‘सीएम’पदावरून भाजपमध्ये गटबाजी !

bjp
मुंबई – नरेंद्र मोदी यांच्या लाटेने देशात भाजपची सत्ता आल्यानंतर आता विधानसभेची तयारी सुरु झाली आहे;पण त्यामुळे पक्षातच गटबाजी कशी आहे ,याचा प्रत्यय आतापासून येत आहे. यंदाची लोकसभा ही गट -तट विरहित झाली पण आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा गटबाजी सुरु झाली आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण ? यावरून भाजपमध्ये ‘पारा’य़ण रंगण्याची चिन्हे आहेत. त्यात भाजपचे नेते विनोद तावडे यांनी निवडणुकीचे नेतृत्व गोपीनाथ मुंडे यांच्याकडेच असणार असल्याचे तसेच ‘सीएम’ पदाचा फैसला पक्षाचे केंद्रीय संसदीय मंडळ करणार असल्याचे स्पष्ट केल्याने एका गटाच्या तयारीला लगाम घातला गेला आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना ही अधिक जागा लढवते, मात्र यंदा नरेंद्र मोदींच्या करिष्यामुळे भाजपकडून अधिक जागांवर दावा केला जात आहे. मुख्यमंत्रिपदावरुनही खलबते सुरु आहेत. देशाप्रमाणेच राज्यातही चेहरा दिल्यास निवडणुकीतील यश आणखी वाढेल, असाही एक मतप्रवाह आहे.त्यातूनच ‘देशात नरेंद्र ,राज्यात देवेंद्र ‘हा प्रचार सुरु झाला आहे,त्यात शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर आधीच दावा ठोकलेला असला तरी खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही तशी इच्छा व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सुरु असलेल्या प्रचाराला लगाम घालण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. विधानसभेची निवडणूक गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली लढवू. मात्र मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार नंतरच निवडला जाईल असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे .

एका गटाकडून राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे नांव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आणले जात आहे. यासंदर्भात तावडे म्हणाले, राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मुंडे यांच्याकडेच नेतृत्व असेल. तर मुख्यमंत्रीपदाचा कोणताही उमेदवार निवडणुकीपूर्वी भाजपकडून जाहीर करण्यात येणार नाही. शिवसेना भाजप महायुतीत मुख्यमंत्रीपदाबाबतचे धोरण ठरलेले आहे. त्यामुळे भाजपचे जास्त आमदार निवडून आले तर पक्षाचे केंद्रीय संसदीय मंडळ निर्णय करेल.मुख्यमंत्री हा महायुतीचा होईल. तसेच अडीच -अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याबाबतचा पर्याय असू शकतो. असेही ते म्हणाले.