पोलीस की हैवान ?

police
प्रत्येक माणसात देवाचा अंश असतो तसा सैतानाचाही अंश असतो. त्याची ही दोन्ही रूपे प्रसंगानुसार प्रकट होत असतात पण हैवानपणालाही काही मर्यादा असावी की नाही ? आपल्या क्षुद्र स्वार्थासाठी माणसातला हैवान मर्यादेबाहेर आणि हैवानालाही लाजवेेल अशा रितीने प्रकट व्हायला लागला तर तिथे माणूसकीचे थडगे बांधले जाते. आपल्या स्वतंत्र भारतातल्या पोलिसांनी तर मर्यादेने वागायला हवे पण तेच काही काही वेळा राक्षसासारखे वागायला लागतात. सामान्य माणूस मस्तीला आला आणि त्याने हैवानियत प्रकट केली तर त्याला वठणीवर आणायला पोलीस असतात पण पोलीसच मस्ती करायला लागले तर त्यांना कोणी सरळ करावे ? असा प्रश्‍न निर्माण झालाय मराठवाड्यातल्या उस्मानाबाद जिल्ह्यात. या जिल्ह्यातल्या एका गावातले नागरिक दारूबाजांमुळे वैतागले आणि त्यांनी दारुबंदीची मागणी केली. पण त्यांना दारुबंदीच्या ऐवजी पोलिसांच्या लाठयांचा प्रसाद मिळाला. इतका की जनावरांनाही कोणी एवढे निर्दयपणाने मारत नसेल. आता या प्रकरणाने राज्य सरकारे आणि सरकारच्या गृहखात्याचे वस्त्रहरण होण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारने विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी वेगाने पावले टाकायला सुरूवात केली आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत तरी असा पराभव होऊ नये यासाठी ही धडपड आहे. शरद पवार यांनी तर म्हणे वयाच्या चक्क ७४ व्या वर्षी अठरा अठरा तास काम करायला सुरूवात केली आहे. निवडणुकीतला विजय किंवा पराजय हा किती तास काम करतो यावर अवलंबून असेल तर या अठरा तासाचे फळ पवारांना नक्कीच मिळेल. पण निवडणुकीचा निर्णय आपण गेली पाच वर्षे काय काम केले आहे आणि राजकारणात काय पेरले आहे यावर अवलंबून असतो. महाराष्ट्राच्या सरकारने महाराष्ट्राचा बिहार करायचाच अशा निर्धाराने जे पेरले आहे ते आता उगवत आहे. महाराष्ट्रात गरीब, दलित आणि महिला यांच्यावर होणारे अत्याचार वाढत आहेत आणि सरकार बरोबरच पोलीसही त्याकडे बघ्यांच्या दृष्टीकोनातून पहात आहेत. हा तर या सरकारचा नित्यक्रम आणि अंगांगी भिनलेली खोड आहे पण आता पोलिसांनीच दारू धंदेवाल्यांच्या संरक्षणासाठी गोरगरीब लोकांवर अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कनगरा या गावात लोकांनी दारू धंदेवाल्यांच्या विरोधात तक्रार केली म्हणून पोलिसांना राग आला आणि त्यांनी या लोकांना खाकी दहशतवादाचे दर्शन घडवले.

या गावातल्या काही लोकांनी आपल्या गावाच्या जवळच्या बेंबळी पोलीस ठाण्यात गावातल्या दारूच्या वाढत्या व्यवसायाबाबत तक्रार दाखल केली होती. दारूचा व्यवसाय करणारे धंदेवाले आणि गुत्तेवाले यांचे हात वरपर्यंत पोचलेले असतात. पण गावकरी पुढे सरसावले आणि त्यांनी पोलिसांकडे अर्ज दिला. पण पोलिसांंनी तक्रार दाखल करून घेण्याच्या ऐवजी लोकांनाच धमकवायला सुरूवात केली. गावात दारूचे प्रमाण वाढले असेल तर धाडी घालणे हे पोलिसांचे काम आहे पण त्यांनी लोकांनाच पुरावा दाखल करण्याचे आव्हान दिले. असे असेल तर ते आव्हान देणारा शूर पोलीस अधिकारी जागीच निलंबित झाला पाहिजे पण तसे काही झाले नाही. लोकांनीही हे आव्हान स्वीकारले आणि चोरटी दारू पकडून दिली. या गावात केवळ दारूचे प्रमाण वाढल्याचाच तो पुरावा होता असे नाही तर पोलीस आणि दारूधंदेवाल्यांची हात मिळवणी झाल्याचा तो पुरावा होता. त्यामुळे पोलीस खवळले. तिघा कॉन्स्टेबलांनी तर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलीस जर असे वागत असतील तर लोकांना त्यांचा राग येणारच. लोकांनी या तिघांना बदडून काढले. पण त्याचा राग मनात धरून पोलिसांनी आपले सारे पाशवी बळ पणाला लावून गावातल्या १०० ते १५० लोकांना मध्यरात्री, त्यांच्या घरात घुसून जबर मारहाण केली.

घरात घुसण्यासाठी पोलिसांनी लोकांच्या घरांचे दरवाजे तोडले. जवळपास २०० पोलीस होते आणि ते पोलिसांच्या बरोबरच खाजगी वाहनांतूनही आले होते. गुंडांच्या मोठ्या टोळीने आपापसातल्या अदावतीचा बदला घेण्यासाठी हल्ला करावा तसा हा हल्ला होता. पोलीसच दहशतवादी झाले होते. हे पोलीस नव्हते तर कोणाचा तर बदला घेण्यासाठी बेभान झालेले अविचारी गुंड होते. त्यांनी गावकर्‍यांवर एवढी दहशत बसवली आहे की आता गावातले अनेक लोक आणि तरुण गाव सोडून परागंदा झाले आहेत. कारण त्यांनी मारहाण झालेल्यांची अवस्था पाहिली होती. मारहाण झालेल्या लोकांना पोलिसांनी कत्तल करण्याच्या कोंबड्या किंवा डुक्कर एका गाडीत कांंेंबून एकमेकांच्या अंगावर टाकून नेतात तसे उस्मानाबाद येथील पोलीस ठाण्यात नेले. लोकांना अद्दल घडवण्याची ही सुपारी या पोलिसांना कोणी दिली होती हे काही सांगण्याची गरज नाही. कदाचित ही मारहाण करताना त्यांनी दारू ढोसलेलीच असणार. काही वेळाने त्यांची नशा उतरली पण या घटनेचे पडसाद राज्यात उमटणार याचा अंदाज येताच त्यांचे डोळे उघडले. आता काही पोलिसांना निलंबित करून सावरून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे पण या गावातले लोक प्रश्‍न विचारत आहेत की आपल्या घरातल्या महिलांची बेअब्रू होऊ नये म्हणून तक्रार करणे हा काही गुन्हा आहे का ?

Leave a Comment