नरेन्द्र मोदी संसदेत दिसलेले

modi
देेशाचे पंतप्रधान म्हणून नरेन्द्र मोदी यांची निवड झाली खरी पण ते संसदेत कसे बोलतील. ते संसदपटू आहेत का असे अनेक प्रश्‍न विचारले जात होते पण मोदींनी संसदेतले पहिलेच भाषण असे काही प्रभावी केले की, सर्वांना आपल्याला परिपक्व आणि विकासाच्या कल्पनेने झपाटलेले प्रामाणिक पंतप्रधान मिळाले आहेत याची खात्री पटली. ही खात्री केवळ त्यांच्या चाहत्यांना आणि समर्थकांना आणि निरीक्षकांनाच पटली आहे असे नाही तर त्यांच्या विरोधकांनाही त्यांच्या या परिपक्वतेने आणि नो नॉनसेन्स धोरणाने प्रभावित केले आहे. शशी थरूर यांनी या भाषणापूर्वीच मोदींच्या सर्वसमावेशक धोरणाची मोहिनी पडली आहे. कॉंग्रेसने त्यांच्या या धोरणाला प्रतिसाद दिला पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी ते जाहीरपणाने बोलून दाखवले आहे. कॉंग्रेसचे नेते प्रतिसाद न देतील तर आपण सारे कॉंग्रेस नेते सणकी ठरूत असे थरूर यांनी बजावले आहे. शशी थरूर यांची ही शरणागती कॉंग्रेसच्या नेत्यांना पचली नाही. त्यांनी थरूर यांच्यावर केवळ टीकाच केली असे नाही तर त्यांना सरड्याची उपमा दिली. मोदी यांच्या भाषणाने शशी थरूर यांचे म्हणणे खरे आहे असे वाटल्याखेरीज राहणार नाही.

त्यांच्या भाषणाकडे सार्‍या जगाचे लक्ष लागले होते. मोदी हे भाजपाचा प्रभाव निर्माण करण्याच्या कल्पनेने झपाटलेल असतील अशी कल्पना होती. ते सारा कारभार आपल्या हातात ठेवणारे एककल्ली पंतप्रधान होतील असे म्हटले जात होते. पण त्यांनी या शक्यता तर फेटाळून लावल्याच पण केन्द्राच्या कारभारात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही सहभागी करून घेणारी टीम इंडिया नावाची संकल्पना मांडली. त्यांना निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात ज्या लोकांनी काही विशेषणे लावली, ज्यांनी त्यांच्यावर अध्यक्षीय पद्धती आणण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप केला त्यांना आता आपले शब्द गिळावे लागत आहेत. पंतप्रधानांनी आपल्या पक्षीय स्वार्थाच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा तरच ते देशातल्या जनतेच्या मनात विश्‍वास आणि आदर निर्माण करू शकतात. पंतप्रधान पक्षाभिनिवेशाने काम करायला आणि बोलायला लागले की, संसदेत त्यांना तसेच उत्तर मिळते आणि संसदेचा आखाडा होतो. सर्वांचीच प्रतिष्ठा जाते. म्हणून आधी पंतप्रधानांनी संयमाने आणि जबाबदारीने वागायला हवे. नरेन्द्र मोदी यांनी ती परिपक्वता आपल्यात असल्याचे आपल्या संसदेतल्या पहिल्याच भाषणात दाखवून दिले आहे.

त्यांनी या भाषणात आपण विरोधकांनी केलेली टीका ऐकून चिडणार नाही तर ती टीका म्हणजे मार्गदर्शन आहे असे समजणार असे प्रतिपादन केले. पंतप्रधानच जर एवढ्या जबाबदारीने बोलत असतील तर विरोधकांनाही आपण जबाबदारीने बोलले पाहिजे असे वाटायला लागते. म्हणूनच संसदेची प्रतिष्ठा वाढवणे हे पंतप्रधानांच्या हातात असते असे म्हटले जात असते.पंतप्रधान म्हणून आपले हे कर्तव्य आहे याची जाणीव मोदी यांच्या या भाषणातून झाली आहे. आपल्या हातात स्पष्ट बहुमत आहे तेव्हा आपण सर्वांना ठोकून काढू असा पवित्रा त्यांनी कधीच घेतलेला नाही आणि आता या भाषणातही त्यांनी याबाबत संयम पाळला आहे त्यामुळे संसदेत येतानाच बाह्या सरसावून आलेल्या कॉंग्रेस खासदारांची निराशा झाली. काल कॉंग्रेसचे नेते मल्किलाजून खर्गे हे लक्षात ठेवा, याद राखा, गाठ आमच्याशी आहे, शेवटी आम्हीच सत्तेवर येणार आहोत, तुम्ही कौरव आहात आणि आम्ही पांडव आहोत अशी भाषा करीत होते. ते संख्येने मूठभर असून चढेलपणाने बोलले पण नरेन्द्र मोदी हातात स्पष्ट बहुमत असतानाही नम्रपणे बोलले. हा फरक जगाला दिसला आहे. राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात सरकारचे कार्यक्रम म्हणून जे मुद्दे मांडले ते कॉंग्रेसच्याच जाहीरनाम्यातले कॉपी केलेले मुद्दे आहेत असे म्हणून आपणही पुरेसे परिपक्व नाही हे खर्गे यांनी दाखवून दिले होते. पण मोदी यांनी आपले भाषण त्या पातळीपर्यंत खाली आणले नाही.

मोदी यांनी आपल्या भाषणात काही गोष्ट विशेषत्वाने नमूद केल्या. आपले सरकार गरिबांसाठीच असेल असे त्यांनी जाहीर केले. देशातल्या प्रत्येक कुटुंबाला स्वत:चे घर असेल. त्या घरांत २४ तास वीज असेल आणि घर तेथे शौचालय असेल असा आपला ६० महिन्यांचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला. आपण गुजरातेत सर्व गावांना २४ तास वीज देण्याची कल्पना सत्यात उतरविली आहे असे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी भाषणात देशाच्या ग्रामीण भागावर भर दिला. आपण ग्रामीण भागाला वीज देणार नाही, वाहतुकीची साधने देणार नाही आणि त्यांनी देशाला भरपूर धान्य दिले पाहिजे अशी अपेक्षा करणार हे चूक असल्याचे ते म्हणाले. आपल्या देशात हरितक्रांती झाली असल्याचे आपण कंठरवाने सांगत असतो. पण ही हरित क्रांती अजून तरी गहू आणि तांदळाच्या बाहेर गेलेली नाही. ही धान्ये गोदामात सडत असताना आणि त्यांचे भरमार उत्पादन होत असताना आपण खाद्यतेल आणि दाळी मात्र आयात करीत आहोत. ही वस्तुस्थिती आजवरचे कृषि मंत्री लपवून ठेवीत होते पण नरेन्द्र मोदी यांनी ही कमतरता दाखवून दिली. दाळींचे अधिक उत्पादन व्हावे म्हणून त्यांच्यावर संशोधन आणि त्या संशोधनाला गती देण्याचा पण त्यांनी केला.

गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अन्याय हा विषय फारच चर्चिला जात आहे. त्यावर काही नेते बेजबाबदार पणाने बोलून आपल्या विचाराची पातळी दाखवून देत आहेत. पण मोदी यावर नेमकेपणाने बोलले. संयमाने बोलले. महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तर, घरटी एक पोलीस ठेवला तरीही बलात्कार कमी होणार नाहीत असे प्रलाप काढले. तिथे या लोकांची पात्रता दिसत असते. आर. आर. पाटील जे बोलले ते एखाद्या सामान्य नागरिकाने बोलले असते तर आपण समजू शकलो असतो पण राज्याचे गृहमंत्री असे बोलायला लागले तर मग त्यांच्या हातात एवढा पोलीस फाटा दिलाय कशाला असा प्रश्‍न पडतो. आपल्या हातात असलेली ही शक्ती महिलांच्या संरक्षणार्थ अशी वापरायची याचे कौशल्य त्यांच्यात नाही. आपल्या प्रशासनात जिथे काही कमतरता रहाते, दिसते त्या कमतरतेवर मात करून समाजाच्या प्रश्‍नावर तोडगा काढणे हे तर मंत्र्यांचे काम असते पण ते काम करण्याची आपली काही औकात नाही असेच आराराबांनी दाखवून दिले. नरेन्द्र मोदी मात्र परिस्थिती कठीण असतानाही तिच्यातून मार्ग काढण्याचा निर्धार करतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. नरेन्द्र मोदी यांनी आपण देशाचे नेते होण्यास पात्र आहेत हे दाखवून दिले आहे.

Leave a Comment