असे असावे नवे सरकार

modiनरेन्द्र मोदी यांच्या सरकारमध्ये अरुण शौरी हे अर्थमंत्री असतील असे नवे अनुमान पुढे आले आहे. गृहमंत्रीपद राजनाथसिंह यांना तर संरक्षण मंत्रीपद मुरली मनोहर जोशी यांना मिळेल असे दिसत आहे. अंदाजांचा बाजार गरम आहे. तसे होणे साहजिक आहे कारण नवा पक्ष सत्तेवर आल्यास तसे होतच असते. वृत्तपत्रांना आणि माध्यमांना त्या बाबत बातम्या हव्याच असतात. तसे तर एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर झाल्यापासूनच या सरकारच्या रचनेबाबतच्या अटकळींना प्रारंभ झाला होता. निवडणुका होण्याच्या आधी आणि मोदीचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर होण्याच्या आधी एक वेगळीच चर्चा सुरू झाली होती. ती म्हणजे भाजपाला सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली तरीही मोदी पंतप्रधान होतील की नाही ? गेल्या दोन महिन्यांपासून भाजपा आघाडीवर असल्याचे संकेत मिळत होते. भाजपा आणि कॉंग्रेसच्या प्रचारात किती फरक आहे हे दिसतच होते. भाजपा सत्तेवर येणार हे नक्की पण जर भाजपाला स्पष्ठ बहुमताचा आकडा गाठता आला नाही आणि वाजपेयींच्या सरकारप्रमाणे रालो आघाडीच्या बाहेरून काही खासदारांची मदत घ्यावी लागली तर काय ? ही मदत देणार्‍या पक्षांनी मोदी पंतप्रधान नकोत अशी भूमिका घेतली तर काय होईल ? त्यांनी अडवाणी यांच्या नावाचा आग्रह धरला तर भाजपाला मोदींना डावलून अडवाणींना पंतप्रधान करावे लागेल अशी गणिते मांडली जायला लागली होती. खुद्द अडवाणी अशाच स्थितीबाबत आशावादी होते.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तर किती तरी वेळा तसे म्हटले होते. भाजपाला सर्वात जास्त जागा मिळतील पण मोदी पंतप्रधान होणार नाहीत असे भाकित त्यांनी वर्तवले होते. त्यावर अनेकांचा विश्‍वासही होता. आता पवारांना आपल्या राजकारणाचा अंदाज घेण्याची क्षमता तपासून पाहिली पाहिजे. कारण, मोदी भाजपाला २३० च्या आसपास जागा मिळवून देतील असे अगदी तोंड वाकडे करून म्हणणार्‍यांच्या अंदाजांंना शह देऊन मोदींनी ३३५ जागा मिळवून दिल्या आहेत. आता मोदी पंतप्रधान न होण्याची त्यांची आणि अनेक प्रादेशिक नेत्यांची इच्छा अपुरी राहिली आहे. आता भाजपाचे सरकार मोदी म्हणतील तसे होणार आहे कारण मोदी हे आता कोणाच्या इशार्‍याने चालणारे पंतप्रधान होणार नाहीत. मोदींचे विरोधक कसे दुतोंडी भाषा वापरत असतात हे काही वेळा लक्षात येते. सरकारच्या रचनेबाबत मोदी आपल्या मर्जीने सारे काही करायला लागले तर हे विरोधक त्यांना हिटलरची उपमा देतात पण त्यांनी संघाच्या नेत्यांशी विचार विनिमय केला तर संघाच्या ओंजळीने पाणी पीत असल्याची टीका करतात. या सगळ्या टीकाकारांकडे दुर्लक्ष करून भाजपाच्या सरकारच्या गठणावर चर्चा सुरू झाल्या आहेत.

सत्ता हाती आली की विविध पदांसाठी रस्सीखेच होतच असते. तशी भाजपात सुरूही झाली असेल पण अजून तरी त्यातून माध्यमांना कसले खाद्य मिळालेले नाही. भाजपाच्या कोणत्याही नेत्याने जी काही चर्चा असेल ती माध्यमांत नेलेली नाही. काही माध्यमांना भाजपा नेत्यांत रस्सीखेच व्हावी आणि आपल्याला सनसनाटी बातमी मिळावी असे वाटते पण तसे काही होताना दिसत नाही. निवडणुकीच्या काळातच असे काही तरी घडेल असे काही लोकांना वाटत होते पण सारी निवडणूक होत असताना भाजपामध्ये वादावादी किंवा मतभेदांचे प्रदर्शन घडले नाही. त्यांनी निवडणूक एकदिलाने लढवली. जे झाले ते मतभेद मिटवले गेले. त्याच एक दिलाने आता सरकारचेही गठण होईल अशी शक्यता दिसत आहे. नरेन्द्र मोदींच्या नेतृत्वाखाल्या मंत्रिमंडळात आपल्याला मोक्याचे खाते मिळावे असे काही ज्येष्ठ नेत्यांना तर वाटतेच पण काही नव्या नव्या खासदारांनाही वाटते पण त्या सर्वांनाच एक जाणीव आहे की, यापुढे मोदी मंत्रिमंडळात मंत्री होणे हे सोपे नाही. कारण या सरकारने भारत वासीयांना चांगल्या कामगिरीचे वचन दिलेले आहे. तेव्हा मोदींच्या मंत्रिमेडळातले मंत्रिपद हा मुकूट आहे पण तो काटेरी मुकूट आहे. मंत्री होणारांना उत्तम कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. मंत्रिपद हा केवळ मान नाही तर ती जबाबदारी आहे. मनमोहनसिंग सरकारचा मंत्री होणे सोेपे होते. त्यांनी आपल्या मंत्र्यांना पहिल्या १०० दिवसांत काही तरी मोठा निर्णय घेण्यास सांगितले होते आणि आपले मंत्री तसे करतील अशी घोषणा केली होती पण, एकाही मंत्र्याने तसे काही केले नाही.

मोदी मंत्रिमंडळात कोण असेल यावर दररोज एक अफवा पसरत आहे. विशेषत: गृह, रेल्वे, अर्थ, परराष्ट्र आणि संरक्षण या मोठ्या खात्यांची सूत्रे कोणाकडे जातात यावर अनेक अंदाज व्यक्त होत आहेत. शिवाय ही खाती ज्यांना ज्यांना मिळतील असे अंदाज व्यक्त झाले आहेत त्यांना खरेच कोणती खाती मिळतील यावर चर्चा सुरू झाली आहे. या संबंधात अरुण शौरी, राजनाथसिंह, मुरली मनोहर जोशी, नितीन गडकरी, मनोहर पर्रिकर, अरुण जेटली, सुषमा स्वराज्य, बी. सी. खंडुरी, इत्यादी नावे समोर आली आहेत. पण भाजपाच्या या मंत्र्यांकडे आणि सरकारकडे सर्वांचे लक्ष आहे. यातले कोणतेही मंत्री कॉंग्रेसच्या मंत्र्यांपेक्षा सरस आहेत. हे सरकार फारच कार्यक्षम असावे लागेल. मोदींना विकास हा आपल्या राष्ट्रीय जीवनातला परवलीचा शब्द करायवा आहे.

Leave a Comment