खुनाच्या तपासातील विषयांतर

dabholkar
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला आठ महिने होऊन गेले, पण अजूनही त्यांचे खुनी सापडत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाची बेअब्रू होत आहे. तपास सुरू आहे असे सरकारी छापाचे उत्तर देऊन लोकांचे समाधान करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो, परंतु लोकांचे समाधान होण्याऐवजी अधिकाधिक चीड निर्माण होत आहे. मात्र आता दाभोळकरांचा खून कोणी केला, हा प्रश्‍न मागे पडला आहे. दाभोळकरांचे खुनी का सापडत नाहीत हाही प्रश्‍न मागे पडला आहे आणि खुनाचा तपास करण्यासाठी प्लँचेटचा उपयोग केला आहे की नाही, याच प्रश्‍नावर घनघोर वाद जारी झाला आहे. म्हणजेच या खुनाच्या तपासाची कहाणी एक वेगळे वळण घेऊन प्लँचेटच्या मुक्कामावर पोचली आहे आणि तिथे आता दाभोळकरांच्या मारेकर्‍यांऐवजी प्लँचेटच्या प्रयोगावरच ती रंगायला लागली आहे. महाराष्ट्राच्या पोलीस खात्याकडे उपलब्ध असलेल्या सगळ्या वैज्ञानिक साधनांच्या साह्याने तपास करून सुद्धा त्यांना खुनी सापडत नाहीत. त्यामुळे त्यांनी प्लँचेटसारख्या अवैज्ञानिक साधनांचा वापर करून खुनी शोधण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यातून वाद उत्पन्न झाला आहे.

ज्या दाभोळकरांच्या खुनाचा तपास होत नाही त्यांनी जन्मभर अशा अंधश्रद्धांच्या विरुद्ध झगडा दिला त्या दाभोळकरांच्या खुनाचा तपास करण्यासाठी शासन त्यांनी विरोध केलेल्या प्लँचेटसारख्या अवैज्ञानिक साधनांचा वापर करते यासारखी दुसरी विडंबना काय असेल? प्लँचेट या प्रयोगामध्ये एखाद्या गोष्टीचे उत्तर शोधण्यासाठी मृतात्म्याला पाचारण केले जाते आणि त्या मृतात्म्याला काही प्रश्‍न विचारून माहिती घेतली जाते. एखाद्या माणसाचा मृतात्मा डोळ्याला दिसत नाही. त्याचे अस्तित्व वस्तूरुपाने नसते. त्यामुळे तो कुठेही विहार करू शकतो असे भुताखेतावर विश्‍वास ठेवणारे लोक मानतात. तसाच प्रकार याही प्रयोगात झाला आणि सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे दाभोळकरांचे खुनी कोण आहेत याचे उत्तर शोधण्यासाठी या मांत्रिकाने पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्यासमोर प्लँचेटचा प्रयोग करून त्यावर खुद्द दाभोळकर यांच्याच आत्म्याला पाचारण केले आणि त्यांचे खुनी कोण आहेत अशी पृच्छा केली. महाराष्ट्र सरकारचे गृहखाते आणि पोलीस हे कमालीचे अकार्यक्षम आहेत. त्यामुळे गेल्या पाच-सहा वर्षात या खात्याकडे असलेल्या तपास कामात प्रगती होत नसल्यामुळे ती तपासाची कामे सीबीआयकडे सोपवली आहेत. सीबीआय कडे काम सोपवणे ही या तपास यंत्रणेसाठी दुर्दैवाची बाब आहे.

परंतु त्याचा कसलाही खेद गृहमंत्र्यांनाही वाटत नाही आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनाही वाटत नाही. वैध आणि शास्त्रीय मार्गांनी तपास करता येत नाही आणि हे पोलीस अधिकारी सेवानिवृत्त झालेल्या पोलीस कॉन्स्टेबल कम् मांत्रिकाची मदत घेऊन प्लँचेटवर तपास करत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रावर हा एक कलंक आहे. या प्लँचेटची सारी माहिती आऊटलूक या इंग्रजी साप्ताहिकात प्रसिद्ध झाली. आशिष खेतान या पत्रकाराने ही माहिती गोळा केली होती. या बातमीने खळबळ माजली. मात्र गुलाबराव पोळ यांना तोंड लपवावे लागले. आऊटलुकमधली माहिती ही सांगोवांगी प्रसिद्ध झाली असावी किंवा आपण केलेल्या प्लँचेटच्या प्रयोगाचा आशिष खेतानकडे कसलाही पुरावा नसणारच असे पोळ यांना वाटले. त्यांनी हा सारा प्लँचेटच्या प्रयोगाचा आरोप फेटाळून लावला. आरोप नाकारण्यातला आपला आत्मविश्‍वास अधिक प्रभावीपणे प्रगट व्हावा यासाठी त्यांनी आऊटलूक आणि आशिष खेतान यांच्यावर चक्क अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आणि हा दावा शंभर कोटींचा केला. प्लँचेटचा प्रयोग करणारा मांत्रिक आणि आपला काहीही संबंध नाही, आपण त्याला पाहिलेले सुद्धा नाही. आशिष खेतान याने आपल्यावर सर्वथा खोटा आरोप लावलेला आहे असे गुलाबराव पोळ यांनी या दाव्यात ठोकून दिले.

त्यांनी प्लँचेटचा प्रयोग केला हे खरे असले तरी त्याचे काही पुरावे असत नाहीत आणि त्यामुळे आऊटलूक आणि आशिष खेतान हे दोघेही अडचणीत येणार असाच सर्वांचा समज झाला होता. बर्‍याचवेळा काही पत्रकारांच्या बाबतीत असे होते. त्यांना खात्रीशीर माहिती मिळालेली असते पण पुरावे मिळाले नसल्यामुळे त्यांची पंचाईत होते आणि नंतर खुलासा करावा लागतो, दिलगिरी व्यक्त करावी लागते. आशिष खेतान यांच्या बाबतीत गुलाबराव पोळ यांच्या दाव्यामुळे असेच काही तरी होईल असे वाटत असतानाच आशिष खेतानने गुलाबराव पोळ यांना जबरदस्त टोला लगावला. त्याने या घटनेचे वार्तांकन करताना सार्‍या घटनांचे चित्रीकरण केलेले होते. त्यात गुलाबराव पोळ प्लँचेटचा प्रयोग कसा कसा केला हे सांगताना दिसतात. या सार्‍या बातम्या प्रसिद्ध झाल्या तेव्हा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी गुलाबराव पोळ यांच्या विरुद्ध पुरावा सापडल्यास कारवाई केली जाईल असे म्हटले होते. त्यांचाही समज पुरावे नसणार असाच होता. पण उपलब्ध पुराव्यामुळे पोळ यांच्याबरोबरच महाराष्ट्र सरकारही अडचणीत आले आहे. आपल्या खात्यामध्ये प्लँचेटचा प्रयोग होत असेल तर त्याची स्वत:हून गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याऐवजी ती टाळण्याकडेच सरकारचा कल होता, पण आता सरकार सुद्धा उघडे पडले आहे.

Leave a Comment