सुशीलकुमार आणि प्रणोतिसाठी ५२ गार्डची सुरक्षा

sushilkumar
पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी माहिती हक्क अधिकारानुसार मागविलेल्या माहितीत महाराष्ट्रातील ८४ व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी तब्बल ८१२ पोलिस अधिकारी आणि सुरक्षा रक्षक सुरक्षा देत असल्याचे उघड झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या आमदार कन्या प्रणोति यांच्यासाठी ५२ सुरक्षा रक्षक तैनात असून या दोघांना झेड प्लस सुरक्षा दिली गेली आहे. सुशीलकुमार यांच्या पत्नी उज्ज्वला यांना वाय सुरक्षा असून त्यांच्यासाठी १४ रक्षकांचा ताफा कार्यरत आहे.

प्रणोति यांनी मात्र ही सुरक्षा प्रोटोकॉलप्रमाणे दिली गेली आहे, आम्ही मागितलेली नाही असे स्पष्ट करतानाच ही सुरक्षा अनावश्यक असल्याने काढून घेतली जावी असे पत्र गृहमंत्री आर.आर. पाटील यांना लिहिल्याचेही सांगितले आहे. सुरक्षा रक्षकांचा वापर आम्ही करत नाही असेही त्या म्हणाल्या.

अर्जाला उत्तर म्हणून देण्यात आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात १२ व्हीआयपींना झेड प्लस सुरक्षा असून त्यात राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, आर.आर. पाटील, शरद पवार यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री चव्हाणांसाठी ४६, अजित पवारांसाठी ३१, छगन भुजबळ यांच्यासाठी२५ सुरक्षा रक्षक तैनात आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, मुंबईचे पोलिस कमिशनर राकेश मारिया यांना झेड दर्जाची सुरक्षा असून त्यात १५ ते २२ सुरक्षा रक्षक आहेत. महाराष्ट्रातील १९ व्हीआयपीना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यात सचिन तेंडुलकर, अबू आझमी, मिलींद देवरा, मुरली देवरा यांचा समावेश आहे. न्यायाधीश मृदुला भाटकर व टाटा ग्रुपचे रतन टाटा यांनाही सुरक्षा दिली गेली असून त्यांनी ती नाकारली असल्याचे समजते. अन्य २७ व्हीआयपींना एक्स दर्जाची सुरक्षा पुरविली गेली आहे.

अर्जदार दुर्वे यांनी राजकीय नेत्यांना आणि महत्त्वाच्या व्यक्तींना पुरविली जात असलेली सुरक्षा कमी करून त्या ऐवजी राज्यातील वृद्ध आणि महिलांसाठी सुरक्षा वाढविली जावी अशी मागणी केली आहे.

Leave a Comment