कॉंग्रेसपुढील संकटे

congress
कॉंग्रेस पक्षासमोर नारायण राणे यांनी संकट निर्माण केले आहे. असे त्यांचे मत आहे. ते संकट किती गंभीर आहे यावर वाद होऊ शकतो. परंतु ते आहे हे नक्की. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव का झाला याचे उत्तर शोधण्याच्या बाबतीत पक्षाच्या नेतृत्वाने टाळाटाळ चालवली असली तरी त्या पराभवाचे होणारे परिणाम काही टळणार नाहीत. ते परिणाम आता जाणवायला लागले आहेत. हरियाणा, महाराष्ट्र, आसाम, जम्मू काश्मिर आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांमध्ये पराभवानंतरची पळापळ सुरू झाली आहे आणि कॉंगे्रस पक्षासमोर पराभवामुळे उभा राहिलेला पेचप्रसंग अधिकाधिक गंभीर होत चालला आहे. नारायण राणे यांनी राजीनामा दिला असला तरी त्या राजीनाम्यामागची त्यांची मागणी मान्य करणे पक्षश्रेष्ठींना शक्य नाही. कारण त्यांची मागणी मान्य करून पृथ्वीराज चव्हाण यांना बदलावे तर त्याच पध्दतीने आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई आणि हरियाणाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांनाही बदलावे लागते. एवढे व्यापक बदल आणि तेही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर करणे पक्षाल परवडणारे नाही. अशा अवस्थेत नेतृत्वबदलाच्या मागणीवरून झालेले बंड आणि त्यातून निर्माण झालेले पेचप्रसंग कॉंग्रेस पक्ष कसे सोडवणार आहे हा प्रश्‍न आहे.

श्री. शर्मा हे ज्येष्ठ मंत्री आहेत. आसाममध्ये पक्षाच्या ७८ आमदारांपैकी ३२ आमदारांनी नेतृत्व बदलाची मागणी केली आहे. आज या अवस्थेत तरी पक्षश्रेष्ठींनी आसाममधल्या बंडखोरांना भीक घालायची नाही असे ठरवले आहे. पक्षश्रेष्ठींचा हा पवित्रा सध्याच्या अवस्थेत यथोचितच आहे. परंतु आसाममधले बंड सामान्य नाही. महाराष्ट्र आणि हरियाणातले बंड सामान्य आहे. हरियाणामध्ये एका ज्येष्ठ मंत्र्याने मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांचे नेतृत्व नाकारले आहे. आपण त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणार नाही कारण त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेतही पराभव झालेला आहे आणि विधानसभेतसुध्दा होण्याची खात्री आहे असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणून त्यांनी आमदारपदाचा राजीनामासुध्दा दिला आहे. विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे कॉंग्रेस पक्षातल्या बंडखोरांच्या हालचालींना आणि पक्षांतराला गती येत आहे. पक्षाचा पराभव अटळ आहे असे गृहित धरून कॉंग्रेसचे अनेक आमदार बाहेर पडण्याच्या विचारात आहेत. तूर्तास तरी पक्षाने म्हणजे राहुल गांधी यांनी खंबीर भूमिका घेण्याचे ठरवले आहे. राहुल गांधी यांच्या हाती केंद्रातली सत्ता असती तर त्यांच्या खंबीर भूूमिकेला काही अर्थ होता. त्यांचे आदेश न पाळणार्‍यांना ते शिक्षा करू शकत होते. पण आता त्यांच्या हातात काही राहिलेले नाही. त्यामुळे अनेक राज्यातल्या कॉंग्रेस संघटनांना गळती लागण्याची शक्यता आहे.

आसाम, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये पक्षाला बसलेले धक्के तसे पक्षाला सहन न होणारे आहेत. महाराष्ट्रात नारायण राणे यांचा धक्का बर्‍यापैकी जाणवणार आहे. फारसा नाही. पण आसाममध्ये मात्र शर्मा यांच्या मागे तब्बल ३२ आमदार आहेत आणि हे सगळे खंबीर राहिले तर तिथले गोगोई सरकार या क्षणाला अस्थिर होऊ शकते. हरियाणामध्येसुध्दा गंभीर पेचप्रसंग संभवतो. एरवी हा पेचप्रसंग फार जीवघेणा ठरला नसता. परंतु निवडणुकीच्या तोंडावर आणि विरोधकांचे आव्हान मोठे गंभीर होत असतानाच हा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यामुळे तो जीवघेणा ठरणार आहे. आसाममधल्या बंडातून तर फार मोठी उलाढाल होऊ शकते कारण बंडखोर मंत्री हिमंत बिश्‍व शर्मा हे उल्फा आणि आसू या संघटनांशी चांगल्यापैकी संपर्क साधून आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांना हा प्रश्‍न नीट सोडवता आला नाही किंवा ते नेतृत्वबदल न करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले तर आसाममधल्या कॉंग्रेस संघटनेची अवस्था आंध्र प्रदेशातल्या संघटनेसारखी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कॉंगे्रसला गेल्या आठवडाभरात संघटनेच्या पातळीवर मोठेच धक्के बसले आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये कॉंग्रेसच्या तिघा आमदारांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेससाठी हेही पक्षांतर चिंताजनक आहे. पण त्यापेक्षा चिंताजनक परिस्थिती जम्मू काश्मिरमधली आहे. तिथे नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेस यांची आघाडी होती पण ती आघाडी आता मोडली आहे आणि आगामी निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढणार आहे. जम्मू भागामध्ये कॉंग्रेसचे चांगले वर्चस्व होते पण ती जागा व्यापण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे मोठे प्रयत्न सुरू झाले आहेत. एका बाजूला नॅशनल कॉन्फरन्सशी दुरावा आणि दुसर्‍या बाजूला भाजपाचे आव्हान अशा दुहेरी कात्रीमध्ये कॉंग्रेस पक्ष सापडलेला आहे. सांसदीय पातळीवर कॉंग्रेसला मोठा दिलासा मिळावा असे काही घडत नाही. उलट तिथेही भाजपेतर विरोधी पक्ष कॉंग्रेसपासून फटकूनच वागत आहेत. त्यातच गेल्या दोन आठवड्यात घाऊक मूल्य निर्देशांक घसरल्यामुळे भाजपाची अडचण करण्याची संधीही कॉंग्रेसच्या हातून गेली आहे. न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात जो गौप्यस्फोट केला आहे त्यामुळे तर कॉंग्रेसच्या नीतीधैर्यावर मोठाच गंभीर पिरणाम झाला आहे.

Leave a Comment