व्यर्थ चर्चा

charcha
आपल्या देशातल्या लोकांना सतत कसली तरी चर्चा करण्याची फार आवड आहे. कोणी तरी काही तरी बोलते आणि चर्चेला गती येते. मागे जयराम रमेश यांनी शौच्यालयाचे महत्व पटवून देण्यासाठी, आधी शौच्यालय मग देवालय असे म्हटले होते. आता या वाक्यातला मथितार्थ वाईट नाही. पण त्यांनी यमक जुळविण्यासाठी देवालय शब्द वापरला आणि हिंदुत्ववाद्यांची डोकी भडकली. खरे म्हणजे या उद्गारामागचा ध्वन्यर्थ ओळखून घ्यायला पाहिजे, परंतु तो ओळखण्याच्या ऐवजी मोर्चे, निदर्शने यांचे सत्र सुरू झाले. तीच गोष्ट नरेंद्र मोदींची. नरेंद्र मोदींनी गुजरात दंगलीतल्या हत्यांविषयी सहानुभूती व्यक्त करताना, आपल्याला या हत्यांबद्दल वाईट वाटते असे म्हटले. आता हे म्हणणे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी एखादे कुत्राचे पिल्लू मेल्यामुळे आपल्याला वाईट वाटतेच ना, असे म्हटले. खरे म्हणजे हे उदाहरण होते, पण भाषेचे ज्ञान नसणार्‍या काही लोकांनी, मोदींनी मुसलमानांची तुलना कुत्र्याच्या पिलाशी केली अशी आवई उठवली आणि चर्चा सुरू झाली. म्हणून आता नरेंद्र मोेदी यांनी आपल्या मंत्र्यांना आणि खासदारांना उगाच जास्त न बोलण्याविषयी सूचना केली आहे.

ते स्वत:ही कसली विधाने करत नाहीत. त्यांचे सरकार सत्तेवर येऊन दोन महिने होत आले पण अजून तरी गदारोळ माजवेल असे वादग्रस्त विधान कोणीही केलेले नाही. अर्थात अशी विधाने मंत्री कधी करू शकतात? त्यांना काम नसेल तर ते विधाने करत बसतात. नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना अशी काही कामे लावली आहेत की त्यांना निरर्थक विधाने करण्यास सवडच राहिलेली नाही. परंतु त्यामुळे कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांना नव्या सरकारला घेरण्याची संधी मिळेनाशी झाली आहे. आता वेदप्रकाश वेदिक नावाच्या एका कथित पत्रकाराने पाकिस्तानात जाऊन हाफिज सईदची भेट घेतली आणि संसदेत डुलक्या काढणार्‍या राहुल गांधींसह अनेक विरोधी नेत्यांना सरकारला घेरण्याची संधी मिळाल्याचा साक्षात्कार झाला. हाफिज सईद हा पाकिस्तानातल्या जमात उद दावा या संघटनेचा प्रमुख असून २६/११ ला मुंबईत झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार आहे. पाकिस्तान सरकारने त्याच्यावर कडक कारवाई करावी अशा आपल्या सरकारचा तगादा आहे. एका बाजूला हा मोस्ट वॉन्टेड टेरेरिस्ट भारत सरकारच्या डोळ्यात सलत असताना दुसर्‍या बाजूला भारतातला एक कोणीतरी पत्रकार उठतो आणि त्याची मुलाखत घेऊन येतो म्हणजे हा देशद्रोहच झाला. तेव्हा या वेदिक नावाच्या पत्रकाराने असा देशद्रोह केलेला असून सुद्धा सरकार त्याला काहीच करत नाही असे म्हणून कॉंग्रेसच्या नेत्यांनी संसदेत गोंधळ घालायला सुरुवात केली.

काही वृत्तपत्रांनीही वेदिकवर टीका केली आणि काही माध्यमांनी त्यावर चर्चा घडवून उलट सुलट विचारांना संधी देऊन टाईमपास केला. या घटनेच्या दोन बाजू विचारात घेतल्या पाहिजेत. पहिली म्हणजे मुळात अशी मुलाखत घेणे योग्य आहे की नाही? घेतली असल्यास तो देशद्रोह ठरतो का? आणि दुसरी म्हणजे तो देशद्रोह ठरत असेल तर त्या देशद्रोहाबद्दल सरकारला दोषी धरता येईल का? या दोन्ही अंगांनी देशातल्या माध्यमांनी आणि अनेक नेत्यांनी विलक्षण गोंधळ निर्माण करणारी विधाने केली आहेत. पत्रकारांनी कोणाची मुलाखत घ्यावी याला काही बंधन नाही आणि ही गोष्ट बर्‍याच संपादकांनी मान्य केली आहे. पत्रकारांनी मुलाखत घेण्यास हरकत नाही, तो देशद्रोह नाही. परंतु अशा देशद्रोही माणसाला मदत केली, सहकार्य केले किंवा त्याचे समर्थन केले तर मात्र तो देशद्रोह ठरेल. वेदप्रकाश वेदिक यांनी यापैकी काही केलेले नाही. देशातल्या अनेक पत्रकारांनी अनेकवेळा नक्षलवाद्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. तो त्यांच्या पत्रकारितेचा एक भाग होता. परंतु राजनीतीचा एक भाग म्हणून सुद्धा काही पत्रकारांनी आणि सरकारी सेवेत नसलेल्या राजनितीज्ञांनी दहशतवाद्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत.

मिझोराम आणि नागालँड या दोन्ही राज्यातील दहशतवादाचा प्रश्‍न सोडवताना काही खाजगी व्यक्तींनी सरकारच्या प्रोत्साहनाने परदेशात जाऊन या दोन राज्यातल्या अतिरेकी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा केलेल्या आहेत. तेव्हा ते कृत्य देशद्रोहाचे ठरले नव्हते, पण आज हाफिज सईदला केवळ भेटणे हे कसे काय देशद्रोहाचे ठरत आहे हे कळत नाही. मिझोराम, नागालँड, आसाम हे प्रश्‍न सोडवताना घेतल्या गेलेल्या अशा मुलाखती राजीव गांधी यांच्या सूचनेनुसार घेतल्या गेल्या होत्या. पण आज मात्र हेच कॉंग्रेसचे नेते एका पत्रकाराने एका दहशतवाद्याची मुलाखत घेणे हे कृत्य अनुचित ठरवून संसदेत गोंधळ घालत आहेत. वेदप्रकाश वेदिक हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे असाही शोध राहुल गांधी यांनी लावला आहे. त्याशिवाय काही वृत्तपत्रांनी वेदिक हा रामदेव बाबाचा माणूस असल्याचे नमूद केले आहे आणि तो रामदेव बाबाचा माणूस आहे आणि रामदेव बाबांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिलेला होता, म्हणजेच वेदिक हा भाजपाचा माणूस आहे. भाजपाने डोक्यावर चढवलेला माणूस आहे असाही शोध लावला आहे. खरे म्हणजे हे सारे बादरायण संबंध आहेत. रामदेव बाबांनी एका निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिला म्हणून ते कायम भाजपाचे ठरत नाहीत आणि त्यांची म्हणून असलेली माणसेही भाजपाची ठरू शकत नाहीत. विशेष म्हणजे खुद्द वेदिक यांनीच आपला संघाशी संबंध नाही असा खुलासा केला आहे. उलट आपले संघापेक्षा कॉंग्रेसशी जास्त संबंध आहेत आणि इंदिरा गांधी यांनी आपला अशा राजकीय कामांसाठी जास्तीत जास्त वापर केलेला आहे असे स्पष्ट केले आहे. राहुल गांधी आणि कॉंग्रेसच्या खासदारांनी संसदेत या प्रश्‍नावरून गोंधळ घालण्याआधी निदान वेदिक हा कोणाचा माणूस आहे याची साधी चौकशी तरी करायला हवी होती. पण विरोधी पक्ष म्हणून करावयाच्या कामगिरीच्या बाबतीत राहुल गांधी किती सुमार दर्जाचे आहेत हेच त्यांनी स्वत: सिद्ध करून दिले आहे.

Leave a Comment