थेट लक्ष्य राहुल गांधी

rahul
कॉंग्रेस पक्षात आता पराभवावरून राहुल गांधी यांच्यावर टीका होण्यास सुरुवात झालेली होतीच पण आता त्यांना नाव घेऊन थेट आणि स्पष्ट शब्दात दोषी धरण्याची मोहीम सुरू होणार अशी चिन्हे दिसायला लागली आहेत. खरे तर राहुल गांधी २०१० पासून बिहार, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांत सपशेल अपयशी ठरले होेते पण तेव्हा कोणी सावध झाले नाही. ते लोकसभेच्या निवडणुकीत उतरले की, त्यांच्याकडे काही योजनांचे जनकत्व देता येईल आणि काही सुधारणांना तेच जबाबदार असल्याचे चित्र निर्माण करून ही लोकसभा निवडणूक पदरात पाडून घेता येईल असा हिशेब त्यांच्या सल्लागारांनी केला होता पण तो फसला. आता ते नेता म्हणून अजीबात कामयाब होणार नाहीत असे उघडपणे दिसायला लागले आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरचे हल्ले वाढण्याची चिन्हे दिसायला लागली आहेत. ते कॉंग्रेसला नेतृत्व देऊ शकत नाहीत ही गोष्ट सातत्याने सिध्द करण्याचा चंग राहुल गांधींनीही स्वतःच बांधला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी तसे दाखवून दिले.

सध्या कॉंग्रेस पक्षाने महागाई हा विषय फार प्रतिष्ठेचा करून मोदी सरकारला त्या विषयावरून सळो की पळो करण्याचे ठरवले आहे. परंतु या विषयावर लोकसभेत कॉंग्रेसचा एक खासदार शिरा ताणून बोलत असताना राहुल गांधी त्याच्या मागच्या बाकावर बसून चक्क डुलक्या घेत होते आणि त्यांची ही डुलकी काही कॅमेर्‍यांनी टिपली. या फटफजितीने शरमिंद्या झालेल्या कॉंग्रेसच्या खासदारांनी नंतर सारवासारव केली. राहुल गांधी झोप घेत नव्हते तर चिंतन करत होते असे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु राहुल गांधी हे किती मोठे चिंतक आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. तसे स्पष्टपणे सांगणारा घरचा आहेर लगेच आज राहुल गांधीं यांना मिळाला. कॉंग्रेसचे नेतृत्व सोनिया आणि राहुल गांधी यांच्या हातात आहे आणि या दोघांकडेही दूरगामी दृष्टिकोन नाही. पक्षाला दिशा देण्याची क्षमता राहुल गांधींमध्ये नाही. त्यामुळे आता हळूहळू राहुल गांधींच्या विरोधातील सूर अधिक मोठा व्हायला लागला आहे. उत्तर प्रदेशातील कॉंग्रेसचे माजी खासदार गुफरान आझम यांनी आता राहुल गांधींना सरळ सरळ आव्हानच दिले आहे. राहुल गांधी यांनी फार मोठी परंपरा असलेला कॉंग्रेस पक्ष संपवला आहे, असे आझम यांनी पत्रकारांशी बाेलताना सरळ सरळ स्पष्ट शब्दात सांगितले आहे. राहुल गांधी हे आमचे नेते आहेत. परंतु त्यांची संभावना पप्पू, मुन्ना किंवा युवराज अशा शब्दात होते. तेव्हा आम्हाला शरमेने मान खाली घालावी लागते. अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात कॉंग्रेसचा दारूण पराभव होईल असे म्हटले होते. ते त्यांनी खरे करून दाखवले आहे. कॉंग्रेस पक्षाला चिरडून टाकण्याची घोषणा त्यांनी सत्यात उतरवली आहे. नरेंद्र मोदी हे सारे करत होते तेव्हा पर्यायी नेता म्हणून राहुल गांधी तोडीस तोड नेतृत्व देऊ शकले नाहीत. त्यामुळे पक्षाचा पराभव झाला. याबद्दल गुफरान आझम यांनी खेद व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांना पक्षाच्या एखाद्या नेत्याने असे आडवे घेण्याची ही तशी पहिलीच वेळ आहे. त्यांनी राहुल गांधींवर परखडपणे आरोप केले आहेत. राहुल गांधी युवक कॉंग्रेसचे नेते म्हणून काम करत होते तेव्हा आणि त्यांच्याकडे कॉंग्रेसची सूत्रे दिली गेली तेव्हाही आपण पक्षाचा पराभव होणार असे पक्षश्रेष्ठींना बजावले होते. २००५ साली तर त्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना एक पत्र लिहून पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांच्या चमचेगिरीवर आसूड ओढले होते. गुरफान आझम हे आपल्या भावना स्पष्टपणे कळवण्यासाठी सोनिया गांधींना भेटू इच्छित होते. पण त्यांना ५ वर्षे भेट मिळाली नाही. ते काही किरकोळ कार्यकर्ते नव्हते. तेव्हा ते पक्षाचे खासदार होते. मात्र पक्षाच्या खासदारालासुध्दा पक्षाध्यक्षा ५ वषर्े भेट देत नाहीत हा सोनिया गांधींचा जनसंपर्क त्यांनी वृत्तपत्रांना कळवला होता.

इकडे त्याचवेळी राहुल गांधी पक्षाच्या संघटनेत क्रांतीकारक बदल आणण्याच्या वल्गना करत होते. आता पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा आवाज ऐकला जाईल, त्यांचे म्हणणे समजावून घेतले जाईल असे सांगत राहुल गांधी पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यंाना फटकारत होते. पण दुसर्‍या बाजूला एका कार्यकर्त्याला आपले म्हणणे मांडण्यासाठी पक्षाध्यक्षांची भेट ५ वर्षे होऊ शकत नव्हती. राहुल गांधी यांच्या वल्गनातील हा ढोंगीपणा स्पष्ट झाल्यानंतर इरफान आझम यांनी सोनिया गांधी यांच्या भेटीचा नादच सोडून दिला. पक्षाच्या नेत्यांची प्रशंसा करणारे आणि त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळणारे नेते त्यांना पटकन भेटू शकतात पण पक्षाच्याच हिताच्या काही गोष्टी परखडपणे सांगून पक्षातल्या अनुचित प्रवाहांविषयी सावध करू इच्छिणार्‍या पाच-पाच वर्षे भेट मिळू शकत नाही यावरून कॉंग्रेस पक्षात कार्यकर्त्यांना काय किंमत आहे हे समजत होते. एकंदरीत कॉंग्रेस पक्षही काही टवाळखोर आणि चुगलीखोर लोकांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली होती असे दिसते. राहुल गांधी यांची भाषणे अतीशय पोरकटपणाची असत आणि त्यावरून त्यांची टिंगल होत असे. परंतु त्यांच्या सभोवतालचे खुषमस्करे त्यांची भाषणे फार उत्तम झाल्याचे अभिप्राय देऊन त्यांची चक्क फसवणूक करत होते. परंतु राहुल गांधी यांना खोटी स्तुती आणि खरी स्तुती यातला फरक कळत नव्हता त्यामुळे तेही भ्रमातच वावरत होते.

एखाद्या मतदारसंघातला उमेदवार यापुढेच कार्यकर्ते मतदानाने ठरवतील असा एक नवीनच प्रयोगच राहुल गांधींनी केला होता. मात्र तो केवळ लातूर आणि वर्धा या दोनच मतदारसंघात राबवला गेला. तिथेही मारामार्‍याच झाल्या. मात्र दोन्ही ठिकाणचे उमेदवार पराभूत झाले. राहुल गांधींच्या तथाकथित क्रांतीकारक कार्यक्रमाची अशी फटफजिती झाली. परंतु त्यांना तसे स्पष्ट बोलणार कोण ? आता हळूहळू आवाज उमटायला लागले आहेत.

Leave a Comment