पुणे स्फोटप्रकरणात एकास अटक

puneblast
पुणे – पुण्याच्या फरासखाना पोलिस चौकीजवळ दुचाकी वाहनात करण्यात आलेल्या स्फोटप्रकरणात पोलिसांनी एका दहशतवाद्याला अटक केली आहे. बशीर अहमद उर्फ गोगलू असे त्याचे नांव असून पोलिसांच्या चौकशीत त्याने तो हिज्बुल मुजाहिद्दीनशी संबंधित असल्याचे कबुल केले आहे. त्याचबरोबर मुंबईतील अन्य तीन ठिकाणीही स्फोट घडवून आणण्यात येणार होते अशी माहिती देतानाच पुणे स्फोटात त्याच्या अन्य तीन साथीदारांचा समावेश असल्याचेही पोलिसांना सांगितले आहे.

पुण्यात १० जूनला येऊन या तिघांनीही पाहणी केली होती असे समजते. मुंबई पोलिस मुख्यालयाजवळील विशेष विभागात बशीरची चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने कुलाबा, बांद्रा आणि जुहू येथेही बॉम्ब पेरले जाणार होते असे पोलिसांना सांगितले. अनेक तासांच्या चौकशीनंतर त्याने त्याच्या तीन साथीदारांची नांवे पोलिसांपुढे उघड केली असल्याचे समजते. पुण्यातील स्फोटाचा कट मुंबईतच शिजल्याची कबुलीही त्याने दिली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने यापूर्वीच या प्रकरणात दोन संशयितांना उत्तरप्रदेशातून अटक केली आहे.

पुण्यात १० जुलैला घडलेल्या या स्फोटात सहा जण जखमी झाले असून त्यात एका पोलिसाचा समावेश आहे. सीसीटिव्हीमुळे संशयितांची छायाचित्रे पोलिसांना मिळू शकली होती.

Leave a Comment