कॅम्पाकोलाचा धडा

campacola1_0
भारताच्या सर्व शहरांमध्ये बेकायदा बांधकामांचे प्रमाण एवढे प्रचंड आहे की त्यांना धक्का लावायचा म्हटले तर एखाद्या आग्या मोहोळाला उठवल्यासारखे होणार आहे. कारण त्यांना धक्का लावण्याचे काम सरकारलाच करावे लागणार आणि कोणतेही सरकार अशा निर्णयातून जनतेची सहानुभूती गमावण्याचे संकट ओढवून घेणार नाही. परंतु याचा अर्थ अशा प्रकारची बांधकामे खपवून घेतली जावीत असा होत नाही. एखाद्या तरी अशा बेकायदा बांधकामावर हातोडा पडला पाहिजे. तरच बेकायदा बांधकामे करणे आणि बेकायदा घरे विकत घेणे घातक ठरू शकते असा धाक लोकांच्या मनात बसेल. मुंबईतल्या कॅम्पा कोला या नावाने ओळखल्या जाणार्‍या उच्चभ्रू वसाहतीमध्ये असे १०२ फ्लॅट बेकायदा बांधलेले आहेत आणि ते पाडण्याची कारवाई आता सुरू आहे. हे फ्लॅट पाडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे आता त्यात कोणी हस्तक्षेप करू शकणार नाही. ही १०२ घरे पडणार ही आता काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. परंतु या संबंधात बरेच गैरसमज निर्माण केले जात आहेत आणि माध्यमांमधून अर्धवट माहितीच्या आधारावर विपरीत चर्चा घडवली जात आहे.

अशा चर्चेमधून लोकांच्या मनात अनेक गैरसमज निर्माण होतात आणि राजकीय पक्षाचे नेते लोकप्रियतेच्या आहारी जाऊन काहीतरी विपरीत विधाने करत राहतात. त्यामुळे लोकांनाही आणि या बेकायदा वसाहतीतील रहिवाशांनाही आपली ही घरे कधी ना कधी वाचतील असे वाटत राहते. पण तसे घडणार नाही. तेव्हा हे प्रकरण काय आहे हे समजून घेतले पाहिजे. ही वसाहत १९८१ ते १९८९ या कालावधीत बांधली गेलेली आहे. तिच्यामध्ये ६ मजली इमारती बांधल्या जाव्यात अशी अनुमती मिळाली होती पण या इमारतीच्या कंत्राटदाराने तब्बल २० मजली इमारत बांधली. शिवाय आणखी एक १७ मजली इमारत बांधली. या घरांत येऊन राहणार्‍या लोकांना या इमारती बेकायदा आहेत हे माहीत होते. या इमारतीतले १०२ फ्लॅट बेकायदा ठरले आहेत. त्यात राहणार्‍या लोकांनी तसे कबूल केले आहे. याउपरही काही रहिवासी आपल्याला हे माहीत नव्हते असा कांगावा करीत आहेत. तो कांगावा न्यायालयाने मान्य केलेला नाही कारण अज्ञानाने गुन्हा केला तर गुन्हेगार निष्पाप ठरत नाही. या लोकांना ही घरे बेकायदा आहेत की नाही हे माहीत नसले तरीही ती बेकायदा नाहीत याची खातरजमा करूनच त्यांनी ती खरेदी करायला हवी होती. त्यात त्यांनी कसूर केली असेेल तर ती त्यांची चूक आहे.

कॅम्पा कोला इमारतीतील या बांधकामांची जाणीव १९९० च्या सुमारास झाली आणि महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी तशी जाणीव या लोकांना दिली. किंबहुना ही बांधकामे पाडून टाकण्यात येतील असे तेव्हाच बजावले. या उपर तरी या लोकांना, आम्हाला काही माहीत नव्हते, असा पवित्रा घेता येणार नाही. आता हे लोक, आता आम्ही अचानक कोठे रहायला जावे, असा प्रश्‍न विचारून पत्रकारांना आणि राजकीय नेत्यांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न करीत आहेत पण त्यांना १९९० पासून आता रहायला कोठे जावे यावर विचार करायला वेळ मिळाला आहे. ही आपत्ती अचानकपणे कोसळलेली नाही. तशी सबब समोर करून ते लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि माध्यमांवरच्या चर्चेतही असे मुद्दे मांडून लोकांची दिशाभूल केली जात आहे. कोणत्याही वृत्तवाहिनीला जगातले बहुचर्चित विषय घेऊन चर्चा घडवून आणावी लागते. त्या चर्चेत सहभागी होणारांचा त्या क्षेत्रातला अनुभव काय आणि चर्चेचे संचालन करणारांचा अधिकार काय हे प्रश्‍नच असतात. या प्रकरणावर गेली २० वर्षे न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तिच्यात सगळे मुद्दे चर्चेला आले आहेत आणि त्यांची सखोल छाननी झाली आहे. पण माध्यमांत त्या सगळ्यांचा निक्काल लावून अर्ध्या तासात स्वत:चा निष्कर्ष काढला जातो. त्यामुळे जनतेला सत्य कळत नाही.

सर्वोच्च न्यायालयाने या संबंधातल्या सगळ्या मुद्यांचा खल करून त्यावर पाडकाम करणे हाच उपाय असल्याचा निर्णय दिला आहे. पण या वसाहतीतल्या लोकांना आपण न्यायालयाकडे सहानुभूतीची मागणी करू किंवा सत्याग्रह करून जनतेची सहानुभूती मिळवू असे वाटत आहे. शेवटी राजकीय नेत्यांवर दबाव आणून आपण आपली घरे वाचवू अशीही अनाठायी आशा त्यांना वाटत आहे. काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवरही दबाव आणला आहे. शिवाय केन्द्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्याही समोर हा मुद्दा आला आहे. पण या दोघांनीही कानावर हात ठेवले आहेत. आपण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बदलू शकत नाही असे म्हणून हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. ही भूमिका योग्य आहे. पण या रहिवाशांनी आता प्रत्यक्ष पाडकामात अडथळे आणले आहेत. महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी या अडथळ्यांचे चित्रण केले आहे. अशा प्रकारचा अडथळा आणणे हा न्यायालयाचा अपमान आहे. आपल्यावर गोळीबार किंवा लाठीमार करून किंवा आपल्याला अटक करून काही पाडकाम केले जाणार नाही असा या लोकांचा भ्रम आहे. तशी सवलत त्यांना मिळण्याचे काहीही कारण नाही. वेळ पडल्यास त्यांना अटक करून, बळाचा वापर करून हे पाडकाम होणार हे त्यांंनी समजून घेतले पाहिजे. बेकायदा कामे खपून जातात ही त्यांच्या मनातली भावना त्यांना किती महागात पडत आहे याचा अनुभव त्यांना येत आहे.

Leave a Comment