राजवर्धनसिंह विजयी अझहरुद्दीन, कैफ क्लीन बोल्ड

azaruddin

नवी दिल्ली– लोकसभा निवडणुकीच्या आखाडयात उतरलेल्या देशातील खेळाडूपैकी ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता नेमबाज राजवर्धनसिंह राठोड विजयी ठरला आहे. या निवडणुकीतील मोदीच्या लाटेत ज्येष्ठ क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीन व महम्मद कैफ हे मात्र क्लीन बोल्ड झाले आहेत. त्याचप्रमाणे ख्यातनाम फुटबॉलपटू बायच्युंग भूतिया व हॉकीपटू दिलीप तिर्की यांनाही या निवडणुकीत विजय मिळविता आला नाही.

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून निवडणुक लढवीत असलेला ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता नेमबाज राजवर्धनसिंह राठोड विजयी ठरला आहे. राजवर्धनसिंहने जयपूर ग्रामीण मतदारसंघातून बाजी मारली आहे. त्याने राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस सी.पी.जोशी यांचा तीन लाखांहून अधिक मतांनी धुव्वा उडविला. त्याला ६ लाख ३२ हजार ९३० मते मिळाली तर जोशी यांना तीन लाख ३४ मते मिळाली.

विद्यमान खासदार अझहरुद्दीन यांनी मुरादाबादऐवजी यंदा राजस्थानमधील टोंक सवाईमाधोपूर मतदार संघातून निवडणूक लढवली. भाजपचे सुखबीरसिंग जौनपुरिया यांनी त्यांचा सव्वा लाख मतांनी पराभव केला. सुखबीरसिंग यांना ५ लाख ४८ हजार १७९ मते मिळाली तर अझहरुद्दीन यांना ४ लाख १२ हजार ८६८ मते मिळाली. आणखी एक क्रिकेटपटू कैफला या निवडणुकीत अपयश आले. फुलपूर मतदार संघात तो चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. ही जागा भाजपचे केशवप्रसाद मौर्य यांनी पाच लाखांहून अधिक मते मिळवित जिंकली.

दार्जिलिंगमध्ये तृणमूल काँग्रेसकडून आपले नशीब आजमावण्यात भूतियाला अपयश आले. भाजपचे एस.एस.अहलुवालिया यांनी त्याचा जवळपास दोन लाख मतांनी पराभव केला. अहलुवालिया यांना ४ लाख ८७ हजार ५६४ मते मिळाली तर भूतियाला २ लाख ९० हजार ७६९ मते मिळाली. हॉकीपटू तिर्कीला ओडिशामधील सुंदरगढमधून निसटता पराभव स्वीकारावा लागला. त्याला एक लाख ९९ हजार १६९ मते मिळाली, तर भाजपचे विजयी उमेदवार जुएल ओरा हे वीस हजार मतानी विजयी ठरले.

Leave a Comment