ममताच तिस्ता कराराच्या अपयशास जबाबदार – शेख हसीना

hasina
ढाका – भारत-बांगलादेश यांच्यातील तिस्ता पाणी वाटप समस्येवर तोडगा काढण्यासाठी दृष्टिक्षेपात आलेल्या कराराच्या अपयशास ममता बॅनर्जीच जबाबदार असल्याचा आरोप बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केला आहे. बांगला देशच्या जलसंधारण मंत्रालयाच्या बैठकीत हसीना यांनी हा आरोप केला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2011 मध्ये केलेल्या बांगलादेश दौऱयात या करारावर स्वाक्षऱया होणार होत्या. मनमोहन सिंग यांनी याबाबत सकारात्मक दृष्टिकोन दर्शविला होता, पण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्याला खो घातला, असे या संबंधीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भारताच्या केंद्र सरकारने समजुतदारपणा दाखविला होता, पण ममताजींनी करारास विरोध केल्याने हा करार बारगळला, असे त्या म्हणाल्या. आपण अजूनही हा प्रश्न वाटाघाटींच्या माध्यमातून सोडविता येईल, अशी आशा बाळगून असल्याचे हसीना यांनी म्हटले आहे. 2011 मध्ये पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या समवेत ममताजीही बांगला देश दौऱयावर येणार होत्या. पण ऐनवेळी ममताजींनी आपला दौरा रद्द केल्याने हा करार होऊ शकला नाही.

Leave a Comment