
पुणे – पुणे पदवीधर मतदारसंघासाठी येत्या २0 जून रोजी होत असलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपासह राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवारांनीही आपल्या प्रचारात हायटेक तंत्राचा अवलंब केल्याचे चित्र दिसून येत आहे. पदवीधर मतदारांचा सुज्ञपणा आणि मतदारसंघाचे प्रचंड मोठे क्षेत्रफळ यामुळे फेसबुक, व्हॉट्सअँप, मेसेजच्या माध्यमातून आधुनिक तंत्र वापरून थेट मतदारांशी संपर्क केला जात आहे.लोकसभा निवडणुकीत सोशल मिडियाचे महत्व वाढल्याने त्याला आता प्राधान्य दिले जात आहे.
निवडणूक पदवीधर मतदारसंघाची ;पण सोशल मिडीयावर भर
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी २0 जून रोजी एकाच दिवशी मतदान होणार आहे. या मतदारसंघात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या चार जिल्ह्यांचा समावेश होतो. मतदारसंघाचे विस्तीर्ण असलेले क्षेत्रफळ आणि प्रचारासाठी मिळालेल्या कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून हायटेक प्रचार यंत्रणेवर भर दिला जात असल्याचे चित्र आहे. मतदारसंघातील सर्वच मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर मोठ्याप्रमाणावर केला जात आहे.
