
वाहन उद्योगाचे फिरलेले ग्रह अजूनही जाग्यावर येण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. कामगार व व्यवस्थापन यांच्यातील संघर्ष (वर्षाची सुरुवात केली ती मारूती सुझुकीनं, तर ते संपविलं टॉयोटाच्या दक्षिणेतील प्रकल्पामधील तंटय़ानं), स्थानिक बाजारपेठेकडून निराशाजनक प्रतिसाद, वाढते इंधन दर यांच्यामुळं तोंडाला फेस आलाय तो उत्पादन करणाऱया कंपन्यांच्या तोंडाला…पी. चिदंबरम यांनी अंतरिम अंदाजपत्रकाच्या वेळी उत्पादन शुल्क कपातीचा डोस पाजलेला असला, तरी काँग्रेसच्या इतर अनेक धोरणांप्रमाणं तो सुद्धा प्रभावी ठरू शकलेला नाही. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे संपलेल्या आर्थिक वर्षात (2013 – 14) तब्बल दीड लाख कामगारांना रोजगार गमवावा लागला…
वाहन उद्योगालाही अच्छे दिन ची प्रतीक्षा
`सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मेन्युफॅक्चरर्स’नं (सियाम) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मार्च, 2013 ते एप्रिल, 2014 या कालावधीत प्रवासी कारविक्री 4.65 टक्क्यांनी घसरून पोहोचली ती 17 लाख 80 हजारांवर. गेल्या आर्थिक वर्षात सुद्धा तिची घसरण झाली होती ती तब्बल 6.69 टक्क्यांनी…तथापि एकूण वाहनांच्या विक्रीनं नोंद केली ती 1 कोटी 84 लाखांची (3.53 टक्क्यांची वाढ)…दुचाकीमध्ये 7.31 टक्के वाढ पाहायला मिळाली नि त्यात समावेश होता तो स्कूटरच्या 23.24 टक्क्यांनी वाढलेल्या विक्रीचा. मोटरसायकलनं देखील 3.91 टक्क्यांची वाढ नोंदविली…2012 – 13 आर्थिक वर्षात 28 लाख 98 हजार 907 वाहनांची निर्यात करण्यात यश मिळविलेल्या भारतानं 2013 – 14 मध्ये विदेशात पाठविली ती 31 लाख 7 हजार 893 वाहनं. परंतु वाणिज्य वाहनांची विक्री मात्र 20.23 टक्क्यांनी कोसळली…2013 – 14 आर्थिक वर्षात वेगवेगळय़ा कंपन्यांनी उत्पादन केलं होतं ते 2 कोटी 14 लाख 81 हजार 526 वाहनांचं (गेल्या आर्थिक वर्षात 2 कोटी 6 लाख 47 हजार 611)…
गेल्या आर्थिक वर्षात पुन्हा एकदा या क्षेत्रावर वर्चस्व गाजविलं ते `मारूती सुझुकी’नं. त्यांचा बाजार हिस्सा पोहोचला 42 टक्क्यांवर (गेल्या आर्थिक वर्षात 39.43 टक्के). दक्षिण कोरियाच्या `हय़ुंदाई’नं 15.18 टक्क्यांची नोंद केली अन् स्वतःला सावरलं…तिसरा क्रमांक पटकावला तो 10.15 टक्क्यांसह `महिंद्र ऍण्ड महिंद्र’नं. `स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल’ क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या कंपनीनं `टाटा मोटर्स’ला तिसऱया स्थानावरून दूर सारलं (मात्र विक्री 18.14 टक्क्यांनी उतरली). सध्या `टाटां’चा हिस्सा पोहोचलाय तो 7.94 टक्क्यांवर (गेल्या वर्षी हिस्सा 11.65 टक्के, परंतु घसरण 36.77 टक्क्यांची)…डिझेल `अमेझ’ नि `सिटी’चा नवा मॉडेल यांच्या जोरावर `होंडा’नं पाचवा (बाजार हिस्सा 5.36 टक्के), तर कामगारांच्या प्रश्नांना तोंड देणाऱया `टॉयोटा’नं सहावा क्रमांक (मार्केटातील वाटा 5.14 टक्के) मिळविला…वाहन क्षेत्रातील विश्लेषकांच्या मते, भविष्यात तब्बल 35 नवीन मॉडेल्स बाजारात दाखल होणार असून त्यांच्यासाठी कंपन्यांनी गुंतवणूक केलीय ती 20 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांची. पण हा उद्योग भरभराटीस येण्यासाठी देशाला 7 ते 8 टक्के आर्थिक वृद्धी दर गाठावा लागेल…
