सोनियांनी आळवले देवाला

sonia_15
नरेंद्र मोदी यांच्यापासून देशाचे संरक्षण करण्याची गरज आहे असे सातत्याने सांगणार्‍या सोनिया गांधींनी काल हे संरक्षण आपण करू शकणार नाही म्हणून ते देवानेच करावे असा धावा केला. गुजरात मॉडेल किंवा मोदी मॉडेलपासून आता देवानेच देशाचे रक्षण करावे असे त्यांनी एका सभेत म्हटले. आपण वरचेवर हास्यास्पद होत चाललो आहोत याची तर त्यांना जाणीव नाहीच पण तशी जाणीव होण्याइतपत संवेदनशीलता, चातुर्य आणि तारतम्यसुध्दा त्यांच्याकडे नाही. सोनिया गांधी आणि त्यांची दोन लेकरे मोदींच्या नावाचा जप करत सुटले आहेत. त्यासाठी त्यांनी गुजरात मॉडेल हा विषय हाती घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसचे नेते गुजरात मॉडेलवर तुटून पडायला लागले आहेत. हा मोदींच्या विरोधातला एक निर्विवाद आणि निखालस सत्य असा मुद्दा आपल्या हाती सापडला आहे असा त्यांचा समज झालेला आहे. नरेन्द्र मोदी यांचे हे मॉडेल कुचकामी आहे असा शोध काही कॉंग्रेसधार्जिण्या अर्थतज्ञांनी लावला आणि आता आपण याच गोष्टीवर भर दिला की मोदी लाट ओसरायला लागेल अशी आशा गांधी कुटुंबाला वाटायला लागली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हण यांनी तर निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात गुजरात मॉडेलचे सत्य जनतेला समजून चुकले असल्याने मोदी लाट काही प्रमाणात ओसरली असल्याचा दावाही केला आहे. कॉंगे्रेसचे नेते पराभवाच्या शक्यतेने किती बावचवळे आहेत याचा हा पुरावा आहे. काही दिवसांपूर्वी हेच लोक मोदी या नावाची काही लाट आहे हे मानायलाच तयार नव्हते मग जी लाट अस्तित्वातच नव्हती ती ओसरायला कशी लागली? अर्थात हे त्यांना कोणी विचारणार नाही. सोनिया गांधी असोत की त्यांची दोन अपत्ये असोत हे सगळे लोक आता मोदींच्या गुजरात मॉडेलचा पोलखोल झालाच असल्याच्या आनंदात आपल्या भाषणांत तीच ती गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायला लागले आहेत. असा प्रचार केल्याने आपल्या हातातून निसटू पाहणारी निवडणूक आपल्या हातात राहील अशी खुषीची गाजरे खाण्यात ते मग्न आहेत. म्हणूनच गुजरात मॉडेलची चेष्टा करता करता त्यांनी आपल्या पदरचे तिखट मीठ लावायला सुरूवात केली आहे. राहुल गांधी यांनी या मॉडेलला टॉफी मॉडेल म्हटले तर प्रियंका गांधी यांनी त्याला देशाचे विभाजन करणारे मॉडेल म्हटले. सोनिया गांधी यांनी तर अतिशयोक्तीच केली. त्यांनी मोदी यांच्या मॉडेलपासून देशाचा बचाव व्हावा अशी प्रार्थना देवाकडे केली.

मोदी यांनी आपल्या मॉडेलची महती सांगण्यासाठी काही आकडे वाढून चढवून सांगितले आहे असे आपण वादासाठी गृहित धरू पण त्यापासून देशाचे वाटोळे कसे काय होणार आहे आणि या मॉडेलपासून देशाचे रक्षण व्हावे यासाठी देवाचा धावा करण्याची काय गरज आहे हे काही कळत नाही. मोदी यांचे मॉडेल एवढे वाईट असेल तर कॉंग्रेसने त्याला पर्यायी असे मॉडेल तयार करून दाखवावे. त्यासाठी कॉंग्रेसच्या हातात दहा वर्षे सत्ता होती. या काळात सोनिया गांधी यांनी कसले मॉडेल तयार केले आहे? देशाला मोदी पासून वाचवण्याची ताकद त्यांच्यात नाही म्हणून त्यांनी आता देवाचा धावा सुरू केला आहे. यात त्यांची असमर्थताच व्यक्त होत आहे. अर्थात ती आहेच म्हणून त्यांनी मोदी रोखो मोहीम सुरू केली आहे. मोदींना वाचवण्याची क्षमता त्यांच्या पक्षात नाही म्हणून त्यांनी आता प्रादेशिक पक्षांना हाक द्यायला सुरूवात केली आहे. कॉंग्रेसला शंभराच्या आसपास जागा मिळतील असे अनुमान आहे पण आपण गुजरात मॉडेलचे पितळ उघडे पाडले असल्याने या जागा १४० पर्यंत जातील अशी आशा कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटायला लागली आहे. तसे झाल्यास आपल्याला प्रादेशिक पक्षांची मदत घेऊन सरकार स्थापन करता येईल असा हिशेब ते मांडत आहेत.

वाटल्यास राहुल गांधी पंतप्रधानपदाचा दावा सोडतील असेही संदेश गेले आहेत. कॉंग्रेसचे डावपेच आखणारे लोक कोण आहेत हे माहीत नाही पण त्यांना निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात असे उलटेपालटे डावपेच खेळल्याने आपला पराभव अधिक पक्का होणार आहे याची जाणीव नाही. गेल्या दोन वर्षांतली राहुल गांधंी यांची भाषणे काढून वाचली तर त्यांनी अनेकदा प्रादेशिक पक्षांना कमी लेखल्याचे दिसून येईल. एकदा तर त्यांनी महागाईला आपल्या आघाडीतले घटक पक्ष जबाबदार आहेत असे म्हणून शरद पवारांना डिवचले होते. त्यावर शरद पवारांनी राहुल गांधी यांना मामाच्या गावाला (म्हणजे इटालीला)जाऊन आघाडीचे राजकारण कसे असते हे शिकून येण्याचा सल्ला दिला होता. ही तर दोन वर्षांपूर्वीची गोष्ट झाली पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीनच दिवसांपूर्वी देशात प्रादेशिक पक्षांची मुळात गरजच काय असा प्रश्‍न केला आहे. एका बाजूला प्रादेशिक पक्षांची अशी टिंगल टवाळी आणि दुसर्‍या बाजूला सत्ता हातातून निसटते आहे असे दिसायला लागताच त्याच प्रादेशिक पक्षांच्या नाकदुर्‍या असा दुतोंडीपणा कॉंग्रेस नेते करायला लागले आहेत. आपल्या डावपेचातून राजकीय अस्थैर्याचा संदेश देत आहोत अाणि त्याची प्रतिक्रिया म्हणून स्थिर सरकार हवे असणारे मतदार अधिक संख्येने मोदींच्या मागे उभे राहून त्यांचे बळ वाढवणार आहेत याची जाणीव या नेत्यांना नाही.

Leave a Comment