शरद पवारांचा कॉंग्रेसला इशारा, विधानसभा निवडणूक सोपी नाही

pawar
मुंबई – लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दारुण पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीला सहजासहजी विजय मिळवणे कठीण असले तरी ते अशक्य नाही, असे सांगत, विधानसभा निवडणूक तितकीशी सोपी नाही, असेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होत़े

लोकसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी नरेंद्र मोदी आणि भाजपला पाठिंबा दिला. गेल्या महिनाभरातील मोदी सरकारच्या कारभारावर जनता फारशी समाधानी नाही, असे सर्वेक्षणातून आढळले आहे. कोणत्याही सरकारच्या कारभाराचे महिनाभरात मूल्यमापन करणे चुकीचेच ठरेल, पण महागाई, रेल्वे भाडेवाढ, एकूणच देशातील परिस्थिती लक्षात घेता ‘शितावरून भाताची परीक्षा करता येते’ असे पवार यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीसाठी वातावरण एकतर्फी नाही, असेच पवार यांनी सूचित केले. भाजपने प्रचाराच्या काळात लोकांच्या अपेक्षा एवढय़ा वाढविल्या आहेत व त्या पूर्ण न झाल्यास त्याची निश्चितच प्रतिक्रिया उमटेल याकडे त्यांनी लक्ष वेधले.लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरून सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना, यापूर्वी दोनदा काँग्रेस सरकारच्या काळात विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवण्यात आले होते याची आठवण पवार यांनी काँग्रेसला करून दिली. विविध नियुक्त्यांसाठी सरकारमधील समित्यांमध्ये विरोधी पक्षनेते हे सदस्य असतात. काँग्रेसने ६० खासदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले असल्याने याबाबत विचार झाला पाहिजे. राज्य विधानसभेत समाजवादी काँग्रेसकडे पूर्ण संख्याबळ नसतानाही शेकाप आणि अन्य छोटय़ा पक्षांच्या गटाचा नेता म्हणून आपली विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली होती, असेही पवार यांनी सांगितले.

Leave a Comment