वकील पल्लवी पुरकायस्थ हत्याप्रकरणी सुरक्षारक्षक दोषी

pallvi
मुंबई – मुंबईतील सत्र न्यायालयाने पल्लवी पुरकायस्थ या वकिल तरुणीच्या हत्येप्रकरणी सुरक्षा रक्षक सज्जाद पठाणला दोषी ठरवले आहे. ३ जूलै रोजी पठाणला शिक्षा सुनावली जाणार आहे.

मुंबईतील वडाळा परिसरातील हिमालयन हाईट्स या सोसायटीत राहणा-या पल्लवी पुरकायस्थ या तरुणीची राहत्या घरी ऑगस्ट २०१२ मध्ये हत्या झाली होती. तीक्ष्ण हत्यारांनी वार करुन पल्लवीची हत्या केल्याचे उघड झाले होते. एका खासगी कंपनीत वकिल म्हणून पल्लवी ही कार्यरत होती. हिमालयन हाईट्समध्ये पल्लवी एका वकिल तरुणासोबत लीव्ह इन रिलेशनमध्ये राहत होती. या प्रकरणात सुरुवातीला पल्लवीच्या परिचयातील व्यक्तींचा या हत्येत हात असण्याचा कयास होता. मात्र पल्लवीची हत्या इमारतीचा सुरक्षारक्षक सज्जाद पठाणने केल्याचे पोलिस तपासात समोर आले. पल्लवीवर सज्जादची नजर होती. पल्लवी घरात एकटी असताना सज्जादने तिच्या घरात प्रवेश करून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र सज्जादला पल्लवीने विरोध दर्शवल्यावर तिची हत्या केली होती.

आज याप्रकरणावर मुंबई सेशन्स कोर्टाने निकाल दिला. सज्जादला बलात्काराचा प्रयत्न, हत्या या कलमांतर्गत कोर्टाने दोषी ठरवले असून शिक्षेची सुनावणी ३ जूलै रोजी होणार आहे. या खटल्यात सरकारी वकिल म्हणून उज्वल निकम यांनी कामकाज पाहिले. सज्जादला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी पल्लवीच्या आईने केली आहे.

Leave a Comment