राणेंची दबावनीती

rane1
नारायण राणे यांनी चार दिवसांपूर्वी जाहीर केल्याप्रमाणे राजीनामा दिला खरा परंतु आपण कॉंग्रेसला निर्णायक धक्का देऊ असा जो आविर्भाव आणला होता तसे काही केलेले नाही. अजून आपण पक्षात आहोत, आमदार आहोत आणि पक्षाची कामगिरी सुधारण्यासाठी राज्याचा दौरा करणार आहोत अशी विधाने करून पक्षश्रेष्ठींवर एक वेगळा दबाव कायम ठेवला आहे. म्हणजे अजूनही राणेंचा राजीनामा मागे घेतला जाऊ शकतो आणि त्यांची समजूत घातली जाऊ शकते. त्यांची कॉंग्रेस पक्षात निराशा झाली आहे. परंतु त्या निराशेपोटी ते पक्षाला निर्णायक धक्का देऊ शकत नाहीत अशी विचित्र कोंडी झाली आहे. त्यांना धड गप्पही बसवत नाही आणि बंडही करवत नाही. गप्प बसून अपमान सहन होत नाही आणि बाहेर पडून स्वाभीमान दाखवता येत नाही. अशा विलक्षण कोंडीमध्ये त्यांनी बराच गाजावाजा करून डोंगरातून उंदीर काढावा याप्रमाणे केवळ मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. खरे म्हणजे ते यापेक्षा काही करू शकत नाहीत पण आपण खरेच काहीतरी करू असे दाखवून देत त्यांनी आपण नंतर निर्णय घेऊ असे म्हणत वेळ मारून नेली आहे.

ते राजीनामा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला नाही असे सांगितले जात आहे. याची दोन कारणे आहेत. त्यांची समजूत घालण्यासाठी त्यांच्याशी काही बोलायला जावे तर राणे काहीही बोलू शकतात. अशा माणसाच्या तोंडाला लागण्यापेक्षा त्यांचा राजीनामा स्वीकारावा आणि त्यांना रामराम करावा असा सूज्ञ विचार मुख्यमंत्र्यांनी केला असावा. किंवा राणे यांनी गुरूवारी सोमवारच्या मुहूर्तावर राजीनामा देणार अशी घोषणा केली आणि सोमवारीच काय ते बोलणार असे जाहीर केेले पण दरम्यानच्या काळात त्यांना आपल्या बोलण्यावर संयम ठेवता आला नाही. त्यांनी आपण काय ते सोमवारीच बोलू असे म्हटल्यावर सोमवार पर्यंत मौन पाळायला हवे होते पण त्यांच्यात तो पोचच नाही. ते सोमवार येईपर्यंत उध्दव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, दीपक केसरकर यांच्या बाबतीत खरे तर विरोधात एवढे काही बोलले आहेत की सोमवारी बोलायला काही शिल्लक राहिलेले नाही. आपल्या राजीनाम्याचे कारण सांगताना त्यांनी चव्हाण यांच्यावरही आरोप केला आणि पक्षश्रेष्ठींवरही तोफ डागली. आता त्यांनी एवढे बोलून टाकलेच आहे आणि ते जाहीर झाले आहे तर त्यांच्याशी आता बोलण्यात मतलब काय असाही विचार मुख्यमंत्र्यांनी केला असावा. जाहीरपणे काही बोलण्या बाबत मुख्यमंत्री आणि राणे ही दोन टोके आहेत. त्यामुळेही असेल कदाचित पण मुख्यमंत्री त्यांच्याशी काही बोलले नाहीत.

नारायण राणे यांच्याबाबतीत पक्षाने काय ठरवले आहे हे अजून जाहीर झालेले नाही. परंतु गेल्या दोन दिवसातले समोर आलेले विचारमंथन काही वेगळीच दिशा दाखवत आहेत. नारायण राणे यांच्या बंडाला आणि तथाकथित धमक्यांना किंमत द्यायची नाही असे पक्षश्रेष्ठींनी ठरवलेले दिसत आहे. त्यामुळे उलट राणे यांची गोची झाली आहे. आपण राजीनामा देणार म्हणजे मोठा राजकीय भूकंप होणार आणि त्यामुळे पक्षश्रेष्ठी हादरून जाणार. आपल्या राजीनाम्यामुळे किंवा पक्षाबाहेर पडण्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होणार असल्यामुळे पक्षश्रेष्ठी आपल्या नाकदुर्‍या काढणार आणि तसे झाले की आपण आपल्या मागण्या मान्य करून घेणार असा त्यांचा हिशोब होता. त्यामुळे त्यांनी आधी जाहीर करून नाट्यमयरित्या राजीनामा देण्याचे सोंग तर आणले पण त्यांच्या सोंगाचा फार काही फायदा झाला नाही. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर केलेली काही विधाने म्हणजे महायुतीच्या फायद्यासाठी केलेली आहेत की काय असे वाटावे अशी स्थिती आहे.

मुख्यमंत्री पदावर पृथ्वीराज चव्हाण कायम राहणार असतील तर पक्षाचा येत्या विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव होणार आणि त्या पराभवाचा वाटेकरी होण्याची पाळी आपल्यावर येऊ नये यासाठी आपण मंत्रीपद सोडत आहोत असे राणे यांनी म्हटले आहे. नारायण राणे हे स्वतःला मोठे कर्तबगार मंत्री समजतात. ते जर एवढे कर्तबगार आहे तर उद्योगमंत्री म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कर्तबगारीने असे काही उद्योग का केले नाहीत की ज्यामुळे पक्षाला विजय मिळेल. तिथे त्यांची कर्तबगारी कुठे कमी पडली? नारायण राणे महाराष्ट्रातल्या पराभवाला मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरत आहेत. पण कॉंग्रेसचा पराभव काही फक्त महाराष्ट्रात झालेला नाही तर सार्‍या भारतात झालेला आहे. तेव्हा महाराष्ट्रातल्या पराभवाला मुख्यमंत्री जबाबदार असतील तर देशभरातल्या पराभवाला सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग हे जबाबदार आहेत, असे म्हणावे लागेल. अर्थात, राणे त्यावर काही बोलत नाहीत आणि तसा प्रश्‍न विचारला तर ते त्याचे उत्तर टाळतील. पण त्यांना कुठून तरी मुख्यमंत्र्यांना अकार्यक्षम ठरवून स्वतःला मुख्यमंत्री पदाचा राज्याभिषेक करून घ्यायचा आहे आणि तेवढ्याच एका गोष्टीसाठी त्यांची सारी धडपड चालली आहे. मात्र आपण मुख्यमंत्री झालो तर खचित विजय मिळेल अशी खात्री काही ते देत नाहीत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अकार्यक्षम असतील तर त्यांना हटवावे एवढीच त्यांची मागणी नाही. त्यांच्याऐवजी आपल्यालाच मुख्यमंत्री केले पाहिजे. ते २००३ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतेसुध्दा पण ते भाजपा-सेना युतीचे मुख्यमंत्री होते आणि युतीच्या हातातली सत्ता ते मुख्यमंत्री असतानाच गेलेली आहे.

Leave a Comment