विकासाबाबत विधायक दृष्टी हवी

पुणे जिल्ह्याच्या निसर्गरम्य परिसरात लवासा सिटी वसविण्यात आली आहे. तिचे काम सुरू असताना तिच्यावर भरपूर टीका झाली. परंतु ते काम पूर्णत्वाला येत आहे. त्याच्यावर झालेल्या टीकेत कितपत तथ्य होते हा मोठा संशोधनाचा विषय ठरावा आणि त्यात तथ्य आहे असे गृहित धरले तरी अशा प्रकारचा प्रकल्प होणार म्हणजे भ्रष्टाचारच होणार असे मानायचे काही कारण नाही. पण तसे मानले जाते. श्री. शरद पवार यांनी लवासा सिटीच्या कामात रस घेतला होता आणि आता त्यांनी असे २६ प्रकल्प महाराष्ट्रात व्हावेत असे म्हटले. परंतु त्यांनी असे म्हणताच सतत नकारार्थी विचार करणार्‍या काही लोकांनी कुत्सितपणे टोमणे मारले. परंतु असे टोमणे मारणे योग्य आहे का? याचा विचार केला पाहिजे. परंतु लवासा सिटी ही निसर्गाच्या कुशीत वसलेले एक पर्यटक स्वप्न आहे हे नाकारता येत नाही. आपल्या देशामध्ये काही लोकांना समृध्दीचे वावडे आहे की काय माहीत नाही. छान राहणे, राहणीमान वाढवणे, उत्पन्न वाढवणे, समृध्दी निर्माण करणे या गोष्टींकडे हे लोक नेहमीच नकारात्मक आणि वक्रदृष्टीने पाहत असतात. श्रीमंती ही वाईट नसते. गरिबांचे शोषण करून श्रीमंती वाढवू नये हे बरोबर आहे. परंतु याचा अर्थ श्रीमंत असणे, समृध्द असणे हे काहीतरी पाप आहे असे काही लोक मानतात.

भारताची १९९१ पूर्वीची अर्थव्यवस्था अशा नकारात्मक विचारांनी पीडित झाली होती आणि त्या वातावरणात उद्योगपती म्हणजे चोर असेच मानले जात होते. सरकारसुध्दा त्यांच्या उद्योगांववर अनेक प्रकारचे निर्बंध लादत होते. एखाद्या उद्योगपतीने भरपूर उद्योग निर्माण केले तर ते गैरमार्गानेच केले असणार असे मानले जात होते. त्यामुळे आपल्या सर्वांचा या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन हा नकारात्मक झाला होता. त्या काळात भांडवलदार किंवा भांडवलदारांचे हस्तक ही शिवी मानली जात होती. त्या प्रकारच्या चिंतनाचे काही अंश अजूनही आपल्या विचारात शिल्लक आहेत. त्यामुळे श्री. शरद पवार यांनी लवासा सिटीसारखे आणि २६ प्रकल्प उभारले पाहिजेत असे म्हणताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. श्री. पवार यांनी असे २६च प्रकल्प का म्हटले आहे हे काही कळत नाही. त्यादृष्टीने त्यांनी काही पाहणी केली आहे का आणि अशा २६ साईटस् महाराष्ट्रात आहे का याचा काही खुलासा त्यांनी केला नाही. मात्र महाराष्ट्रात २६ लवासा सिटी उभ्या राहू शकतील असे म्हटले. २६ प्रकल्प उभारणार म्हणजे तेवढा भ्रष्टाचारच करणार असे मानणार्‍यांनी पवारांच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली.

मात्र पवारांनी हे प्रतिपादन करताना अशा प्रकल्पांकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. असे मत व्यक्त केले आहे. लवासा सिटीसारखे २६ प्रकल्प उभारणार म्हणजे अजून तेवढा भ्रष्टाचार करणार, जमीन मालकांना विस्थापित करणार आणि भांडवलदारांना रान मोकळे करून देणार अशीच टीका काही लोकांनी केली. मात्र ज्यांना श्रीमंत होण्याचे वावडेच आहे अशा लोकांनी केलेल्या या टीकेकडे दुर्लक्ष करून आपण समृध्दीचा विचार केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये पर्यटन उद्योगाला चांगलीच संधी आहे. असे म्हटले जाते. परंतु ह्या संधीचा फायदा घेऊन आपल्याला हा उद्योग वाढवायचा असेल, रोजगार निर्मिती करायची असेल आणि परकीय चलन मोठ्या प्रमाणावर मिळवायचे असेल तर जगातल्या अन्य पर्यटन केंद्रांप्रमाणेच आपल्यालाही अशी पर्यटक आकर्षणे उभी केली पाहिजेत. त्याशिवाय पर्यटन वाढत नाही. पर्यटनातून मिळणारा पैसा हा एक प्रकारे विनासायास मिळत असतो. म्हणजे हा पैसा मिळवण्यासाठी आपण निसर्गाने जे दिले आहे त्याचा वापर करत असतो. पर्यटन क्षेत्रासाठी पैशाची गुंतवणूक करावी लागत नाही. पर्यटक आकर्षण हे निसर्गाने निर्माण केलेले असते. त्यासाठी पैसे गुंतवलेले नसतात. निसर्गाने जे दिले आहे त्याला आपण फक्त सजवायचे असते तिथे येणार्‍या लोकांच्या फक्त सोयी निर्माण करायच्या असतात आणि पर्यटकांना पर्यटन क्षेत्राची भेट सुसह्य होईल हे पहायचे असते.

पर्यटन क्षेत्राठिकाणची सेवा जितकी तत्पर असेल तेवढा पर्यटन उद्योग विकसित होत असतो. कारखानदारी किंवा व्यापार यामध्ये भरपूर पैसे गुंतवावे लागतात आणि थोड्या मार्जिनवर काम करावे लागते. म्हणजे अशा उद्योगातले नफ्याचे प्रमाण हे बेतासबात असते. पण पर्यटन उद्योगातले नफ्याचे प्रमाण मोठे शिवाय अधिक रोजगार निर्माण करणारे असते. अन्य उद्योगांमध्ये सातत्याने बदलणार्‍या तंत्रज्ञानाचा विचार करावा लागतो. नवनवे तंत्रज्ञान सतत आत्मसात करावे लागते. त्यात जो मागे पडतो तो संपून जातो. पण पर्यटन उद्योगामध्ये अशी कसलीही जोखीम नाही. त्यामुळे पर्यटन उद्योग हा कमाईसाठी फार लाभदायक उद्योग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आखलेल्या योजनेमध्ये पर्यटन उद्योगासारख्या निसर्ग संपदेचा वापर करण्यावर भर दिला आहे. तो याच हेतूने दिलेला आहे. खनिजे, निसर्गसंपत्ती आणि समुद्र किनारा त्याचबरोबर निसर्गाने बहाल केलेली मानवी बुध्दी यांचा नियोजनपूर्वक वापर केला तर देशाचे चित्र बदलू शकते. अर्थात, त्यातले चौथे साधन म्हणजे मानवी बुध्दी ही सकारात्मकतेने वापरली पाहिजे. ती नकारात्मकरित्या वापरली तर निसर्गाने बरेच काही दिलेले असूनसुध्दा अापण कायम दरिद्रीच राहू.

Leave a Comment