शरद पवार यांनी कंबर कसली

sharad-pawar_2
आपण आता सक्रीय राजकारणात फार काही राहणार नाही, असे म्हणून अंशतः का होईना पण राजकारण संन्यासाचे संकेत देणारे शरद पवार आता लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे संन्यासाऐवजी अधिक जोरदारपणे कामाला लागले आहेत. विविध राजकीय पक्षांप्रमाणेच त्यांच्याही राष्ट्रवादी कॉंग्रेसने पराभवाचे चिंतन केले, कारणमीमांसा केली आणि आता मोठा ऍक्शन प्लॅन किंवा कृती आराखडा समोर ठेवून महाराष्ट्राच्या विधानसभेत मोठे यश मिळवायचेच या निर्धाराने पावले टाकायला सुरूवात केली आहे. श्री. शरद पवार हे राजकारणात मुरलेले नेते आहेत. निवडणुका कशा लढवाव्यात, एखाद्याला ठरवून कसे पाडावे आणि निवडणुका कशा जिंकाव्यात याचे ज्ञान आणि कसब त्यांच्या एवढे कोणाकडेच नाही असे निदान मानले तरी जाते. त्यामुळे त्यांनी एकदा मनावर घेतले की राष्ट्रवादी कॉंग्रेस मोठी झेप घेणार असा विश्‍वास त्यांच्या कार्यकर्त्यांत तरी का होईना निर्माण होत आहे. तसा तो निर्माण होणे गरजेचे आहे. कारण तो निर्माण झाला नाही तर पक्षाला गळती लागल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीत पवारांनी कंबर कसली आहे आणि ते नेटाने कामाला लागले आहेत.

पक्षाची अवस्था वाईट तर आहेच कारण तो जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. उत्तर प्रदेशात भाजपाचे खासदार वगळता यादव घराण्यातील चार आणि गांधी घराण्यातील दोन उमेदवार विजयी झाले आहेत. तशीच अवस्था थोड्याफार फरकाने राष्ट्रवादीची झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुप्रिया सुळे बारामतीतून निवडून आल्या आहेत. त्यांचे मताधिक्य लाखाच्या आत आले आहे. हा खरा त्यांचा पराभवच आहे. बाकीच्या तीन उमेदवारांत सातार्‍याच्या राजघराण्यातले उदयनराजे पवार किंवा राष्ट्रवादी यांच्या पुण्याईवर निवडून आलेले नाहीत. ते शिवाजी महाराजांचे वंशज आहेत आणि महाराष्ट्रातले मतदार शिवाजी महाराजांवर किती प्रेम करतात हे सर्वांना माहीत आहे. कोल्हापूर मुन्ना महाडिक आणि माढ्याचे विजयसिंह मोहिते-पाटील हे दोन उमेदवार राष्ट्रवादी म्हणून नव्हे तर सहकार क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामावर निवडून आले आहेत. निवडणूक निकाल लागल्याच्या दोन दिवसांनी सातार्‍यामध्ये उदयनराजेंच्या समर्थकांनी उदयनराजे आणि नरेंद्र मोदी या दोघांची छायाचित्रे असलेले डिजीटल फलक झळकावले. म्हणजे उदयनराजे कोठे जात आहेत हे लक्षात येते. राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था मोठी वाईट आहे. हा पक्ष श्री. शरद पवार यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी निर्माण झालेला आहे.

त्यामुळे पक्षाची अवस्था अशीच वाईट झाली तर शरद पवार यांच्या राजकारणातल्या स्थानावर गंभीर परिणाम होऊ शकतो. म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पराभवामुळे श्री. शरद पवार सर्वाधिक अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी आता पक्षाला पुनरुज्जीवित करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट आली असली तरी विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत ती लाट टिकणार नाही असा विश्‍वास शरद पवार यांना वाटतो. पवारांनी काय समजावे हा त्यांचा विषय आहे. परंतु विधानसभेच्या निवडणुकीत मोदी लाट लोकसभेएवढ्या तीव्रतेने प्रकट होणार नाही हे जितके खरे आहे तितकेच उलट शरद पवार यांची लाट निर्माण होणार नाही हेही खरे आहे. तशी लाट निर्माण करण्याइतकी विश्‍वासार्हता त्यांच्यात शिल्लक राहिलेली नाही. नरेंद्र मोदींनी देश पालथा घातला पण शरद पवार यांच्यात महाराष्ट्रसुध्दा पालथा घालण्याची शारीरिक ताकद शिल्लक राहिलेली नाही. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातल्या एका फरक मात्र राष्ट्रवादीसाठी लाभदायक ठरू शकतो की राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये ज्यांच्या सभांना १०-५ हजार लोक जमतील असे दोन-चार का होईना नेते आहेत.

आर. आर. पाटील, अजित पवार, छगन भुजबळ यांना सारा महाराष्ट्र ओळखतो. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत झंझावाती प्रचार करायचा झाला तर त्या प्रचारासाठी शरद पवार हे एकुलते एक नेते आहेत. असे काही चित्र नाही. चांगल्या जाहीर सभा होऊ शकतील. म्हणूनच आपल्या पक्षाची ही शक्ती ओळखून शरद पवार यांनी आपल्या मंत्रीमंडळातील विविध मंत्री आणि काही ज्येष्ठ नेते यांना पक्षाचे नवे प्रवक्ते म्हणून नेमले आहे. जुने सर्व प्रवक्ते काढून टाकले आहेत. १५ जून पासून हे सगळे मंत्री विविध जिल्ह्यांमध्ये जाहीर सभा घेतील आणि आपल्या सरकारने केलेले काम लोकांना समजावून सांगतील. शरद पवार यांनी जनसंपर्कासाठी ३० समित्या स्थापन केल्या आहेत आणि या समित्या आता भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराच्या धर्तीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पक्षाचा प्रचार करणार आहेत. एकंदरीत शरद पवार यांनी प्रचाराची यंत्रणा तर जोरदार तयार केली आहे. पण एवढ्यावरूनही त्यांच्या पक्षाचे निवडून येणे किंवा न येणे हे केवळ यंत्रणेवर अवलंबून नसून यंत्रणेकडून दिल्या जाणार्‍या संदेशावर अवलंबून आहे. केंद्रात कॉंग्रेसचा पराभव झाला त्याला भ्रष्टाचार कारणीभूत ठरला अशा निष्कर्षाप्रत सर्वजण आले आहेत. महाराष्ट्रात तर भ्रष्टाचाराचा मुद्दा अधिक प्रभावी आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष भ्रष्ट आहेत. परंतु त्याच सरस-निरस करायचेच ठरवले तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बहुसंख्य मंत्र्याच्या चेहर्‍यावर भ्रष्टाचारचा काळीमा कॉंग्रेसच्या तुलनेत जास्त लागला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला या संकटातून कसे मुुक्त व्हायचे हा मुख्य प्रश्‍न भेडसावणार आहे. मोदी लाट विधानसभेपर्यंत टिकणार नाही एवढ्या एका गोष्टीच्या जोरावर शरद पवार यांना फार उड्या मारता येणार नाहीत.

Leave a Comment