विधानसभा निवडणुकांसाठी मनसेने कंबर कसली

rajthakeray
मुंबई – लोकसभा निवडणुकांत एकही जागा न मिळविता आलेल्या मनसेने राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली असल्याचे वृत्त आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणक मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून लढविण्याचे यापूर्वीच घोषित केले आहे. गेला आठवडाभर दररोज राज ठाकरे त्यांचे पदाधिकारी, आमदार आणि सरचिटणीस यांच्यासोबत पाच पाच तास बैठका घेत आहेत आणि यात पक्षाची निवडणुकांसाठीची रणनिती ठरविली जात आहे असे समजते. या बैठका राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे कृष्णकुंजवरच घेतल्या जात आहेत.

या बैठकांत प्रामुख्याने पक्ष स्थापनेच्या वेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट सादर करण्याची जी घोषणा केली होती त्याची पूर्तता करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असून या ब्ल्यू प्रिंटवर अंतिम हात फिरविला जात असल्याचे अंतर्गत सूत्रांकडून समजते. त्याचप्रमाणे पक्षातील प्रमुख नेते, आमदार यांची मते आणि म्हणणे ऐकून घेण्यावरही भर दिला जात आहे. याच चर्चेत राज ठाकरे यांनी निवडणक लढविण्यासाठी कोणता मतदारसंघ निश्चित करावा याचाही निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकांत पराभव झाला तरी विधानसभा निवडणूकांत आम्ही पुन्हा उसळी मारू अशी घोषणा राज ठाकरे यांनी निवडणूक निकालांनंतर घेतलेल्या पहिल्या सभेत केली होती. त्यादृष्टीने मनसेच्या कोणत्या पदाधिकार्‍यावर आणि नेत्यांवर काय काय जबाबदार्‍या द्यायच्या याचीही चर्चा केली जात असून प्रचारसभातून कोणते महत्त्वाचे मुद्दे घ्यायचे व सरकारच्या विरोधात कोणते मुद्दे आणायचे याची स्वतंत्र यादीच तयार केली जात आहे. राज ठाकरे स्वतः निवडणूक रिंगणात उतरत असल्याने मनसेत उत्साह आला असून कार्यकर्ते उमेदीने कामाच्या तयारीला लागले असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment