राजकारणाची शैली बदलणार कधी?

vidhansabha
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला विजय मिळाला आहे परंतु त्या निवडणुकीचा एका वेगळा अर्थ अजून कॉंग्रेसच्या नेत्यांना कळलेला नाही. भारतीय जनता पार्टीचा झालेला विजय हा केवळ त्या पक्षाचा नाही तर तो विजय नव्या दृष्टिकोनाचा आणि नव्या राजकीय शैलीचा आहे. या नव्या शैलीची जाणीव अजून तरी कॉंग्रेसच्या नेत्यांना झालेली नसल्यामुळे महाराष्ट्रातल्या या पक्षाचे राजकारण जुन्या राजकीय शैलीवर चाललेले आहे. लोकसभा निवडणुकीत या आघाडीला ४८ पैकी फक्त ६ जागा मिळाल्या. त्या ६ जागासुध्दा वैयक्तिक प्रभावामुळे आणि निसटत्या मतांनी मिळालेल्या आहेत. म्हणजे तसा या आघाडीचा १०० टक्के पराभव झालेला आहे. आता या दोन्ही पक्षांचे नेते. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे रुपांतर विजयात करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दावे करत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार विधानसभा निवडणुकीत विजय मिळावा म्हणून दिवसाचे १२ तास काम करणार असल्याचे जाहीर झाले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनीसुध्दा मतपेढीचे राजकारण करून पक्षाची पडझड रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

विधानपरिषदेवर नेमावयाच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांची निवड करताना ते मुस्लीम आहेत की ब्राह्मण आहेत आणि ते कोणत्या जिल्ह्यातून आलेले आहेत याची पक्षात चर्चा झालेली आहे. अशा रितीने आपण विशिष्ट जातीच्या आणि धर्माच्या कार्यकर्त्यांना विधानपरिषदेवर पाठवले किंवा मंत्री केले की त्या विशिष्ट व्यक्तीच्या जातीची सारी मते आपल्याच मागे येतील अशी त्यांची कल्पना आहे. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना जर काही राजकीय बुध्यांक असेल तर ते अशा मतपेढीच्या राजकारणापासून दूर राहतील परंतु त्यांच्या एकंदर वागण्यापासून तशी चिन्हे दिसत नाहीत. कॉंग्रेस पक्षाने या देशात राबवलेल्या असल्या संकिर्ण राजकारणाचा लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झालेला आहे. जातीपातीच्या आणि पंथाच्या कॉंग्रेसच्या राजकारणाचा जनतेला उबग आला असून देशातल्या जनतेने त्या राजकारणाचा पराभव केलेला आहे. विशेषतः देशाच्या मतदारांमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या सुमारे ११ कोटी नव्या मतदारांनी नव्या उमेदीने आणि वेगळा विचार करून मतदान केलेले आहे. त्यांच्या या नव्या दृष्टीकोनामुळे राजकीय नेत्यांना आपले डावपेच बदलायला भाग पाडले आहेत. किंबहुना जे पक्ष आणि नेते त्याच त्या जुन्या राजकारणाच्या शैलीच्या बेड्या तोडणार नाहीत त्यांना ही नवी पिढी राजकारणातून बाद केल्याशिवाय राहणार नाही. असे उघडपणे दिसून आलेले आहे.

मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आपल्या चिंतनात आणि डावपेचात कसलाच बदल करायला तयार नाहीत आणि अजूनही जुन्या शैलीच्या राजकारणाने पावले पडायला लागलेली आहेत. या नव्या पिढीला आणि नव्या जाणिवा जागृत झालेल्या जुन्या मतदारांना काय हवे आहे याचा किंचितही बोध राज्यातल्या कॉंग्रेसच्या तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांना झालेला नाही. आरक्षणाचे गाजर दाखवणे, शेतकर्‍यांना कसल्यातरी सवलती देण्याच्या बोगस घोषणा करणे आणि जातीजातींमधील मतभेद वाढवत नेणे याच जुन्या युक्त्या पुन्हा विधानसभा निवडणुकीत कामाला येतील या खुळ्या अपेक्षेने या दोन्ही पक्षांचे डावपेच लढवले जायला लागले आहेत. नाही म्हणायला नव्या पिढीशी संपर्क साधताना सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे एवढे एक भान या दोन पक्षांना आले आहे. परंतु केवळ सोशल मीडियाचा वापर करण्याने सारे काही काम भागून जाईल अशी त्यांची कल्पना असेल तर ती फोल ठरणार आहे. सोशल मीडियावर प्रचार करणे पुरेसे नाही. त्या माध्यमातून बोलणार्‍या आणि संवाद साधणार्‍या नव्या पिढीची भाषा आणि त्यांच्या कल्पना यांच्याशी सुध्दा एकरूप होता आलेे पाहिजे.

या नव्या जाणिवांमध्ये प्रशासनातील कौशल्य आणि विकासाचा दृष्टिकोन या दोन गोष्टी मोठ्या मोक्याच्या ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती सत्ता घेतल्यापासून आपली ही नवी कार्यशैली सर्वांना दाखवून द्यायला सुरूवात केली आहे. मंत्र्यांची निवड करताना वापरलेले निकष मंत्र्यांना दिलेल्या सक्त सूचना, ते भ्रष्टाचारापासून मुक्त रहावेत म्हणून पाळावयाच्या पथ्याबाबतचा आग्रह, पूर्ण केंद्रीय सचिवालयांना एक दोन बैठकातच लावलेली शिस्त आणि पंतप्रधानांचे स्वतःचेच एखाद्या कडक शासकीय अधिकार्‍याप्रमाणे कार्यालयातले वागणे या सगळ्या गोष्टी नव्या जाणिवांशी निगडित आहेत. अशा प्रकारच्या उपाययोजनांचा मागमूससुध्दा महाराष्ट्राच्या सरकारमध्ये दिसत नाही. महाराष्ट्राचे सरकार कार्यक्षमतेच्या वल्गना करत आहे. परंतु मुंबई आणि पुण्याच्या दरम्यान वाटमारीच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांवर महाराष्ट्राचे कोणतेही मंत्री कसली टिप्पणीही करत नाहीत आणि त्या आटोक्यात आणण्याच्या बाबतीत पावलेही उचलत नाहीत. ही तत्परता त्यांच्या गावीसुध्दा नाही आणि याबाबतीतल्या आपल्या अकार्यक्षमतेच्या आपल्या मतदारांवर परिणाम होत असतो. हे मानायलासुध्दा ते तयार नाहीत. केवळ जातींचे राजकारण केले आणि तेच ते जुने हातखंडे वापरले की आपण सहज विजयी होऊ या भ्रमातून ते अजून बाहेरच पडत नाहीत. नेते जुने झाले आहेत आणि त्यांचे चिंतन कालबाह्य ठरलेले आहे. नवे नेते पुढे येत नाहीत आणि पक्षाचे चिंतन बदलत नाही.

Leave a Comment