
लंडन : इंग्रजी भाषेतील जगातील पहिले छापील पुस्तक असलेल्या ‘द रेकुयेल ऑफ द हिस्ट्रीज ऑफ ट्रोय’ या पुस्तकाची लिलावात तब्बल ६ कोटी रुपयांना विक्री झाली आहे. लंडन येथे आयोजित लिलावादरम्यान एका अज्ञात संग्राहकाने हे पुस्तक खरेदी केल्याचे लिलावकर्त्या कंपनीच्या अधिकार्यांनी स्पष्ट केल्याचे वृत्त ‘द डेली एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राने दिले आहे.
५४0 वर्षांपूर्वीच्या पुस्तकाची ६ कोटी रुपयांमध्ये विक्री
‘द डेली एक्स्प्रेस’ या वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, लंडनमधील सुप्रसिद्ध सॉथबीज्ने आयोजित केलेल्या लिलावादरम्यान ‘द रेकुयेल ऑफ द हिस्ट्रीज ऑफ ट्रोय’ या पुस्तकाचा लिलाव करण्यात आला. इंग्रजी भाषेतील हे पहिलेच छापील पुस्तक असून, एका अज्ञात संग्राहकाने तब्बल १0 लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास ६ कोटी रुपयांना ते खरेदी केल्याचे अधिकार्यांनी सांगितले. तब्बल ५४0 वर्षांपूर्वी हे पुस्तक छापण्यात आले होते. मूळचे फ्रेंच भाषेतील असलेले हे पुस्तक १४६३ सालच्या सुमारास राऊल लेफेरव्हे यांनी लिहिले होते. त्यानंतर ब्रिटिश व्यापारी आणि लेखक असलेल्या विलियम कॅक्सटन यांनी उत्कट प्रेमावर आधारित असलेले हे पुस्तक भाषांतरित केले. कॅक्सटन यांनी ब्रिटनमध्ये पहिले छपाई यंत्र आणल्यानंतर या पुस्तकाच्या भाषांतर तसेच प्रकाशनाकडे खर्या अर्थाने लक्ष दिले. त्यांनी या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर करण्यास बेल्जियमच्या ब्रुगेस शहरात १४६८ मध्ये सुरुवात केली. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे १४७१ मध्ये हे पुस्तक त्यांनी जर्मनीच्या कोलोग्नी शहरात लिहून पूर्ण केल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
