पिकाचा पॅटर्न ठरवता येईल ?

crop
शेतकर्‍यांच्या अनेक दुखण्यांमध्ये सगळ्यात महत्वाचे दुखणे म्हणजे बाजार आणि बाजारभाव. शेतकरी बाजारामध्ये सगळा माल एकदम आणतात आणि मालाची आवक वाढली की, भाव कमी होतात. हा तर आपला नेहमीचाच अनुभव आहे. मग शेतकर्‍यांनी असा एकदम माल बाजारात आणावाच कशाला, असा प्रश्‍न विचारला जातो. परंतु शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती किंवा हलाखी ज्याला माहीत असते तो असा प्रश्‍न विचारणार नाही. शेतकर्‍यांचा माल एकदम तर येतोच पण एखाद्या वर्षी एखादे पीक प्रचंड प्रमाणावर घेतले जाते. एखाद्या वर्षी सोयाबीनच मोठ्या प्रमाणावर येते. एखाद्या वर्षी उसाची लागवड प्रचंड होते तर एखाद्या वर्षी गव्हाचेच अमाप पीक येते. यामागे काही कारणे आहेत. काही वेळा हवामानच असे असते की, त्या हवामानामुळे एखादे पीक छान येते आणि एखादे पीक जातेच. मग ज्याला हवामान मानवले तो माल बाजारात भरपूर येतो आणि गेलेल्या पिकाची बाजारात टंचाई होते. अशा गोष्टींना शेतकरीही जबाबदार असतात. चालू वर्षी ज्या पिकाला चांगला भाव मिळेल असे शेतकर्‍यांना वाटते तेच पीक ते एकदम मोठ्या प्रमाणावर घेतात. मग त्याऐवजी कोणी कोणती पिके किती घ्यावीत याचे काही नियोजन केले तर असा बाजारातल्या पुरवठ्याचा असमतोल निर्माण होणार नाही. सगळ्या प्रकारचा माल कमी-जास्त प्रमाणात बाजारात उपलब्ध होईल.

सरकारने पिकांचा पॅटर्न ठरवून द्यावा आणि कोणी कोणती पिके किती घ्यावीत हे ठरवून द्यावे असा विचार काही लोक मांडत असतात. अशा प्रकारची सक्ती चीनमध्ये केली जाते असेही काही लोक सांगत असतात. पण भारतात ते शक्य नाही. कारण भारतात लोकशाही आहे. अशी अडचण असली तरी भारतामध्ये शक्य त्या प्रकाराने पिकाचा पॅटर्न ठरवला जावा. तसा तो ठरल्यास शेतकर्‍यांच्या बाजारभावाचा प्रश्‍न काही प्रमाणात का होईना सुटेल. काही वेळा शेतकर्‍यांना असे वाटते की, चला यंदा लसूण करू पण ज्यावेळी लसूण लावायची तयारी होते तेव्हा त्यासाठी आवश्यक तेवढे पैसे नसतात मग घरात कांद्याचे बी आहेच तर मग मनात नसले तरी कांदा लावला जातो. काही वेळा तर दोन तीन प्रकारचे बियाणे घरात असते पण त्यातल्या ज्या बियाणाला लावण्यासाठी कमी मजुरी लागते ते बी लावले जाते.

लावणी साठी लोड शेडिंगमधून वाट काढीत रानाला पाणी तर दिलेले असते मग कमीत कमी माणसांत ज्याची लावण होते तीच लावण केली जाते. तेव्हा गावानं एकत्र येऊन कोणी कोणती आणि किती पिके घ्यावीत याचे नियोजन केले म्हणजे पिकांचा पॅटर्न ठरवला तरीही अशा स्थानिक आणि ऐनवेळी येणार्‍या अडचणींमुळे पॅटर्न मोडला जातो. एखाद्या शेतकर्‍याने तो मोडून दुसरेच पीक घेतले तर त्याला कोणी काही म्हणू शकत नाही कारण त्याच्यासमोर त्याच्या नियंत्रणात नसलेल्या अडचणी असतात आणि त्या सर्वांना दिसत असतात. अनेकदा शेतकरी पिकांचे निर्णय कसे घेतात ? यंदा अमक्याला कारल्याचे छान पैसे मिळाले आहेत. मग आपणही कारली लावू असा विचार सगळेच करायला लागतात. अशा वेळी काही हुशार शेतकरी कारले लावणे आवर्जुन टाळतात. त्याच्या ऐवजी दुसरे काही तरी पीक घेतात. ही सुद्धा एक पॅटर्नचीच युक्ती आहे. जे पीक कोणीच घेत नसेल ते आपण घ्यावे अशी नीती ती अंमलात आणतात.
पीक घेण्यापेक्षाही माल विक्रीला नेण्यात काही धोरण राबवले की पैसे मिळतात. तो म्हणजे सगळाच माल एका मार्केटला एकदम न्यायचा नाही. थोडा थोडा न्यायचा. मग एखाद्या बाजारात भाव घसरल्यामुळे होणारे नुकसान टळते. एकंदरीत काही अडचणी आल्या तरीही आपण गाव पातळीवर पिकांचे नियोजन करू शकतो कारण गावात त्या नियोजनावर लक्षही ठेवता येते. त्यातून आपण आणि एकाच प्रकारचा माल एकदम एकाच वेळी बाजारात येणे टाळू शकतो.

पिकाच्या पॅटर्नवर एक मात्र उपाय आहे आणि तो आपल्या हातात आहे. प्रत्येक शेतकर्‍याने आपल्या शेतात पिकांचा पॅटर्न राबवणे हा त्यावर उत्तम उपाय होय. आपण वर्षानुवर्षे बाजाराच्या पातळीवर ङ्गसत आहोत. या बाजारात कोणत्याही एका मालाची अतिरेकी आवक होऊ नये यासाठी शेतकर्‍यांनी आपापल्या शेतात पिकांचे नियोजन करावे. शेतभर एकच एक पीक घेण्याचे टाळावे. काही शेतकर्‍यांना कपाशी एके कपाशी करायची सवय असते तर एखादा शेतकरी सोयाबीन एके सोयाबीन करत बसतो. या पिकांची बाजारात अती आवक झाली की ती एके ४७ बंदूक शेतकर्‍याच्या गळ्याला लागते. भाव कोसळतात. आपल्याकडे माल खूप असतो पण, भाव नसतो. ज्या मालाला भाव चांगला असतो तो मालच कोणाकडे नसतो. असला तरीही ङ्गार कमी असतो. आपल्याकडे माल खूप पिकला की आपण, हळहळतो. म्हणायला लागतो. माल खूप आहे हो पण भाव असता तर ! ज्या मालाला खूप भाव असतो. त्याचा तो भाव पाहून आपण पुन्हा हळहळतो. अरेरे ! भाव खूप आहे हो पण काय करावे ? मालच कमी आहे. एकूण भाव वाढले काय की माल पिकला काय, आपला खिसा रिकामाच राहतो.

यासाठी शेतकर्‍यांनी आपली शेती किती का असेना पण अनेक पिके घ्यावीत. कपाशीही घ्यावी. थोडे सोयाबीनही घ्यावे. तूर पेरावी. तिच्यात आणि कपाशीत एखादे मूग, उडीद असे मिश्र पिके घ्यावे. सगळ्यांनीच असे केले की एकाच पिकाची अतिरेकी आवक होत नाही. सगळी पिके माङ्गक प्रमाणात बाजारात येतात. भाव कोसळत नाहीत. माङ्गक भावही मिळतो आणि पैसाही हमखास मिळतो. शेतात अनेक पिके असली की, त्यातले एखादे पीक गेले किवा काही रोगाने ते कमी आले तरी अन्य पिके आलेली असतात. नेहमीच सगळी पिके जात नाहीत. एखादे पीक जाते पण एखादे येते. पार उद्ध्वस्त होण्याची पाळी येत नाही. काही हुशार शेतकर्‍यांनी टाईम पॅटर्न राबवून म्हणजे बाजारावर लक्ष ठेवून मोक्याच्या वेळी पिके बाजारात येतील अशा योग्य वेळी पिकांची लागवड करून भरपूर पैसे कमवलेले आहेत. त्यांचा हा टाईम पॅटर्न आपण अनुकरण करावा असा आहे.

आपल्या भागातल्या मुख्य बाजारपेठांमध्ये साधारण ठराविक वेळेतच ठराविक भाज्या येत असतात. परंतु या शेतकर्‍यांनी आपल्या भाजीपाल्याचे लागवडीचे वेळापत्रक नेहमी असे ठेवलेले आहे की, त्यांची भाजी सर्वांच्या भाज्या बाजारात येण्याच्या एक ते दीड महिना आधी बाजारात आलेली असते. त्यामुळे त्यांना चांगला भाव मिळतो आणि या एक-दीड महिन्यातच त्यांना त्या भाज्या बराच पैसा देऊन जातात. बाजारात एखाद्या मालाचा भाव ६० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत चाललेला असतो. परंतु या लोकांची तीच भाजी आधी महिनाभर बाजारात आलेली असते. तिला ३५० ते ४०० रुपयांपर्यंत भाव मिळालेला असतो. जवळपास तिप्पट भाव त्यांना मिळून जातो. अशा प्रकारे बाजारावर लक्ष ठेवून आपण आपल्या भाज्यांचे आणि ङ्गळांचे नियोजन केले तर बाजारभावाच्या प्रश्‍नातून आपण काही प्रमाणात का होईना सुटका करून घेऊ शकतो. अशा प्रकारचा टाईम पॅटर्न राबविणारे शेतकरी नेहमी गैरहंगामी पिके घेत असतात. अशी पिके घेतल्याने पिकांकडे थोडे लक्ष द्यावे लागते. परंतु मिळणारा पैसा खूप असतो. हंगामात कांदा विकणारे शेतकरी पाच ते सात रुपये किलो भावाने कांदा विकून मोकळे होतात. परंतु गैरहंगामी कांदा घेणारे भंगे मात्र पंधरा ते वीस रुपये किलो असा भाव मिळवून जातात. याचा अर्थ असा की, बाजारातली विविध मालांची आवक कधी आणि किती होत असते यावर थोडेसे लक्ष ठेवले तर चांगला पैसा मिळू शकतो. प्रत्येक वेळी तिप्पटच भाव मिळेल असे नाही. परंतु नेहमीपेक्षा चार पैसे जास्त मिळणार हे नक्की.

आपल्या पूर्वजांनी मिश्र पिके आणि पिकांचा ङ्गेर पालट यांच्या विषयी बरेच काही सांगून ठेवले आहे पण आपण ते विसरून गेलो आहोत पण खरोखरच किती प्रकारची मिश्र पिके घेता येतात ? मुख्य पिकाला कोणत्या पोषण द्रव्याची गरज आहे याचा विचार करून मिश्र पिकाची निवड तर करावीच लागते पण मुख्य पीक आणि मिश्र पीक या दोन्हींचाही कालावधी विचारात घ्यावा लागतो. तुरीच्या पिकात भाताचे पीक घेतले जातेे. तुरीच्या पिकामुळे भाताला नत्र मिळतो. त्यात थोडासा राजगिराही टाकला जातोे. या पिकांत काही कीडी झाल्या तर त्यांचा खातमा करायला पक्षी पाहिजेतच. मग पक्षी यावेत यासाठी थोडेसे राळेही ङ्गेकले आहेत. त्या निमित्ताने पक्षी येतात आणि काही प्रमाणात कीड नियंत्रणालाही मदत होते. पक्ष्यांना खाद्य मिळावे यासाठी तुरीच्या या प्लॉटच्या चारी बाजूंनी ज्वारीही पेरली जाते. त्यासाठीही पक्षी येतात. कीडींना खाऊन जातात. जाताना विष्ठा टाकून जातात. काही भागांत मिश्र पिकांचे एक आगळे मिश्रण केले गेले आहे. या मिश्रणात तूर तर आहेच पण पावसाच्या भरवशावर लावलेले टमाटेही आहेत. त्यात काही प्रमाणात मिरचीही लावलेली आहे. झेंडूचीही काही झाडे आहेत आणि चवळीही लावलेली आहे. मिरचीमुळे जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण वाढते. ते टमाट्यांना उपयुक्त ठरते. झेंडूही काही प्रमाणात पैसे देऊन जातो. सारी पिके काही ना काही देऊन निघून जातात आणि मग तुरीसाठी सारे रान मोकळे रहाते. गव्हाच्या पिकात मोहरी टाकावी. शिवाय धुर्‍यावर मका टाकावा. त्याचा चारा तर होतोच पण मुख्य पिकावरचा मावा रोग या मक्यामुळे कमी होतो. शेतकर्‍यांनी आपल्या आपल्या शेतात एकांडेपणाने प्रयोग करीत बसण्यापेक्षा सामूहिकपणाने असे प्रयोग केले तर त्यांच्या प्रयोगांना प्रोत्साहन मिळते.

Leave a Comment