पवारांच्या बारामतीतच पाण्याची भीषण टंचाई

baramati
बारामती – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याची वेळ ओढवली आहे.

बारामती शहर दिवसेंदिवस विस्तारत असल्याने नागरीकरण मोठ्याप्रमाणावर वाढले आहे मात्र त्या तुलनेत पाणीपुरवठा योजना सक्षम नसल्याची स्थिती आहे,त्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने धरणातील पाणी साठा खालावल्याने दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन बारामती नगर परिषदेने केले असून तसे वेळापत्रकच जाहीर केले आहे. आधीच पाण्यावरून शिवसेनेचे आमदार विजय शिवतरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कलगीतुरा सुरु आहे, पुरंदर उपसा जलसिंचनचे बारामतीला का येवू दिले जात नाही यावरून राजकीय आरोप -प्रत्यारोपांचे फड रंगत आहेत.

नीरा डावा कालव्याचा प्रवाह बंद झाला असून वीर भाटघर धरण क्षेत्रात पाऊस नसल्याने संपुर्ण बारामती शहरात दि. 12 जुलै 2014 पासून दोन दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे.सिनेमारोड, कचेरी रोड, पानगी, सटवाजीनगर, नेवसेरोड, इंदापूर रोड, मार्केट यार्ड रोड, संपूर्ण आमराई, हंबीरबोळ, हरिकृपानगर, सिध्देश्‍वरगी, महावीर पथ, शंकर भोई तालीम परिसर, बुरुड गी, तसेच साईगणेश नगर, मयुरेश्‍वर अपार्टमेंट, आनंदनगर, अकल्पित हौ. सो., विजयनगर, पोस्टरोड, तावरे बंगला परिसर, विश्राम सोसा., जवाहरनगर तसेच संपुर्ण आमराई विभागास दि. 12पासून दर दोन दिवसानंतर म्हणजेच 12 जुलै, 15 जुलै, 18 जुलै रोजी अशा पध्दतीने पाणीपुरवठा होईल असे नगरपरिषदेने जाहीर केले असून नीरा कालव्यात पाणी उपलब्ध झाल्यास पाणीपुरवठा पूर्ववत होईल असे म्हटले आहे,मात्र त्यामुळे बारामतीकर संतप्त झाले आहेत.

Leave a Comment