ऑस्ट्रेलियात मोबाईल चार्जर स्फोटात महिलेचा मृत्यू

blast
मेलबर्न- ऑस्ट्रेलियात एका २८ वर्षीय महिलेचा मृत्यू मोबाईल चार्जरचा स्फोट झाल्यामुळे झाल्याचे उघडकीस आले आहे. ही महिला मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना कानाला हेडफोन लावून गाणी ऐकत होती. सुमार दर्जाचा यूएसबी मोबाईल चार्जर वापरल्यामुळेच हा स्फोट झाल्याचे निष्पण्ण झाले आहे. यामुळे उत्तम क्वालिटीचे साहित्य वापरण्यात यावे असा आग्रह करण्यात आला आहे.

उत्तर सिडनीमधील गॉस्फोर्ड येथील घरात स्फोट झाला, त्यावेळी ही महिला गाणी ऐकत होती. पोलिस तपासात तिच्या छाती आणि कानाजवळ गंभीर भाजल्याच्या जखमा आढळल्या. एप्रिल महिन्यात ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी संपूर्ण कसून तपास केला असता या महिलेने वापरलेला चार्जर सुमार दर्जाचा असल्याचे तसेच ते ऑस्ट्रेलियन मानांकने पूर्ण करणारे नसल्याचे आढळले. दोन महिन्याच्या अधिक चौकशीत हा स्फोट यूएसबी मोबाईल चार्जरमुळे झाल्याचे निष्पण्ण झाले.

आधुनिक तंत्रज्ञानाचे स्मार्टफोन, त्यात अनेक अॅप्लिकेशन आणि इंटरनेटच्या वापरामुळे मोबाइलची बॅटरी फटाफट संपते. ही बॅटरी आणि बॅटरी चार्ज करण्यासाठी वापरण्यात येणारे यूएसबी चार्जर चांगल्या दर्जाचे असावेत, असे कडक कायदे ऑस्ट्रेलियात आहेत.

ऑस्ट्रेलियन मानांकने पूर्ण न करणारे उत्पादन आढळल्यास दुकानदाराला ८७ हजार ५०० ऑस्ट्रेलियन डॉलर दंड आणि किंवा दोन वर्षाचा कारावास आणि उत्पादक कंपनीला ८ लाख ७५ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर दंडाची कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे आता सिडनीतील दुकानदार आणि कंपनीवर काय कारवाई होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment