पवारांना फक्त लवासाचीच चिंता – उद्धव ठाकरे

uddhav
पुणे – शेतकऱयांकडे माजी कृषी मंत्री शरद पवारांचे दुर्लक्ष झाले असून, त्यांना राज्यात सर्वसामान्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न आणि आषाढी वारीतील वारकऱयांकडेही लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. पवारांना फक्त लवासाचीच चिंता आहे. म्हणूनच आणखी 26 लवासाची स्वप्नं त्यांना पडत आहेत, असा घणाघाती आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पुण्यात केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची कारकीर्द घोटाळयांनीच गाजली. आता न केलेल्या विकासकामांच्या श्रेयासाठी त्यांच्यात चढाओढ सुरू असल्याचा टोलाही ठाकरे यांनी यावेळी लगावला.

शिवसेना पदाधिकाऱयांच्या गणेश कला क्रीडा येथे मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह आघाडी सरकारवर चौफेर टीका केली. ते म्हणाले, विधानसभा निवडणुका डोळयासमोर ठेवून आघाडी सरकार एक एक निर्णय जाहीर करत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारने जाहिरातींसाठी 100 कोटींचे बजेट तयार केले आहे. मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींमुळे या जाहिराती ठप्प आहेत. आता या जाहिरातीही आघाडी सरकारला वाचवू शकणार नाहीत. काहीही झाले तरी राज्यात महायुतीची सत्ता आणणारच, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसेनेवर टीका करणारे आता शिवसेनेत येण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, पदाच्या आशेने शिवसेनेत येऊ नका, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

Leave a Comment