अखेर मुंडेंच्या अपघाती मृत्यचा सीबीआय तपास सुरु

gopinath
नवी दिल्ली – भाजपचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाचा सीबीआयकडून तपास व्हावा अशी सर्वपक्षीयांनी केलेली मागणी लक्षात घेवून दिल्ली पोलिसांकडून तपास हाती घेतल्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

तीन जून रोजी गोपीनाथ मुंडे दिल्ली विमानतळाकडे जात असताना त्यांच्या गा़डीला समोरुन आलेल्या इंडिका गाडीने धडक दिली होती. या अपघातात मुंडे यांचे निधन झाले होते. मुंडे यांच्या मानेला आणि यकृताला गंभीर मार लागला होता. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी मुंडेंच्या गाडीला धडक देणा-या इंडिका कारचा चालक गुरविंदर सिंहच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू असला तरी, हा अपघात नसून, घातपात असल्याची अनेकांना शंका आहे. त्यामुळे बीडमधील जनता आणि गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक सीबीआय चौकशीची मागणी करत होते. गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळीही संतप्त झालेल्या बी़डच्या जनतेने सर्वपक्षीय नेत्यांच्या गाडयांना घेराव घालत सीबीआय चौकशीची मागणी केली होती

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार सीबीआयने तपास सुरु केला आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांसह विविध पक्षीय नेत्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.त्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी केली होती.त्यानुसार सीबीआयने गुन्हा दाखल करून तपासास प्रारंभ केला आहे.

Leave a Comment