कडधान्यांच्या डाळी करण्याचा उद्योग

grains
शेती मालावर कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जाऊ शकतात याची तांत्रिक आणि अन्य माहिती देणारी बरीच पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. ती पुस्तके घेतल्यास बरीच नवी माहिती शेतकर्‍यांना मिळू शकते. अशा प्रकारच्या उद्योगाची केवळ अर्थशास्त्रीय माहिती या ठिकाणी देत आहे. शेतकर्‍यांना निरनिराळे प्रक्रिया उद्योग सुचवणे हाच केवळ यामागचा हेतू आहे. बाकीचे तपशील शेतकर्‍यांनी स्वत: मिळवायचे आहेत. तसे ते शेतकरी स्वत: मिळवायला लागले की त्यांना धंद्यातल्या सगळ्या गोष्टी कळायला लागतात. कृषी प्रक्रिया उद्योग हा ङ्गार मोठा उद्योग आहे. मात्र या अगदी सामान्य शेतकर्‍यांना ङ्गारशी गुंतवणूक न करता जे उद्योग करता येऊ शकतात तेच देत आहे. शेतकरी कधी असा विचारच करीत नाहीत. म्हणून ते मागे पडतात. असा उद्योग सुचवताना एक साधा उद्योग परंतु जो शेतकर्‍यांनी उपेक्षिलेला आहे तो सुचवायचा आहे. तो म्हणजे, आपल्याच शेतामध्ये पिकणार्‍या कडधान्यांच्या डाळी तयार करून विकणे. आपण शेतात तुरी पिकल्या की, त्या तशाच बाजारात नेऊन विकतो आणि जो व्यापारी त्या तुरी विकत घेतो तो त्या तुरीची डाळ करून दुप्पट किंमतीने विकतो. त्यात त्याला भरमसाठ कमाई होते. परंतु शेतकरी मात्र आपण स्वत:च डाळ तयार करून का विकू नये, असा विचार करत नाही. परंतु शेतकर्‍यांनी तुरी, हरभरा, मूग आणि उडीद या कडधान्यांच्या डाळी करूनच विकायच्या, असा निश्‍चय केला तर ते चांगले पैसे कमवू शकतात.

तुरीचे आपल्याला मिळणारे पैसे आणि डाळीला येणारा भाव यांचा तुलनात्मक अभ्यास करून शेतकर्‍यांनीच यातले ङ्गायदेशीर कोणते हे ठरवावे. तुरीच्या एक क्विंटलच्या पोत्यामागे ८० किलो डाळ तयार होते. पूर्वीच्या काळी कडधान्ये पिकविणारे शेतकरी आपल्या गरजेपुरती का होईना पण घरीच डाळ तयार करून घेत होते. डाळ तयार करण्याचे तंत्र काही अवघड नाही. वर्षानुवर्षे ते आपल्याला माहीत झालेले आहे. त्यासाठी कसलीही गुंतागुंतीची यंत्रसामुग्री आणावी लागत नाही. जर स्वत:च डाळ तयार करून ती आठवड्याच्या बाजारात उभे राहून विकली तर तुरीच्या पैशापेक्षा दीड ते दोन पट जास्त पैसे मिळतात. एका क्विंटलची ८० किलो डाळ तयार होताना २० किलो कळणा आणि भुस्सा तयार होतो. तो सुद्धा बाजारात विकला जात असतो. परंतु ज्या शेतकर्‍याकडे दुभती जनावरे असतील त्यांना तो खाऊ घालता येतो. म्हणजे शंभर किलो तुरीची ८० किलो डाळ तयार झाली म्हणून २० किलो भाग काही वाया जात नाही.

Leave a Comment