली की ते ग्राहकोपयोगी वस्तू, फळे, घरे, वाहने, चांगले कपडे यांची मागणी करायला लागतात आणि त्यांची मागणी वाढली की उत्पादन वाढून अर्थव्यवस्था सुधरायला लागते.

आपली अर्थव्यवस्था गती का घेत नाही ? या प्रश्‍नाने सर्वजण अस्वस्थ आहेत पण त्यांना या प्रश्‍नाचे योग्य उत्तर गवसत नाही कारण त्यांनी सारा विचारच चुकीच्या दिशेने सुरू केला आहे. त्यांच्या प्रश्‍नाच्या उत्तर शोधण्यात त्यांनी देशातल्या ६० टक्के जनतेला पूर्णपणे वगळलेले आहे. ती जनता म्हणजे शेतकरी आणि शेती व्यवसायावर अवलंबून असलेला वर्ग. हा वर्ग कायम गरीब राहिल्याने अर्थव्यवस्था गरीब आहे. हा परिणाम सगळ्याच क्षेत्रात जाणवतो. गेल्या काही वर्षात राज्यात सगळीकडे इंजिनियरिंग कॉलेजांचे पीक जोरदार आले होते पण आता ही महाविद्यालये बंद पडायची वेळ आली आहे. असे का झाले? १२५ कोटी लोकसंख्येच्या या खंडतुल्य देशात अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेेश घ्यायला मुले आणि मुली कमी का पडल्या ? आपली लोकसंख्या १२५ कोटी दिसत असली तरीही प्रत्यक्षात त्यातला केवळ १० टक्के वर्गच उच्च शिक्षण घेऊ शकतो. ९० टक्के वर्गाचा या शिक्षणाशी आणि त्या महागड्या अभ्यासक्रमांशी काही संबंध नाही. तो वर्ग एवढा गरीब आहे की, त्याला आपली मुले इंजिनियर झाली आहेत असे स्वप्न पाहणेही परवडत नाही. अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संगणक शास्त्राशी संबंधित असलेले अभ्यासक्रम त्यांच्या मुलांसाठी नाहीत. कारण, त्यांची तशी ऐपत वाढावी असा आपल्या राज्यकर्त्यांनी कधी विचारही केला नाही आणि त्यांच्यासाठी तशा योजनाही कधी आखल्या नाहीत.

क्रयशक्ती किमान पातळींवर असलेल्या अशा वर्गात शेतकरी हा वर्ग मोठा आहे. या ऐपत नसलेल्या ९० टक्क्यांत ६० टक्के शेतकरी आहेत. आपण शेतीमालाला जादा भाव देण्याचा कधी विचारच करीत नाही. उलट शेतकर्‍यांचा माल किती स्वस्तात घेता येईल याचाच विचार करीत असतो. कांदा २० रुपयांपेक्षा महाग झाला की आपल्या डोळयांना नकली पाणी येते आणि साखर एक दोन रुपयांनी महागली तरी आपले तोेड कडू पडते. आता आपल्या देशातल्या काही इंग्रजी वृत्तपत्रांनी टमाटे किती महाग झाले आहेत यावर बातम्या छापायला सुरूवात केली आहे. जणू काही टमाटे महाग होण्याने शहरातल्या लोकांवर आत्महत्या करण्याची पाळी येणार आहे. शेतीमाल थोडासा महाग झाला की शहरातले लोक महागाई महागाई म्हणून कोकलायला लागतात. पण त्यांना हे लक्षात येत नाही की, आपण उदार अंत:करणाने शेतीकडे पाहिले आणि हे कोकलणे थोडे बंद केले तर शेतकर्‍यांना बरे दिवस येतील आणि असे झाले तरच शेतकर्‍यांची मुले अभियांत्रिकी महाविद्यालयात येतील. आणि ती चालतील. शेतकरी हा शहरातल्या अशा अनेक सेवा आणि वस्तूंचा ग्राहक असतो. त्याची आर्थिक स्थिती सुधारली तरच शहरातल्या या सेवांना ग्राहक मिळून त्या चालतात. अन्यथा ओस पडतात.

शहरांतल्या दुकानात अनेक वस्तू विकायला येतात पण दसरा आणि दिवाळीच्या आधी त्यातल्या अनेक वस्तू भरपूर डिस्काऊंट देऊन विकाव्या लागतात. अनेक वस्तू एकावर एक फ्री देऊन खपवाव्या लागतात. कारण त्यांना चांगली क्रयशक्ती असलेले भरपूर ग्राहक मिळत नाहीत. शेतकरी श्रीमंत असता तर असा डिस्काऊंट देऊन माल खपविण्याची आपत्ती व्यापार्‍यांवर आली नसती. शेतकर्‍यांची क्रयशक्ती चांगली नाही म्हणजे निम्म्या देशाची क्रयशक्ती चांगली नाही. असा देशात क्रयशक्ती कायम कमी असणारा आणि आपले उत्पादन मातीमोलाने विकणारा एक वर्ग कायम राहिला तर देशातल्या अन्य औद्योगिक मालाला मागणी कशी येणार आणि मागणी नाही आली तर उत्पादन कसे वाढणार? उत्पादन वाढले नाही तर शहरातल्या कामगारांचा रोजगार कसा वाढणार? या सगळ्या गोष्टी शेतीमालाला चांगला भाव मिळण्याशी निगडित आहेत. तो चांगला भाव केवळ शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी नाही तर शहरांच्या अर्थव्यवस्थेसाठी फायद्याचा आहे. शहरांची समृद्धी ही केवळ शहरांवर अवलंबून नाही तर ती खेड्यांवर अवलंबून आहे. खेड्यातली समृद्धी शेतीमालाला मिळणार्‍या भावावर अवलंबून आहे. पण असा विचार न केल्याने आपल्या देशात अनेक प्रकारच्या अर्थव्यवस्था राबवूनही गरिबी कायम आहे.

Leave a Comment