उरुग्वे कोलंबियात होणार अटातटीची लढत
रिओ दी जानेरो – विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील बाद फेरीच्या सामन्यात उरुग्वे व कोलंबियात अटातटीची लढत होणार आहे. शनिवारी रात्री होत असलेल्या या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. स्टार सुआरेझवर बंदीची कारवाई झाल्यानंतर कोलंबियाची वर्ल्डकपची प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची आशा उंचावली आहे.
शनिवारी होत असलेल्या या उभय संघांच्या रॅँकिंगवर नजर टाकली तर उरुग्वेचे सातवे आणि कोलंबियाचे आठवे रॅँकिंग आहे.कोलंबियाने गटवार साखळीत तीनही लढती जिंकून त्यांचा फॉर्म दाखवला. रॉड्रिग्यूजने प्रत्येक लढतीत गोल करत उरुग्वेला एकप्रकारे आव्हान दिले आहे. गटवार साखळीत कोलंबियाला अव्वल दहामधील संघांचे आव्हान नव्हते मात्र ते सामन्यागणिक खेळ उंचावत आहेत.
याउलट उरुग्वेने सलामीची लढत कोस्टा रिकाकडून हरल्यानंतर सुआरेझ आणि गॉडिनच्या जोरावर इंग्लंड आणि इटलीविरुद्धच्या लढती जिंकल्या.मात्र सुआरेझचा चावण्याचा प्रकार आणि पाठोपाठ त्याच्यावर झालेली बंदीची कारवाई या धक्यातून उरुग्वे सावरणे गरजेचे आहे. उरुग्वेचे प्रशिक्षक ऑस्कर तॅबॅरेझ यांनी सुआरेझशिवायही आम्ही जिंकलो आहोत याकडे लक्ष वेधले.मात्र वर्ल्डकपसारख्या मोठय़ा स्पर्धेत त्याची उणीव उरुग्वेला जाणवेल यात शंका नाही.

