राणेंची गती आणि प्रगती

rane_10
राजकारणामध्ये पक्षाबरोबरच नेत्यांनाही महत्त्व असते. राजकारणातील नेत्यांचे महत्त्व नाकारून चालत नाही. परंतु कोणत्याही पक्षासाठी नेत्यापेक्षा पक्षाच्या विचाराला अधिक महत्त्व असते. मात्र काही राजकीय नेते पक्षापेक्षा आणि विचारासरणीपेक्षा स्वतःचाच विचार जास्त करत असतात आणि पक्षामध्ये स्वतःच्या बाबतीत काही आगळेवेगळे घडायला लागले की पक्षाला सोडून देण्याचा विचार करायला लागतात. नारायण राणे हे असेच एक स्वकेंद्रीत नेते आहेत. ते नेहमीच पक्षाला काय मिळते याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला काय मिळते याचा विचार करत असतात. त्यामुळे ते ज्या पक्षात असतील त्या पक्षात अस्वस्थ असतात. आता ही अस्वस्थ आहेतच. आपण येत्या काही दिवसात आपली वेगळी दिशा निश्‍चित करणार आहोत असे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांची ही वेगळी दिशा भाजपकडे जाणारी होती असे मध्यंतरी चर्चिले जात होते. दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे आणि नारायण राणे यांच्यात याबाबत काही चर्चा झाली होती आणि मुंडे यांनी राणे यांना काही शब्द दिला होता, असे आता सांगितले जात आहे. प्रत्यक्षात तो शब्द काय होता हे आता केवळ राणेच हे सांगू शकतील. मात्र त्या शब्दामध्ये भाजपात येणे अपेक्षित असेल तर आता तो विषय मागे पडेल असे दिसते.

कारण नारायण राणे यांना भाजपात घेऊन हँडल करण्याची क्षमता केवळ गोपीनाथ मुंडे यांच्यातच होती आणि ते तर आता हयात नाहीत. त्यामुळे आता भाजपाचे नेते राणे यांना पक्षात घेेण्याबाबत काही करतील असे दिसत नाही आणि काही करायचे झालेच तर त्याला वेळ लागेल. दरम्यान, राणे पक्षात सातत्याने घुसमट होत असल्याचे सांगत होते आणि त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे बरेच अस्वस्थ झाले होते. गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्याने राणेंेचा भाजपाकडचा प्रवास थोडा मंद झाला आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री चव्हाण यांना दिलासा मिळाला आहे. राणे यांना नेमके काय म्हणायचे आहे हे बरेचदा कळत नाही हे खरे पण ते नेहमीच अस्वस्थ असतात. पक्षात आता रुळले आहेत. असे वाटत असतानाच ते तेथे वळवळ करायला लागतात. त्यांच्या अस्वस्थतेचे एकमेव कारण म्हणजे ते ज्या अपेक्षेने पक्षात आले आहेत ती अपेक्षा पूर्ण होत नाही. त्यामुळे छोटे मोठे कारण काढून ते आपली अस्वस्थता व्यक्त करत असतात. मुळात ते कॉंग्रेसमध्ये आले तेव्हा तिथे नेतृत्वाची पोकळी आहे या कल्पनेने आले होते आणि ती नेतृत्वाची पोकळी आपण भरून काढू अशी त्यांची अपेक्षा होती. वास्तविक या पोकळीविषयी त्यांनी काढलेला निष्कर्ष तर्कशुध्द नव्हता कारण कॉंग्रेसमध्ये त्यांच्यापेक्षाही अधिक क्षमतेचे बरेच नेते होते.

कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री होण्याच्या लायकीचा कोणी राहिलेला नाही आणि आपण आत गेलो की मुख्यमंत्रीच होणार ही त्यांची कल्पना चुकीची होती. तसे दिसूनही आले. कारण नारायण राणे आत आल्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्याचवेळी राणे यांना आपण मुख्यमंत्री होणार असे वाटत होते. पण त्यांच्या अपेक्षा नसताना त्यांच्याऐवजी अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केले गेले. अशोक चव्हाण आदर्श प्रकरणात पायउतार झाले तेव्हाही नारायण राणेंच्या अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु त्यावेळी त्यांचा भ्रमनिरास झाला आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर नारायण राणे सतत अस्वस्थ असतात. खरे म्हणजे ते शिवसेनेतून बाहेर का पडले हा एक प्रश्‍नच आहे. नारायण राणे असोत की राज ठाकरे या दोघांनाही आपण शिवसेनेतून नेमके का बाहेर पडलो याचे पटण्यासारखे कारण कधीच देता आले नाही. केवळ अहंकाराच्या छोट्याशा मुद्यावरून शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. पक्षाच्या बाहेर पडण्याचे कारण एवढे अतार्किक असल्यामुळे त्यांची नंतरची वाटचालसुध्दा म्हणावी तेवढी देदिप्यमान झाली नाही. आपण पक्षातून बाहेर उगाच पडलो, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांनी तसे कधी मान्य केले नाही.

परंतु त्यांचा सारा आविर्भाव कसा आहे हे त्यांनाही नाकारता येत नाही. म्हणूनच नारायण राणे कॉंगे्रसमध्ये आपल्याला अपेक्षित ती किंमत मिळावी म्हणून धडपड करत असतात आणि तशी ती मिळाली नाही की आदळआपट करत राहतात. अशा लोकांना बाहेरही कोणी फार किंमत देत नाही. बाहेरच्या लोकांनासुध्दा ही पीडा आपल्याला नको असे वाटत असते. त्यामुळेच नारायण राणेंनी कितीही अस्वस्थता व्यक्त केली तरी त्यांना जवळ करायला अन्य कोणी तयार नाही. अती महत्त्वाकांक्षी नेत्यांची अवस्था अशीच होत असते. नारायण राणे शिवसेना सोडून बाहेर पडले आणि या महत्त्वाकांक्षेपोटीच त्यांनी चक्क कॉंग्रेसची वाट धरली. परंतु तिथे त्यांचे काही चिज झाले नाही. त्यांच्या मुलाचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. हा पराभव त्यांच्या वर्मी बसला. पण वास्तविक एकट्या नितेश राणेचाच पराभव झाला आहे असे नाही. एकंदर कॉंग्रेस पक्षाचाच दारूण पराभव झाला आहे. परंतु केवळ आपल्या मुलाच्या पराभवाचे वेगळे विश्‍लेषण करून राणे कॉंग्रेसमध्ये अस्वस्थ होत आहेत. त्यापोटी ते ज्या काही हालचाली करतील त्या हालचाली त्यांच्यासाठीच घातक ठरण्याची शक्यता आहे.

Leave a Comment