
पुणे – पुणे पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात झालेला बॉम्बस्फोट दहशतवादी हल्ला असल्याचे प्राथमिक तपासावरून दिसत असल्याचे एटीएसने शुक्रवारी सांगितले. या बॉम्बस्फोटाचा तपास एटीएस करीत असून, त्यांच्याकडून शुक्रवारी काढण्यात आलेल्या निवेदनात स्फोटाच्या तपासाबद्दल माहिती देण्यात आली आहे.
एटीएसचे स्पष्टीकरण ,पुण्यातील बॉम्बस्फोट दहशतवादीच हल्ला
स्फोटाच्या तपासासाठी दहा पथके तैनात करण्यात आली असून, याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षीदारांचे जबाबही नोंदविण्यात येत असून, घटनास्थळी सापडलेले पुरावे तपासासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी झालेल्या या स्फोटामध्ये सहाजण जखमी झाले होते. या स्फोटाची तीव्रता कमी असली, तरी त्यामध्ये कोणते रासायनिक पदार्थ वापरण्यात आले होते, याचाही शोध घेतला जातो आहे. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील आणि पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी गुरुवारी रात्रीच घटनास्थळाला भेट देऊन पोलीस अधिकाऱयांची बैठक घेतली होती. दरम्यान, या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
