भुजबळ शिवसेनेत जाणार या बातमीचा शरद पवारांनी घेतला खरपूस समाचार

sharad-pawar
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याचे वृत्त चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुक काँग्रेससोबतच लढवू व जागावाटपाचा प्रश्न दिल्लीत हायकमांडशी चर्चा करून सोडवू असेही सांगितले. याच बरोबर स्वबळाची भाषा करणा-या अजित पवारांनाही इशारा देत पक्षाचा अध्यक्ष मी आहे असे सुनावले.

पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीतमुस्लिम समाजाचे नेते व काँग्रेसचे माजी खासदार मौलाना ओबेब्दुल्लाह आझमी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर पवारांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, आजकाल बातम्या तयार करणारे कारखाने तयार झाले आहेत. काही काम नसताना रिकामटेकडेपणान ही टेबल न्यूज बनविल्याचे दिसते आहे. त्यामुळे याबद्दल फार काय बोलावे असे नाही. मात्र छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार हे वृत्त चुकीचे आहे. ते कोठेही जाण्याचा प्रश्नच येत नाही.

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सामूहिक नेतृत्त्व मी करावे असा काँग्रेस कार्यकारिणीचाच आग्रह होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाबाबत दिल्लीत 3 बैठका झाल्या. त्या बैठकांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित नव्हते, असा टोलाही चव्हाणांना पवारांनी हाणला. काँग्रेसने पवारांना आघाडीचे नेतृत्त्व करण्यास सांगितले नव्हते असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी शुक्रवारी म्हटले होते. त्याला पवारांनी उत्तर दिले.

Leave a Comment