मुख्यमंत्रीपदासाठी चौरंगी लढत

vidhansabha2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची निवड अजून किमान चार महिने तरी लांब आहे. परंतु त्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचे तीन नेते आणि शिवसेनेचे उध्दव ठाकरे यांच्यात आतापासूनच चढाओढ सुरू झाली आहे. या चढाओढीतून भाजपामध्ये अंतर्गत रस्सीखेच जारी झाली आहे. तर भाजप आणि शिवसेना यांच्यातसुध्दा आंतरपक्षीय रस्सीखेच सुरू आहे. या शर्यतीत उध्दव ठाकरे यांनी मोठी रंगत आणली आहे. कारण त्यांनी अनपेक्षितपणे या मैदानात उडी मारली आहे. बाळासाहेब ठाकरे हे हयात असेपर्यंत ठाकरे घराण्यातला कोणीही निवडणूक लढवायची नाही असे पथ्य पाळले जात होेते. शिवसेनेची लोकप्रियता मुंबईत तरी चांगली होती आणि आहे. शिवाय काही दिवस कोकणामध्ये आणि मराठवाड्यातही शिवसेनेसाठी अनेक सुरक्षित मतदारसंघ होते. त्यातल्या कोणत्याही मतदारसंघातून ठाकरे घराण्यातील सदस्याला सहज निवडून आणता आले असते पण कै. बाळसाहेबांनी तो मोह टाळला. ठाकरे घराण्याचा कोणताही सदस्य निवडणूक लढवणार नाही हा शब्द त्यांनी शेवटपर्यंत पाळला. अर्थात, तसे असले तरी त्यांनी तशी प्रतिज्ञा का केली होती याचा उलगडा कधीच झाला नाही आणि बाळासाहेबांना त्याबाबत कोणी कधी प्रश्‍नही विचारला नाही.

अगदी अलीकडे अलीकडे पर्यंत सगळेच लोक असे गृहित धरून चालले होते की ठाकरे घराण्यातील नेते शिवसेना चालवत असले तरी त्यांना स्वतःला निवडून येण्याची महत्त्वाकांक्षा नाही. परंतु आता वातावरण बदलले आहे. उध्दव ठाकरे यांची राजकीय महत्त्वाकांक्षा किंवा पदासाठीची आकांक्षा जागी झाली आहे. त्यांनी आड पडदा न ठेवता उघडपणे आपली ही इच्छा बोलून दाखवली आहे. उध्दव ठाकरे यांच्या वागण्या, बोलण्यात तसा सरळपणा आहे आणि त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करणे यात चुकीचे काही नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचा जोर आहे. या पक्षाचे १८ खासदार निवडून आले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये जागावाटप झाल्यास पूर्वी ठरलेल्या सूत्रानुसार शिवसेनेला जास्त जागा मिळतील. पूर्वी शिवसेनेने १७१ आणि भाजपाने ११७ जागा लढवाव्यात असे ठरले होते. बरीच वर्षे कसलीही तक्रार न करता प्रत्येक निवडणुकीत असेच जागा वाटप होत राहिले. भाजपाच्या नेत्यांना आता आपला जोर वाढल्याचा भास व्हायला लागला आहे. भाजपाचा स्ट्राईक रेट शिवसेनेेपेक्षा चांगला आहे आणि आता शिवसेनेला मिळालेला विजय मोदी लाटेमुळे म्हणजे भाजपामुळेच मिळालेला आहे. अशी भाजपाच्या कार्यकर्त्यांची भावना झाली आहे आणि म्हणून जागा वाटपाचे सूत्र बदलावे, अशी भाजपाची मागणी आहे.

तिच्यावरून महायुतीत संघर्ष निर्माण झाला आहे पण तो अजून आतल्या आत चालला आहे. वरिष्ठ पातळीवर अजून याबाबत काही चर्चा झालेली नाही. तशी चर्चा होऊन भारतीय जनता पार्टीला १०-५ जागा जास्त सुटल्या आणि शिवसेनेच्या तेवढ्या कमी झाल्या. तरी शिवसेना भाजपापेक्षा जास्त जागा लढवणार हे नक्की आहे. जागा जास्त लढवल्या तरी जिंकून किती येणार हा मुद्दा महत्त्वाचा आहे. उध्दव ठाकरे यांना तरी भाजपापेक्षा आपल्याच जास्त जागा निवडून येणार असे वाटते. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नांना बळ मिळत आहे. आपण मुख्यमंत्री व्हावे ही शिवसैनिकांचीच इच्छा आहे. असे म्हणत का होईना उध्दव ठाकरे मैदानात उतरण्यासाठी लंगोट बांधायला लागले आहेत. लोकसभा निवडणुका होईपर्यंत उध्दव ठाकरे आणि शिवसेना हा चेष्टेचा आणि उपेक्षेचा विषय झाला होता. भाजपा आणि शिवसेना यांची २५ वर्षांची युती असली तरी भाजपाच्या काही नेत्यांना उध्दवपेक्षा राज बरे असे वाटायला लाागले होते. शिवसेनेतून बरेच लोक चालले होते आणि पक्षाला गळती लागली होती. उध्दव ठाकरे कितीही आत्मविश्‍वासाची भाषा वापरत असले तरी त्यांच्या मनाचा एक कोपरा तरी न्यूनगंडाने व्यापलेला होता. परंतु लोकसभा निवडणुकीच्या १८ जागांचा बूस्टर डोस त्यांना असा काही मानवला आहे की त्यांनी मुख्यमंत्रीपदाची तयारी सुरू केली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत आलेली मोदी लाट विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत कायम राहील. हा विश्‍वास हाच त्यांचा आधार आहे. मात्र दुसर्‍या बाजूला भारतीय जनता पार्टीमध्ये वेगळेचे विचार सुरू झाले आहेत. महाराष्ट्रात आजवर तरी युतीची सत्ता एकदाच आली. त्यावेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. परंतु आता भाजपाचा मुख्यमंत्री केला जावा असे उघडपणे भाजपाचे नेते बोलत आहेत. त्यांच्या अपेक्षेनुसार खरोखर महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली आणि भाजपाचे आमदार जास्त निवडून आले तर भाजपा नेते गप्प बसणार नाहीत. ते मुख्यमंत्रीपदावर दावा सांगणारच आहेत. तशी शक्यता त्यांना दिसतही आहे. कारण सध्या विरोधी पक्षनेतेपद भाजपाकडे आहे. भाजपाचा मुख्यमंत्री करायचा झाला तरी भाजपात याबाबत एकमत दिसत नाही. दिल्लीत नरेंद्र तर मुंबईत देवेंद्र अशा घोषणा काही लोकांनी केल्या आहेत. अशा या घोषणेतील इंद्र समान असला तरी केवळ नावातल्या साम्यावरून कोणी मुख्यमंत्री होत नसते. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे हेच सर्वाधिक शक्तीशाली भाजपा नेते आहेत आणि महाराष्ट्रात सत्ता आल्यास तेही आपली हॅट मैदानात टाकल्याशिवाय राहणार नाहीत. मुंडे यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा अजूनही दिल्लीत रहावे की मुंबईत यावे याचा निर्णय होत नाही. त्यांनी महाराष्ट्रात मोठा झंझावात निर्माण केला परंतु दिल्लीत मंत्री होण्याच्या संधी दिसताच दिल्लीत राहण्याचा निर्णय घेतला. आता त्यांना पुन्हा मुंबईत येण्याचा मोह होणारच नाही असे सांगता येत नाही. तेव्हा अजूनही हाती न आलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी चौरंगी लढत रंगायला लागली आहे.

Leave a Comment