फिलिप्सचे चार नवे फोन बाजारात

philips
फिलिप्सने चार नव्या फोनसह भारतीय मोबाईल बाजारात पुनरागमन केले आहे. तीन नवे स्मार्टफोन आणि १ फिचर फोनचा त्यात समावेश असून त्यांच्या किंमती १९६० ते २०,६५० रूपयांच्या दरम्यान आहेत. स्मार्टफोनची डब्ल्यू ६६१०, डब्ल्यू ३५०० व एस ३०८ ही रेंज कंपनीने बाजारात आणली आहे तर ई १३० हा फिचर फोन आहे.

फिलिप्सने भारतात गेल्या दशकाच्या सुरवातीला केवळ फिचर फोन विकले आहेत. मात्र देशात स्मार्टफोनची बाजारपेठ ज्या वेगाने वाढत चालली आहे ती पाहता कंपनीने स्मार्टफोन क्षेत्रातही आपले पाऊल रोवण्याचा आणि येत्या डिसेंबर अखेर या क्षेत्रातील सहा नामवंत कंपन्यात स्थान मिळविण्याचे ध्येय ठेवले असल्याचे कंपनीचे कंट्री मॅनेजर एस.एस. बस्सी यांनी सांगितले. शनझेन सांग फेई कंझ्युमर कम्प्युटिंग कंपनीकडून फिलिप्सच्या फोनची विक्री केली जाते.

बस्सी म्हणाले की गेल्या कांही महिन्यात आम्ही भारतातील वितरणाचे जाळे मजबूत केले आहे. त्यामुळे आमचे फोन ग्राहकांना सहज उपलब्ध होणार आहेत. येत्या कांही महिन्यात आणखीही कांही नवी मॉडेल कंपनी बाजारात आणणार आहे.