प्रियंकाचा प्रभाव पडला पण…….

priyankagandhi
प्रियंका गांधी-वड्रा यांनी गेला आठवडा चांगलाच गाजवला. त्यांनी अमेथी आणि रायबरेली या दोनच मतदारसंघात प्रचार केला पण तो ज्या तडफेने केला त्याने सार्‍या देशाचे लक्ष वेधून घेतले गेले. राहुल गांधी यांच्या पराभव परंपरेमुळे हिरमुसलेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांच्या मनात आशेचे किरण उगवले असून त्यांना आता प्रियंकाच पक्षाला वाचवू शकतील असे वाटायला लागले आहे. कडक उन्हातही या दोन मतदारसंघात फिरत आहेत. त्यांनी राजकारणात यावे अशी कॉंग्रेस नेत्यांची मागणी होती आणि अजूनही आहे. पण ती सोनिया गांधी यांना मान्य नाही. प्रियंका गांधी केवळ दोन मतदारसंघातच प्रचार करतील यावर सोनिया गांधी ठाम आहेत. पण या दोन मतदारसंघातच प्रियंका गांधी यांचे लोकांना फार मोठे आकर्षण आहे असे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांत मोदीशिवाय कोणी दिसतच नव्हते. त्यांच्यासमोर राहुल गांधी अगदीच केविलवाणे दिसायला लागले होते. पण टीव्हीवरच्या प्रचारात प्रियंका गांधी यांनी मोदींशी बर्‍यापैकी बरोबरी केली.

त्याचा असा परिणाम झाला की, मोदींचा करिष्मा कमी व्हायला लागला. अर्थात मोदी यांच्या प्रचार मोहिमेचे नियंत्रण करणारांनी त्यांच्या नव्या मुलाखती प्रसारित करून ही कसर भरून काढण्याचा प्रयत्न केला. पण प्रियंका गांधी म्हणजे राहुल गांधी नव्हेत हे तर नक्कीच सिद्ध झाले. प्रियंका गांधी यांनी राजकारणात प्रवेश केलाच तर त्या कॉंग्रेसचे गेलेले स्थान परत मिळवून देऊ शकतील असा विश्‍वास कॉंग्रेस जनांना वाटावा असे हे चित्र होते. टिळकांपासून नेहरूंपर्यंत अनेक मोठ्या महनीय नेत्यांनी ज्या पक्षाला मोठे केले त्या कॉंग्रेस पक्षाला वाचवण्यासाठी जबाबदारी प्रियंका यांच्यावर टाकावी असे म्हटले जायला लागले. प्रियंका गांधी यांचा हा प्रभाव जाणवत असला तरीही त्यांनी प्रचार सभांत भाषणे करताना, केवळ गांधी कुटुंबाचाच बचाव करण्याचा पवित्रा घेतला. मनमोहनसिंग सरकारच्या योजना किंवा युपीए सरकारची कामगिरी याबाबत फार काही बोलणे टाळले. त्यांची अशी मर्यादित भूमिका का राहिली ? त्यांना नरेन्द्र मोदी यांच्यासमोर थेट का उभे केले नाही असा प्रश्‍न सर्वांना पडत आहे. याची दोन कारणे आहेत. एक तर प्रियंका गांधी यांच्यात व्यापक प्रमाणावर राजकारण करण्याची क्षमता नाही असे सोनिया गांधी यांना वाटत असावे किंवा प्रियंका गांधींनी राष्ट्रीय राजकारणात पदार्पण केले तर त्यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या भूखंडांचे प्रकरण उकरून काढले जाईल अशी भीती त्यांना वाटत असावी.

कारण कोणतेही असो पण प्रियंका गांधी यांनी कॉंग्रेसच्या प्रचारात थोडी जान आणली होती ती मर्यादित राहिली. त्यांचा कॉंग्रेस पक्षाला देशव्यापी फायदा मिळाला नाही. मिळणार नाही. कितीही प्रभाव टाकला तरी त्या काही ना काही कारणांनी आता तरी पंतप्रधानपदाच्या उमेदवार नक्कीच जाहीर होणार नाहीत. म्हणजे त्यांनी केवळ झलक दाखवली आहे. झलक दिसल्याने आता काही फायदा झालेला नाही पण त्यामुळे पक्षाच्या आशा मात्र वाढल्या आहेत. आता पक्षाचा पराभव झाला तरीही उद्या चालून प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवल्यानंतर का होईना फायदा होऊ शकेल असे कॉंग्रेस नेत्यांना वाटत आहे. गांधी फॅमिली ही कॉंग्रेससाठी ठेवणीतली अस्त्रे आहेत. सोनिया गांधी हे अस्त्र वापरून दोनदा सत्ता मिळवली. आता राहुल अस्त्राचा प्रयोग फसत आहे पण त्यातल्या त्यात आशा अशी की, सगळीच अस्त्रे संपलेली नाहीत. एक अस्त्र शिल्लक आहे. पक्ष संपूनच चालला तर हे अस्त्र वापरता येईल.

त्यात पक्षाचाही फायदा आहे आणि गांधी कुटुंबाचाही फायदा आहे. कारण कॉंग्रेस पक्षाला गांधी घराणे हवे आहे ते सत्ता मिळवण्यासाठी हवे आहे. त्याच्या प्रभावाने सत्ता मिळत नसेल तर कॉंग्रेस नेते या घराण्याला भिरकावून द्यायला मागेपुढे पहाणार नाहीत. याच कारणाने कॉंग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या मनात राहुल गांधी यांच्याविषयी चीड आहे. ते राहुल गांधी यांना अजून तरी पूर्णपणे नाकारत नाहीत पण ही निवडणूक गमावली तर ते राहुल गांधी यांना नाकारतील आणि प्रियंकाला नेतृत्व स्वीकारण्याची गळ घालतील. आता तरी प्रियंका गांधी यांनी त्यास आपण पात्र आहोत असे दाखवून दिले आहे. पण त्यांच्या या किंचित झंझावाताने पक्षाचे नकळतपण एक मोठे नुकसान झाले आहे. आजवर नरेन्द्र मोदी यांच्या प्रभावापुढे झाकोळून गेलेली राहुल गांधी यांची प्रतिमा प्रियंका गांधी यांच्याही प्रभावापुढे आणखीच झाकोळून गेली आहे. गेला आठवडाभर माध्यमात प्रियंका विरुद्ध मोदी सामना जारी आहे. परिणामी राहुल गांधी मागे पडून कॉंग्रेस पक्षाचे आणखी नुकसान झाले आहे. हा धोका ज्येष्ठ नेत्यांना कळत असावा पण राहुल गांधी त्यांना जवळही उभे करीत नाहीत. मग त्यांचा अशा बाबतीत सल्ला घेणे तर दूरच राहिले. एकंदरीत राहुल यांचा पराभव अटळ आहे. राहुल गांधी यांच्या नव्या सहकार्‍यांना आणि सल्लागारांना फार तपशीलाने विचार करण्याा अनुभव नाही आणि ते फार मुत्सद्दीपणाने निवडणूक मोहिमेचे नियोजन करू शकत नाहीत असे दिसत आहे कारण ते पक्षाच्या हितासाठी म्हणून जे जे काही करतात ते त्याच्यावर उलटते.

Leave a Comment