बारामती कधीच बंद पाळणार नाही

baramati
बारामती- माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या बारामतीत यापुढे कोणत्याही कारणास्तव बंद न पाळण्याचा निर्णय घेतला गेला असल्याचे वृत्त आहे. देशात राज्यात कोणतीही घटना घडली तरी त्याच्या विरोधात यापुढे कधीच बारामतीत बंद पुकारला जाणार नाही. तर विरोध दर्शविण्यासाठी शहरात केवळ मोर्चा काढला जाईल असे समजते. यामुळे असा निर्णय घेणारे बारामती हे देशातील पहिले शहर ठरले आहे.सध्या सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार आहेत.

फेसबुकवर नुकतेच महापुरूषांच्या बदनामचा जो प्रकार घडला, त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी बंद पाळून सार्वजनिक मालमत्तांचे मोठे नुकसान करण्यात आले तसेच सर्वसामान्य नागरिकांचेही नुकसान झाले. त्यानंतर बारामती शांती कमिटीने रविवारी तहसीलदारांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते यशपाल भोसले यांनी विरोध दर्शविण्यासाठी बारामती बंद नको असा प्रस्ताव मांडला व त्याला उपस्थित सर्वांनी एकमताने मान्यता दिली असल्याचे समजते. या संदर्भात राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांचीही एक बैठक लवकरच घेतली जाणार असल्याचे आणि या प्रकारचे निर्णय घेण्यासाठी मोहल्ला कमिटी नेमण्याचे ठरविण्यात आले असल्याचेही समजते.

Leave a Comment